वंचना

उलुशा वरणभातात सिंधुताईंनी रात्रीचं जेवण आटोपलं, भांडी विसळली, सकाळी भिजवून ठेवलेली मटकी उपसून पंचात बांधून ठेवली आणि चिमूटभर बडीशेप खाऊन त्या पुढच्या खोलीत आल्या. नेहमीच्या सवयीने टीव्ही लावून त्या कोचावर बसून थोड्याशा सैलावल्या. आपले थकलेले पाय ताणून आणि भेगाळलेल्या टाचा एकमेकींवर टाकून चाळशीच्या वरच्या काचेतून टीव्हीकडे निर्विकार चेहऱ्याने त्या पाहू लागल्या. क्षण दोन क्षणांतच त्याचं मन अलगद टीव्हीच्या पडद्यावरून उडालं आणि पुन्हा रवीचा विचार करू लागलं. हा हा म्हणता महिना सरला सुद्धा येतोय असा फोन येऊन. उद्या तो येणार. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून जीवापाड केलेले कष्ट आणि गेल्या चार वर्षात त्याची वाट पाहून पाहून डोळ्यांना आलेला शीण उद्या फिटणार. माझा रवी इतका मोठा झाला, शिकला, इंजिनिअर झाला, परदेशात जाऊनही शिकला, पोरानं सोनं केलं आईच्या कष्टांचं. खूप समाधानाची लाट अंगावर आल्यासारखे वाटून त्यांनी डोळे मिटले. आधीच सुखाने जडावलेल्या मनाला भूतकाळातील शेलक्या आठवणींनी गुदगुल्या करून त्या हसवू लागल्या. इंजिनिअरिंगला होस्टेलला राहायचा. एका छोट्या शहरात वाढलेला पोरगा, ना त्याला कोणी सोबतीला ना कोणी काही सांगायला पण किती पटकन रूळवलं त्याने स्वत:ला नव्या जगात. मुळातच हुशार. सगळं स्वतःच झटपट शिकला. कधी घरी येऊन कसली तक्रार म्हणून नाही. शनिवार-रविवार यायचा घरी अभ्यास नसेल तेव्हा आणि कौतुक करून घ्यायचा. आवडीची मटकीची उसळ नसली  केली की लटकं रागवायचा, पण समजुतीने आहे ते खायचा. होस्टेलवर सगळी मुलं तुटून पडतात म्हणून भला मोठा डबाभर चिवडा-लाडू घेऊन जायचा. आई तुझ्या हाताच्या चवीला सर नाही म्हणायचा. सगळ्या अॅक्टिव्हिटीज करूनही फर्स्टक्लास कधी सोडला नाही त्याने. इथेही शाळेत असताना किती हुशार म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या शिक्षकांकडून त्याचं कौतुक ऐकताना हृदय कसं भरून यायचं. इवलासा होता, पाचवीत. छोटीशी निळी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून पाय पुरत नसतानाही सायकलवर जायचा शाळेत. कसा जात असेल तेव्हा? त्या आठवणीने त्यांना गलबलून आले आणि बंद केलेल्या पापण्यांच्या खालच्या कडेला उष्ण पाणी जमा झाले. इच्छा नसतानाही दलदलीत रुतावं तसं त्यांचं मन आणखी खोल खोल भूतकाळात जाऊ लागलं.   वर्षाचाही नसेल रवी तेव्हा हे गेले.   त्यांच्या बंद डोळ्यासमोर ते दृष्य लख्ख उभे राहिले. इथेच भिंतीला टेकून बसल्या होत्या त्या. तेव्हा कोच नव्हता घरात. समोर त्यांचं पार्थिव ठेवलेलं आणि मांडीवर बसून किंचाळत रडणारा रवी. शेजारी-पाजारी जमा झालेले. गर्दीतून वाट काढत माई आणि विनायक आले. दारात उभी राहून माईने किती तिरस्काराने पाहिले त्यांच्याकडे. माईची ती नजर आठवून सिंधुताईंनी खाडकन डोळे उघडले. मंद सुगंधीत झुळकीमध्ये मध्येच गटाराचा वास यावा तसा त्यांचा चेहरा आक्रसला. माई... तिच्याबद्दल हाडात मुरलेला द्वेष थोडावेळ पुन्हा जुन्याच त्वेषाने धगधगला आणि मग नेहमीच्याच असहाय्यपणे डोळ्यातून पाणी होऊन वाहू लागला. सिंधुताईंचं मन कृष्णविवरात अडकल्याप्रमाणे वेगाने भूतकाळात खेचलं गेलं. त्या एकदम लहानच होऊन गेल्या. पानसरे गल्लीतलं आप्पांचं घर त्यांना आठवलं.    