हीच का ती माणसे?

राम भजनी रंगणारी हीच का ती माणसे?
एकतारी छेडणारी हीच का ती माणसे?
साद देण्या द्रौपदीला आजना उरला कुणी
कृष्ण महिमा वाचणारी हीच का ती माणसे?
जाळती नवरीस नवख्या स्त्री-भ्रुणाला मारती
स्त्रीस देवी मानणारी हीच का ती माणसे?
जो मिळे न्यायालयातुन तोच असतो न्याय का?
न्याय हरता पेटणारी हीच का ती माणसे?
श्वापदे दिसती न कोठे वाहती जखमा कशा
माणसाना चावणारी हीच का ती माणसे?
पाच सालाबाद येती मागण्या माझ्या मता
भीक ग्रहणी मागणारी हीच का ती माणसे?
मातले धर्मान्ध आता यादवी चोहीकडे
धर्म ग्रंथा समजणारी हीच का ती माणसे?
दोन धर्मातील दंगे बाब नित्त्याची असे
व्हा सहिष्णू सांगणारी हीच का ती माणसे?
ऐक तू "निशिकांत" गोदा प्रश्न करते आज ही
नाथ जाता थुंकणारी हीच का ती माणसे?

निशिकान्त देशपान्डे मो.न. 9890799023
e mail दुवा क्र. १
प्रतिसादाचि प्रतिक्षा