चेहरा तसवीर होता

नोट:-तरही गजलः-  या गजलेतील पहिली ओळ गजलकार सुरेश भटांच्या गजलेच्या मतल्याची पहिली ओळ आहे

ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता
भोगल्या लाखो व्यथांचा चेहरा तसवीर होता

प्रेम गाणे गावयाचे वय तयाचे पण तरीही
शख्स *  तो मशिदीत गेला सांगण्या तकरीर$ होता

कष्ट केल्याविन कधी का भाग्य खुलते माणसाचे ?
ना कुणी आला जगी या घेउनी तकदीर होता

धुंद जगणे अन् बिघडणे शाप हा नवख्या पिढीला
स्पष्ट माझा तो इशारा वाटला किरकीर होता

मी विदर्भाला निघालो तीर्थ पावन क्षेत्र बघण्या
चालवी "आनंद वन" जो तोच हाजी पीर होता

सभ्य तो रुद्राक्षधारी रात्र मयखान्यात काढी
त्या पुजाऱ्याचा ठिकाना गावचे मंदीर होता

पाक देशी राज्य आहे पक्षपाती कायद्यांचे
ज्यास छळले त्रासले तो एक मोहाजीर # होता

शोध घे "निशिकांत" आता मर्द कणखर चेहऱ्यांचा
मर्द कसले ! मारलेला तो नथीतुन तीर होता

* मणूस   $ भाषण    # परप्रांतातून येऊन स्थायीक झालेले लोक. फाळणी नंतर जे भारतातील मुसलमान पाकिस्तानात स्थयिक झाले त्याना तिकडे मोहाजीर म्हणतात. हे  तीन शब्द उर्दू असल्यामुळे खुलासा.

निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: nishides1944@yahoo,com
प्रतिसादाची प्र्स्तिक्षा