बळी

मायेचं पहिलं पोर
अंधार
अंतराळाचा आदिवासी
अनंत घनदाट
अनेत्री मूक....

मायेचं शेण्डेफळ
मानव
मनस्वी कल्पक
दशेंद्र द्विनेत्री
बलवान बुद्धिमंत...

भीती पण मानवाला
निरुपद्रवी ज्येष्ठाची
अंधार नकोसा त्याला
स्वार्थासाठी
तृषार्त प्रकाशाचा तो...

शोध ज्योतीचा
ती कोवळी
गर्भात तिच्या
ठिणगीची झळाळी
पोटी घनप्रकाशाची पोटली...

ज्योत
भुकेपोटी अंधार जाळी
जाळल्या अंधाराची काजळी
अंधाराच्याच अंगावर ओकत
स्वार्थी शेण्डेफळाला
प्रकाश देणारी...

ज्योत
मानवानं दिलेला बळी
प्रकाशाच्या हव्यासापोटी
ज्योतीत जातो बळी
निष्पाप अंधाराचा...

मूक समर्पण
ज्योतीचं अन अंधाराचं
असहाय्यपणे निमूट!