आजोळजवळचा नळदुर्ग

अज्जाबाबाकडं येऊन चार दिवस झाले. ते नेहमीप्रमाणं कसं गेले कळलंच नाही. दरवेळी आलं की, मी हट्ट अज्जाबाबा नि रंजाकडं बारीकमध्ये सुरू करायची. की- आपण नळदुर्ग पाहायला जाऊ या. पण यावेळी मी कसलाही हट्ट केला नाही. तरी सकाळी-सकाळी रंजाची आंघोळीची लगबग पाहून मला आनंद होईल, असं ती कायतरी करेल म्हणून कुठं जाणीव होती. आठवडी बाजाराचा दिवस असल्यानं तिच तिथं जायची. मला गर्दीत- धुळीत रंजा न्यायची नाही. म्हणून माझी आंघोळ होऊन पण, ती एकटीच जाणार म्हणून माझा चेहरा तसं फुरंगटलेलाच होता. अज्जाबाबानं न्याहरी एका बुट्टीत बांधली. शेजारी लहानी बिंदगी पाण्याची ठेऊन त्याला कापड बांधलं. रंजा ठेवणीतला पोशाख घालून आली. नि मी तुळशीकट्ट्यावर बसून दोघांच्या हलचली पाहत होते. अज्जाबाबाची हाक आली. म्हणून नजर तिकडं वळली. तर म्हणाला की, 'अरे बिट्टू! तुझी मावशी तुला नळदुर्गला नेतेय. निट जा. '- ते ऐकून माझा माझ्याच कानावर विश्वास बसत नव्हता. मी तशीच अजून कट्ट्यावर बसलेली. इतक्यात आबी दारात आली नि म्हणाली, '- रंजाला त्रास देऊ नको. हट्ट नाही. ऊठ, आता. ऊनं व्हायच्या आधी पोचा. गेल्यावर सावलीची जागा पाहून आधी न्याहरी करायची. उपाशीपोटी भटकायचं नाही.

बाजारात विकायला म्हणून जमा केलेले शेतातले वाळके रंजानं डालगंभरून घेतले. आज खांदयावर आडवी काठी नव्हती. पण घोंगडं मात्र होतंच. न्याहरीची बुट्टी तिनं नीट वाळक्याच्या मध्ये हलणार नाही. असं जमवली. गाडी पकडायला दूर कुठं जायचं नव्हतं. वाड्याबाहेर दुकानाजवळच गाडी थांबायची. सतत पाच- दहा मिनिटानं गाड्यांची ये- जा होती. केवळ पंधरा- वीस मिनिटाचं अंतर हां- हां म्हणता गाडीनं पार पडलं. दोघी दुर्गजवळ पोचलो. पण आधी पोटोबा उरकून घ्यावा या नेक विचारानं सावलीचं झाड पाहिलं. रंजानं डालगं खाली ठेवलं. घोंगडं अंथरलं. नि दोघी मस्त ऐसपैस बसलो.

न्याहरीच्या बुट्टीतली नरम-उबदार भाकरी-मोकळी दाळ-कांदा-मेथी-भुईमुगाच्या शेंगानं झकास पोटोबा भरला. बिंदगीतलं गारेगार मातीच्या खरपूस वासाचं पाणी पिल्यावर तर मी तृप्ता झाली. बुट्टी नि बिंदगी रिकामी झाली. दोन्ही रंजानं डालग्यात पालथं घातलं. अजून बाजार भरायला बराच अवधी होता. पण तरीही वाळक्याचं डालगं रिकामं व्हायला काहीच वेळ लागला नाही. दुर्ग पाहून लगबगीनं जा- ये करणाऱ्यापाशी ना न्याहरी, ना बिंदगीतलं गारेगार पाणी होतं. त्यामुळं त्यांना वाळकं विकत घेण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हतं. रंजा जवळ-जवळ ८०-९० वाळकी तासाभरात विकून मोकळं झाली. नि झाडाखाली बसून खुर्दा मोजण्याऱ्या रंजाचा खुललेला चेहरा पाहून आनंदात डूबले. सारा खुर्दा तिनं आपल्या कप्प्या-कप्प्याच्या चंचीत भरला. बाजार गच्च भरण्याधीच आमचा सौदा फायद्याचा झाला. खूशी-खुशीत रंजानं डालगं उचललं. त्यात बुट्टी-बिंदगी-घोंगडं टाकलं. नि माझ्या गळ्यात हात टाकून म्हणाली - , 'आज माझ्या जवळ छान खुर्द्याची बेगमी झाली. मी खूप खूश आहे. काय हवं त माग. तो खाऊ घेऊन देईन. ' मी पण मान डोलावली. पण सध्या दुर्ग नि रंजाचा आनंददायी चेहरा माझ्या नजरं समोर होता. रंजाच्या मागं-पुढं उड्या मारत. तर कधी तिचा हात पकडून, हात हलवत जाण्यात मजा येत होती.

