आजोळजवळचा नळदुर्ग (२)

जाता-जाता खूप रंगबिरंगी मोठया मण्यांची माळ रंजानं विकत घेतली. नि अल्लद माझ्या गळ्यात टाकली. दरवेळी गेलं की, रंजा असं काही ना काही माझ्या गळ्यात घालायची. तिला नाही म्हणनं मला खूप जीवावर यायचं. सगळा बाजार फिरता-फिरता बराच अवधी गेला. पण सावल्या लांब व्हायला लागल्या तसं रंजानं वाड्याकडं जायची लगबग केली. लंब्या नि रे़खीव आपल्याच सावलीला पाहत चालायला मला मौज जाणवत होती. डालगं डोक्यावर घेतलेली रंजाची सावली लंबीच-लंबी सावली पाहता-पाहता माझ्या सावलीकडं नजर कमी जायची. तर कधी मी तिच्या सावलीतनं जायची. तीच्या सावलीत माझी सावली मिसळायची. असा कमी अवधीचा खेळ करत-करत गाडीचा थांबा कधी आला कळायचं नाही.

बाजार संपायची वेळ अजून झाली नसल्यानं गाडीत बऱ्यापैकी टेकायला जागा मिळाली. रोजच्या मानानं आज तशी जीवाला तडतड अधिक झाल्यानं गाडीत बसल्या-बसल्या हवेनं मस्त डुलकी आली. रंजाचा पण डोळा लागला. पण गावातले काही लोकं गाडीत असल्यानं त्यांनी उतरता-उतरता दोघींना हलवून जागं केलं. भलं होवो त्यांचं असं म्हणत रंजामागं मी सरसर खाली उतरले. उतरल्यावर तिचा हात पकडला. तरीपण तिनं विसरून मी खाली आले की नाही म्हणून, मागं गाडीत डोकवून पाहिलं. अगं रंजा, मी तुझाच हात पकडून आहे म्हणल्यावर, असं होतं बघ चिनू!... म्हणत तिनं डोक्याला हात मारून घेतला.

आता खाली उतरल्यावर वाड्यात पेठदारापर्यंत पोचत नाही तोच अज्याबाबा समोर झाला. नि डालग्याचं ओझं आत नेऊन ठेवलं. दोघींना लहान बिंदगी हात-पाय धुवायला दिली. गारेगार पाण्याचे शिपकारे चेहऱ्यावर मारून तसंच राहू दिले. ऊन बरंच उतरल्यानं अज्ज्याबाबा नेहमीप्रमाणं कडूनिंबाखाली तुळशीकट्ट्याजवळ घोंगडं अंथरून बैठक केली. वाड्यातही झाडून-पुसून साऱ्यांची ही बैठकीची जागा म्हणजे जीव की प्राण होता. बाहेरचे पण याच बैठकीवर ताणून द्यायचे. आराम करायचे. आबीसोबत गप्पा करायचे नि अज्ज्याबाबानं दिलेल्या खाऊवर ताव मारून सरसर निघून पण जायचे. मला नि रंजाला खायला-प्यायला करून देण्यात अज्ज्याबाबा आनंद मनवायचा. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकलेलं पाहिलं की उगीच त्याची ऊबदार माया आटवून पापण्या ओल्या व्हायच्या. नि मी डोळ्यात कचरा गेल्याचा बहाणा करून झग्याच्या बाहीनं डोळे पुसून घ्यायची. रंजा सारं जाणून जायची. तिच्या पण पापण्या मी कितीकदा तरी ओलावलेल्या पाहिल्या आहेत.

पोटोबा तर आता भरलेला. म्हणून अज्ज्याबाबांना बाजाराच्या डालग्याची खबर घेतली. रंजा-अज्ज्यानं आपआपला हिशोब केला. आता तशी विशेष भूक नसल्यानं खाऊ आणलेला मी तसाच डालग्यात झापून ठेवला. नि अजून जरा-जरा उजेड होता. म्हणून वाड्याबाहेर कट्ट्यावर जाऊन बसले. आत तिघंही गप्पात रमले होते. म्हणून मी बाहेर जातांना कुणी पण टोकलं नाही. पाय हलवत ऐसपैस आराम जाणवेल अशी पोझ होती. मी वाड्यात, नाहीतर इतर काहीबाही काड्या करत टाणटाण उड्या मारतांना पेठदारातनं दिसावी. म्हणून इथं ओळख झालेली झालेली पलटण आजूबाजू भटकत राहायची. अज्ज्याबाबा नि रंजाचा चांगलाच दणकट धाक होता. म्हणून वाड्यात यायची कुणी हिंमत राखून नव्हतं. आताही पलटणीपैकी एकानं मला पाहिलं नि सारी पलटणच माझ्या भोवताल जमा झाली.