दोन मजली, रस्त्याच्या बाजूला लोखंडी गजांची लाकडी गॅलरी असलेलं. तो मधला चौक, आप्पांची खोली, स्वयंपाकघर, पुढची खोली, तिथे लावलेला आईचा फोटो. आईला नेहमी फोटोतच पाहिलेलं. जेमतेम वर्षाची असेन तेव्हा आई गेली. पण तिचा वावर, तिचा सुगंध नेहमीच दरवळत राहिला त्या घरात. माई आल्यावरसुद्धा आईच्या फोटोसमोर उभं राहून डोळ्यांच्या कडा पुसताना पहिलं होतं आप्पांना कितीदातरी. आप्पांची किती लाडकी होते मी! बेब्या म्हणायचे मला लाडानं. पण माईनं सगळं ताब्यात घेतलं आणि सगळंच बदललं. कोणालाच कळणार नाही असं दु:ख द्यायची ती. वरकरणी अगदी कौतुक करायची, सिंधुराणी म्हणायची पण दोघी एकट्याच असल्या की मग लागट बोलायची. आईबरोबरच का नाही उलथली असं म्हणायची. आईचे दागिने एकेक करून मोडून पुन्हा नवे घडवले तिने. आई ने लावलेला चौकातला पारिजातही तोडला. फुलांची घाण होते म्हणायची. कधी सुखाने दोन घास खाऊ दिले नाहीत की चांगलंचुंगलं लेऊ दिलं नाही. चेहऱ्यावर कधी हसू दिसलं की तिचा तिळपापड व्हायचा. एखाद्याच जहरी वाक्याने ते हसू करपवून टाकायला तिला कोण असुरी आनंद व्हायचा. विनायक झाल्यावर मोठी बहिण, ताई आहेस ना तू वगैरे बोलून सगळ्यांसमोर कित्येक त्याग करायला भाग पाडलं तिने. बाहेरच्यांसमोर, मैत्रिणींसमोर कृतक्कौतुकाने बोलायची पण त्यातही जहरी प्रचारच असायचा. पिक्चरला वगैरे नेण्यासाठी मैत्रिणी आल्या की नाही म्हणता यायचं नाही तिला. मग "अगं ती मी घेतलेली अंजिरी साडी नेस आज. आणि त्याला मॅचिंग कानातले काढून ठेवलेत मी ते घाल. आमच्या सिंधूराणीची फार काळजी घ्यावी लागते मला. अंमळ वेंधळीच आहे आमची वेडाबाई. " असं म्हणायचं.   असं बोलून बोलून खरंच वेंधळी करून टाकली तिने. स्वयंपाकघरात अवघड कामे सांगणे आणि कापलं किंवा भाजलं की कुत्सितपणे हसणे, मुद्दाम आप्पांसमोर उपचार करताना "वेंधळी ग बाई वेंधळी" म्हणणे, जेवताना मुद्दाम विनायकाला "अरे अजून एक पोळी घे. सिंधूताई पाहा मुलगी असून तीन-तीन पोळ्या खाते" असं म्हणणे. एक ना हजार तऱ्हा. सगळं बालपण तर करपलंच पण तारूण्याचं तर वारंही लागू दिलं नाही या बाईनं.
पुन्हा त्वेषाने सिंधूताईंचा जबडा ताठरला, पण दोनेक क्षणांनी एक हताश सुस्कारा टाकून त्या शेवटी उठल्या. टीव्ही आणि लाईट बंद करून पलंगावर पडल्या. अंधारगुडुप केल्यावर तरी आपले विचार आपल्याला दिसणार नाहीत अशी एक वेडी आशा त्यांना चाटून गेली. पण अंधाराच्या पार्श्वभूमीवर गतआठवणींचा चित्रपट आणखीच ठळक होत गेला.
