आसवांना गाळले

शुद्ध अन बावनकशी  मी आसवांना गाळले
मी कसोटीवर तयांना घासले अजमावले

आसवांच्या दागिन्यांची  मांडली आरास मी
शेकडो आले बघाया अंतरी झंकारले

वस्त्र माझ्या जीवनाचे आज दिसते शुभ्र का ?
डाग हटवादी सुखाचे आसवांनी काढले

बोलबाला आसवांचा जाहला इतका जगी
वळचणीमध्ये सुखाचे श्वासही मंदावले

या सुखांनो या बघाया थाट माझा जीवनी
राव मुठभर, तेच डबके विश्व तुमचे जाहले

द्रॉपदी, सीता, अहिल्या आसवांना पुरविती
शायरांनी स्त्रीभ्रुणाचे दुःखही कुरवाळले

फाटले आकाश वरती मी कशाला घाबरू  ?
काळजी वाटे तयांना जे सुखी उंडारले

आसवे आपोशनाला आसवे चित्रावती
आसवे नॅवेद्य सुद्धा देव ही वॅतागले

आज का "निशिकांत" तुजला राव येउन भेटले?
आसवांचे चार वरवे आज त्यांनी लावले

निशिकांत देशपांडे  मों, न. ९८९०७ ९९०२३
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा
"वरवा" हा मक्त्यात वापरलेला शब्द जरा अप्रचलीत आहे. याचा अर्थ "रतीब" असा होतो.