दूरनं दुर्ग जरी पडकं दिसलं तरी आत अजून बरेच अवशेष शाबूत होते. काळ्या दगडातील त्याचा रेखीवपणा नजर वेधून घेत होता. पडके अवशेष पण नीट जपून ठेवले होते. दगडाच्या अवाढव्य कमानीजवळनं आजूबाजूचा नजारा पापणीआड जपून झापून ठेवत होते. हिरवाई बरीच नजरेत भरत होती. पाखरांची पोटोबा भरायला मस्तपैकी उडाउड रंगलेली. बरीच मोकळी जागा असल्यानं मी आपलं टाणटाण उड्या मारत सारं पाहत होते.

इथं एका भल्या थोरश्या चौकोनात बरंच पाणी होतं. निर्मळ पाणी पाहताच त्यात हात घालायचा मोह आवरला नाही. पण रंजानं माझ्या या क्रियेला बंदी केली. म्हणून मग निवांत पाहत गुपचूप बसले. रंजा पण माझ्यापाशी येऊन टेकली, पण ती तिच्या दुनियेत अगदी गहन रमली. आता तिला कायतरी प्रश्न करून हैराण करणं बरं नव्हे. असं म्हण्त पाण्याच्या इवल्या लाटा पाहत मी बसले. त्या इवल्या-इवल्या लाटांचा चुबक-चुबक नाद ऐकायला छान वाटत होतं. सावलीची जागा दुर्गच्या आत-बाहेर तशी कमीच होती. नि ऊन चढतं असल्यानं काळे दगड चांगलेच तापत होते. सौम्य ऊन होतं तोवर बरं जाणवत होतं. म्हणून लोकांची वर्दळ आता विशेष जाणवत नव्हती. सरसर लोक येत जात. आम्ही दोघीच काय ते इथं रेंगाळत होतो. रंजा म्हणाली, -'मी इथं बाजाराच्या दिवशी येते नि माल विकून, बाजार करून तसंच जाते. पण यावेळी दुर्ग आतनं तुला दाखवायचं असा विचार केला. मला फारशी दुर्गची माहिती नाही. पण गावातले म्हणतात की, निजाम राजाचा दुर्ग असू शकतो. अगदी फार पुर्वी इकडं निजामाचं राज्य होतं. पण आता झालं ना, तुझं समाधान!!!... '- जर भरगच्च हिरवाई असती तर नक्कीच आम्ही दोघी सांज होईतो थांबलो असतो. चढत्या ऊनामुळं पाखरं पण आता गायप झाली. जी काही चुकून उडाउड करत होती. त्यामुळं आकाश अधिकच खुलून दिसत होतं. तो नजारा पाहत-पाहत चालायला जरा सुखाचं जाणवत होतं.

बाजाराची गर्दी आल्यावर आकाशाकडं पाहणं शक्य झालं नाही. तिकडं पाहणं सुखाचं जाणवण्याऐवजी समोर असंख्य तारे चमचमायचे. मग दोघी दुकानाच्या सावली-सावलीनं चालू लागलो. जात-जात रंजाची बरीच लहान-सहान खरेदी सुरू होती. रिकामं डालगं बरंच भरत आलं. तसं खरेदी आटपत घेतली. खाऊ पण अगदी भरपूर घेतला. मजेत बाजार-वस्तू-लोक न्याहळत माझं काशूगती चालणं होतं. माझ्या गतीशी बरंच रंजा जमवून घ्यायची. अज्ज्याबाबाला असं कधीच जमलं नाही. मग दोघांत तक्रारगाथाच सुरू व्हायची. यामुळं अज्जाबाबाची संगत जरी भावत असली तरीही रंजासोबत भटकणं मला अधिकाधिक सुखाचं जाणवायचं.

(क्रमशः)