हरणा-चंदना-शारकी-भुरकी-सोजर-सुग्रीव-वाली असं भली लंबी पलटण माझ्याभोवताल होती. दुर्गच्या बाजारात सारीच जाऊन आल्यानं पलटण खूश होती. मग बाजारात कशी गाठ पडली नाही, बुआ!... असा प्रश्न वारंवार डोकवून पळत होता. माझ्या गळ्यातील रंगबिरंगी माळ नेमकं साऱ्यांना आवडली. किती ठसठशीत मणी आहेत. याचं कौतूक झालं. जी गोष्ट मला सहज मिळायची. त्याकरता त्या पलटणीला बराच जीवाचा आटापीटा करावा लागायचा. सुग्रीव-वाली आम्हा मुलींकडं जरा दूर राहून पाहत उभे होते. आमच्या घूरदाळ्यात येऊन काय बोलावं असा बराच पेच त्यांना पडला होतं ती दोघं तिकडं होती, तेच बरं होतं. माझ्या दोस्तीणींच्या गळ्यात अशी माळ नव्हती. आम्ही जरा-जरा वेळ घालून पाहू का!... या त्यांच्या विचाराला मी ठाम नकार दिला. नि मी भारीच अक्क्ड दाखवतेय, असा त्यांचा विचार पक्का झाला. एवढीशी जाणवणारी गोष्त, पण आमच्यातला संवाद खूंटला. मला वाद तरी कुठं वाढवायचा होता. माझ्याजवळ साऱ्याजणी बसूनही आपआपल्या दुनियेत दंग होतो. सुग्रीव-वाली बिच्चारे तिकडंच पसार झाले. नि आमची मुलाकत अशी कमी अवधिची झाली.

इतक्यात अज्ज्याबाबाची हाक आलीच नि मी आत पळत गेले. आता दिवे लावणीची वेळ झालेली. अज्ज्याबाबानं देवळीत पणती लावली. मी तुळशीला नमस्कार करून पाया पडले. नि बाजूलाच घोंगड्यावर आरामाची पोझ घेऊन चांदण्या मोजत राहिले. इथं राहायला येऊन अवघे चारच दिवस झाले. पण असं जाणवलं की चारच मिनिटं झालेत. धाबा-दुकानातली ती इवली खिडकी-खुपाटी नि पार-गुलाबी बाभळ-नळदूर्ग अश्या जागांची मी आपल्या परीनं न्यारी मौज घेत होते. आजोळची सफर करण्यात गुरफटले होते. पूर्ण आयुष्यच कायम सफर राहावी असं कधीच घडणार नव्हतं. पण आबीसोबत ही कमी अवधिची सफर करून त्या आठवणीवर मजेत आयुष्य जगायची आगळी जादू आबीनं मला बहाल केली. दरवेळीच इथनं वाड्यातनं निघण्याआधीचा दिवस किंवा रात्र मला कधीच स्वस्थ जाणवली नाही. नि मी स्वस्थ नसलं की रंजा अस्वस्थ व्हायची. अश्यातच कधीतरी दोघी एकमेकींच्या गळ्यात हात टाकून झोपी जायचो.

एक दिवस मिनूचं पत्र यायचं. 'शाळा सुरू व्हायचे दिवस आले लवकर ये. '-माझ्या शाळेकरता आबी इथला गाशा गुंडाळायची. पहाटे पाखरांचा पहिला आवाज सुरू झाला की त्या नादानं जाग यायची. वाडा सोडायचा असल्यानं मन उदासीनं झाकोळून जायचं. निघतांना जितकं रेंगाळेल तितकं मायेचे बंध गच्च मागं खिचतात. म्हणून आबी उगीच रेंगाळायची नाही. लवकरच आंघोळी आटपून वेताची बास्केट भरून घ्यायची. आबीच्या दोस्तीनींनी दिलेल्या खाऊचं गाठोडं मी धरायची. खाऊ नि माया यावरच तर पुढले सारे दिवस आबी नि माझे सुखाचे जाणवणार होते. सकाळी-सकाळी काही खायची इच्छा नसायची. त्यामुळं फक्त फुलपात्रभर चहा घ्यायचो. येणाऱ्या पहिल्याच गाडीत दोघी बसायचो. गर्दी नसायची. जशी सरकन गाडी आली. तशीच सरकन धावायची. मी मागं वळून पाहायची तर रंजा-अज्ज्याबाबा- आजी हात हलवतांना दिसायचे. नि पाहता-पाहता माझ्या ओल्या पापण्याच्या धूसर पडद्याआड सारं झापून जायचं. साऱ्यांना अल्लद झापून घेत, मी डोळे मिटून मागं बाकाला टेकायची. आबीची स्थिती पण काही निराळी नव्हती. इथली माझी दोस्तीची पलटण मला आठवायची. त्यांचा निरोप कधी घेतच आला नाही. पलटणीच्या आठवणींनं जीव गच्च ओलावायचा. सारे सुखाचे नजारे आठवत-आठवत एक-दोन दिवसाचा खडतर प्रवास करून 'मनोली' बंगलीत प्रवेश व्हायचा.

घरात काम करणारे गडी-बाई बागेत असायचे. दोघींना पाहून सामान आत न्यायचे. आबी आंघोळ आटपून स्वयंपाकाला लागायची. नि मी अज्ज्याबाबा-रंजाच्या ऊबदार दुनियेत गुरफटलेली बाहेर यायची. नि बागेत झोपाळ्यावर निवांत बसायची. परत पुढल्यावेळी अज्ज्याबाबाच्या दुनियेत जायचं. याचा नजारा पाहत-पाहत, माझी शाळेतली दोस्त मिनूची वाट पाहायची. जरा वेळानं फाटकाचा आवाज यायचा. नि ती सरसर धावत येऊन माझ्या गळ्यात दोन्ही हात घालून, गप्पा करायची. माझ्या आजोळच्या दुनियेची सफर मी तिला करवून आणायची नि त्यात हरवून टाकायची. रंजा-अज्ज्याबाबा असा हजारोमैल प्रवास करत मी परत 'मनोली'त पोचायची. आजोळच्या सफरीत लुडकलेली गाडी सरळ व्हायची नि 'मनोली'त आबी-मिनूसह रमायची. (समाप्त)