 आप्पा गेल्यावर तर तिच्या अधिकाराला काही आव्हानच उरलं नाही. शिवाय इतकी वर्षं तिला लाडात वाढवली असा लोकांचा व्यवस्थित गैरसमज झालाच होता. मग काय घरी राहणं हीच एक शिक्षा होऊन गेली. पण ती काही काळच टिकली. बीए फायनलला असतानाच माईने तिचा एक दूरचा भाचा पाहून लग्न ठरवूनही टाकलं. एखाद्या फुलासारख्या असलेल्या सिंधुला एका कळकट, कळाहीन कावळ्याच्या गळ्यात बांधून दिली तरी सिंधूला बरंच वाटलं. आप्पांचं घर दुरावलं याचं वाईट वाटत असलं तरी स्वत:चं जग निर्माण करायची स्वप्नं होती. पण तिथेही नियतीने डाव साधलाच. लायकी नसताना मिळालेल्या रत्नाबद्दल आनंद वाटण्याऐवजी असुरक्षितताच माणसाचा आनंद कसा कुस्करते याचं जीवघेणं उदाहरणच नियतीनं दाखवून दिलं.
 ते सगळे अपमानाचे, गलिच्छ भाषेचे, मारहाणीचे किळसवाणे प्रसंग पुन्हा एकदा अनुभवून सिंधुताई शहारल्या. डोळे गच्च मिटून घेऊन त्या प्रतिमा मनःपटलावरून पुसण्यासाठी धडपडत राहिल्या. तरी ती चित्रं एकामागून एक येऊन आदळत राहिली. नवऱ्याचा अकाली मृत्यू, एक वर्षाच्या पोराला अगतिकपणे पुन्हा माईकडेच ठेवून नोकरीसाठी केलेली वणवण, ती गॅस गोडाऊनमधली कारकुनाची नोकरी, संध्याकाळी रवीला आणायला माईच्या दारात लाचारपणे जाऊन उभं राहणे, तिथेच दिवसभर जमिनीवरच रांगणारा, कधी कधी दोन दोन तास घाण झालेलं दुपटं तसंच अंगावर वागवणारा रवी. दु:खाचे एकामागून एक येणारे कढ सहन करीत कधीतरी उत्तररात्री त्यांचा डोळा लागला.
सकाळी सवयीनेच सहा वाजता त्यांना जाग आली. शरीरात मरगळ साचून राहिली होती पण रवीच्या आठवणीने मनाला पुन्हा उभारी आली.   लगबगीने त्या उठल्या. प्रातर्विधी आटपून, छान पैकी आंघोळ करून मग त्यांनी पुढचे दार उघडले. भरपूर पावसाळी, सादळलेल्या रात्रीनंतर ऊन पडावं तसं त्यांना सकाळचं ऊन वाटलं. आठ वाजतच आले होते. काल रात्री दोन वाजता मुंबईत उतरणार म्हणाला होता रवी. त्यानंतर सहा-सात तासांचा प्रवास म्हणजे आठ-नऊला पोचेन म्हणाला होता. त्या उगीचच गॅलरीत येऊन उभ्या राहिल्या. दोन्ही हात सिमेंटच्या कठड्यावर टेकवून थोडं वाकून गल्लीच्या दोन्ही टोकांकडे आलटून पालटून पाहू लागल्या. आत्ता अशी झोकात गाडी शिरावी गल्लीत, आपल्या चाळीसमोर थांबावी, त्यातनं देखणा रवी उतरावा ऐटीत आणि मग सगळ्यांनी त्याच्याकडे आणि आपल्याकडे कौतुकाने पाहावं असं त्यांना उत्कटतेनं वाटलं. त्या दहा-पंधरा मिनीटं चिकाटीनं वाट पाहत राहिल्या पण गल्लीत काहीही नवी घटना घडली नाही. संडासांसमोरच्या रांगा, दात घासणारे बायका-पुरुष आणि सकाळी सकाळी कामाला निघालेले लोक हे पाहून पाहून कंटाळा आल्यावर नाईलाजाने त्या आत आल्या. तो येईपर्यंत कामं तरी उरकून टाकावीत या विचाराने स्वयंपाकाला लागल्या. मन लावून सगळा स्वयंपाक केला. त्याला आवडतात म्हणून शेंगदाणे-खोबरं घातलेली मटकीची उसळ, शेवयांची दाट खीर, तूप लावलेल्या मऊ घडीच्या तीन-तीन पदर सुटणाऱ्या पोळ्या एवढं करेपर्यंत बारा कधी वाजले कळालंच नाही. भांडीही घासून झाली, सगळं आवरून झालं, एक वाजला. अजून पोराचा पत्ता नाही, काही फोनही नाही. नसत्या शंकाकुशंकांनी त्यांचं मन भरून गेलं. धडधडत्या हृदयाने हातात मोबाईल गच्च धरून त्या उगाचच आतबाहेर करत राहिल्या.
