निरोप-समारंभ

निरोप-समारंभ

पाध्ये काकुंचा निरोप-समारंभ म्हणजे क्षणोक्षणी डोळ्यांच्या कडा ओलावणारा प्रसंग. तसा वयाचा विचार केला तर त्या आमच्यापेक्षा बऱ्याच मोठया. त्या पासष्टच्या, तर आम्ही सगळ्या साधारण चाळीस पंचेचाळीसच्या. आमच्या पंधराजणींच्या ग्रुपने हा कार्यक्रम ठरवला होता.

मेधाच्या मुलाला नोकरी लागली म्हणून जेवणाची आणि त्यानंतरच्या आईसक्रिमची व्यवस्था तीने सांभाळली होती. बाकी काकुंना साडी, ब्लाउजपीस आणि बटवा सगळ्यांनी मिळून घेतले होते.

त्यांचं शांतपणे कार्यक्रमात सहभागी होणे, प्रत्येकीच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून प्रेमभावाने बोलणे.............. वरवर हसून खेळून बोलणाऱ्या आम्ही सगळ्याजणी स्वयंपाक घरात जाऊन ओलावलेले डोळे पुसत होतो. आपले अश्रू त्यांना दिसू नये याचा आमचा सगळ्याजणींचा प्रयत्न चालला होता.

जेवणाचा कार्यक्रम झाला, काकूंना आम्ही मनापासून आग्रह करत होतो. त्यापण कुणाच मन मोडायच नाही म्हणून "सगळ छान झालंय, पण तुम्ही कितीजणी, आणि माझं पोट एकटीच तेंव्हा मी सगळे पदार्थ थोडे थोडे घेणार, चालेल ना" अस म्हणत सगळ्यांच्या आग्रहाला मान देत होत्या. आम्ही सगळ्या एकाच ठिकाणी गाण्याच्या क्लासला जात होतो, मग प्रत्येकीने एकेक गाणं म्हटल, कां कुणास ठाऊक त्या गाण्यांच्या सुरांना कारूण्याची झालर होती.

त्यांचं आमच्या अपार्टमेंटमधून जाणं हृदयाला चटका लावणार होतं. आयूष्याने कांहीही दिले नाही तरी ही उमेद, हा शांतपणा, हा प्रेमभाव कुठून आला होता?

ऐन तारूण्यात नवरा गेला, सारच संपल. उमेदीच्या काळात मोठा तरूण मुलगा गेला, पायातलं बळ गेल, पण मनातली आशा संपली नव्हती. दु:खाचा डोंगर कोसळला होता, कष्टाने सी. ए. चा अभ्यास करणारा धाकटा अतूल, त्याच्याकडे बघून त्यांनी सगळी दु:ख मनाच्या आतल्या कप्प्यात दडवली, त्याच्या सहवासात, त्याच करण्यात त्या हळूहळू सगळ विसरण्याचा प्रयत्न करत होत्या. स्वाध्यायात त्या रमायला लागल्या होत्या, एकादशीच भजन, भक्तिफेरी, प्रवचन, वेळ चांगला जात होता. अतूल सी. ए. झाला, आता तो स्थिरावण्याच्या मार्गावर होता, त्याच लग्न, मग दोन खोल्यांच्या घरातून मोठया घरात, पण नियतीला ते ही मंजूर नव्हत. गणेश-जयंतीचा तो दिवस त्यांच्या जीवनात कायमची काळीकुट्ट अंधारी रात्र घेऊन आला. अतूलला ब्रेन हयामरेज होऊन तो तडकाफडकी गेला. जगण्याच्या सर्व आशा संपल्या. एकच मुलगी होती ती तीच्या संसारात, व्यवसायात व्यस्त.

जगण्याच कुठलही कारण उरल नसतांना त्या हळूहळू सावरत होत्या, आम्ही पंधराजणींच्या ग्रुपने काही गोष्टी ठरवूनच घेतल्या. एकजण त्यांच्या बरोबर दवाखान्यात जायची, दुसरी पेन्शनच्या कामाला, कुणीतरी भाजी आणायला, तर एकीने त्यांना स्वाध्यायाला बरोबर घेऊन जायला सुरूवात केली, आम्ही त्यांना एकट कधीच सोडत नव्हतो. स्वाध्याय, नामस्मरण, भजन यातून त्या पुन्हा उभ्या राहील्या.

आता एकटीने राहवत नव्हत म्हणून जमवलेला सगळा संसार आवरून त्या लेकीकडे निघाल्या होत्या, त्यांचा ’निरोप-समारंभ’ हृदय हेलावून सोडणारा प्रसंग! ग्रुपमधल्या कुणी त्यांना मुलाच्या लग्नाला बोलावले, कुणी लेकीच्या लग्नाला १५ दिवस रहायला यायच आग्रहाच आमंत्रण दिलं, तर कुणी नातवाच्या बारशाचे आमंत्रण दिले.

साऱ्या आयुष्यभर एकाकी जगणाऱ्या, नियतीने सार हिरावल्य़ावर परत उभ्या राहणाऱ्या, धन-संपत्ती, मुलं-बाळं, घर-दार, काहीही नसलेल्या, लौकिकार्थाने भिकारी असलेल्या त्या.................

त्यांच्या जवळ होतं ईश्वर नामाचे कधीही न संपणारे ऎश्वर्य आणि आम्हा सगळ्याजणींच्या प्रेमाचा अनमोल ठेवा!!!!!!!.

*********************************************