दोन वाजता मात्र त्यांचा संयम संपला. पण काय करावे त्यांना कळेना. कोणाला फोन करून चौकशी करता येईल का? पण विचारायला त्याचा फ्लाईटनंबर सुद्धा माहिती नाही. कोणत्या गाडीने येणारे, मुंबईत पोचला की नाही, कोणत्या रस्त्याने येणारे काहीच तर माहिती नाही. त्या हतबुद्धपणे पुढच्या खोलीत मध्येच उभ्या असताना खाली हॉर्न वाजला. जीव भांड्यात पडल्याचा मोठ्ठा सुस्कारा सोडून त्या गॅलरीत धावल्या. एक पांढरी सुमो चाळीसमोर उभी होती. चाळीकडच्या बाजूचे दार उघडले आणि त्यातून रवी बाहेर आला. कित्ती वाळला आहे म्हणेपर्यंत त्याने वर पाहिले आणि हसून त्यांच्याकडे पाहून हात हलवला. त्यांनीही उत्साहाने हात हलवला आणि डोळ्यातल्या पाण्याने धूसर झालेल्या नजरेनेच लोक कसे कौतुकाने पाहत आहेत ते टिपण्याचा प्रयत्न केला. डोळे पापण्यांनीच टिपत त्यांनी खाली पाहिलं तेव्हा रवी गाडीच्या मागच्या भागातून बॅगा काढत होता. त्याला मदत करताना विनायकला तिथे पाहून कोणीतरी फाडकन मुस्कटात मारावी तसं सिंधुताईंचं तोंड एकदम उतरलं. ते दोघे बॅगा घेऊन वर आले. त्यांच्याकडे कोऱ्या नजरेने पाहत विनायकने बॅग आत ठेवली आणि रवीच्या पाठीवर थाप मारून "येतो रे" म्हणून तो झपाट्याने निघून गेला. रवीने वाकून नमस्कार केला तरी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचं भान सिंधुताईंना उरलं नाही. संताप, द्वेष, आश्चर्य, दु:ख या सगळया भावनांच मिश्रण त्यांच्या मनात थैमान घालू लागलं होतं. रवीने आई म्हणून हाक मारल्यावर त्या भानावर आल्या. कसंनुसं हसून त्यांनी  हात उंचावून त्याच्या गालावरून हात फिरवला.
"उशीर झाला रे बाळा. "
"हो ना आई, अगं विनूमामा आणि माईआजी नं... "
"ते कुठं भेटले तुला? "
"अगं, ती एक गंमतच झाली. एअरपोर्टवरून बाहेर पडतो तर विनूमामा समोर उभा सुमो घेऊन. खास घ्यायला आलोय म्हणे तुला"
"पण त्याला कसं कळालं तू कधी येतोय ते? "
सिंधुताईंचा आवाज हळूहळू तीक्ष्ण होऊन चिरकायला लागला होता.
"अगं मीच सांगितलं होतं त्याला फोनवर. "
"म्हणजे तू त्यांना फोन केलास? ", सिंधुताई जवळजवळ ओरडल्याच.
"हो मग काय झालं आई? त्यांचाच आला होता आधी मला एकदोनदा फोन. माईआजी फार छान बोलली बघ. आपणही झालं गेलं विसरून जाऊ या ना आता? "
"काय? ", क्षुब्धतेनं सिंधुताईंचा शब्द फुटेनासा झाला. खरं तर त्यांना ताडताड बोलायचं होतं. काय काय विसरू असं विचारायचं होतं, सगळी त्यांच्या कृष्णकृत्यांची यादी त्याच्या पुढे वाचायची होती. पण त्यातलं त्यांना काहीही करता आलं नाही. रवी बॅगा नीट कोपऱ्यात ठेवताना पाहात त्या तशाच घुसमटत राहिल्या. स्वतःच्या असहाय्यतेची त्यांना एकाच वेळी चीड आणि कीवही आली. तरी आल्या आल्या रडारड नको म्हणून त्यांनी महत्प्रयासाने स्वतःला आवरले. पटकन पदराने डोळे पुसत त्यांनी आपला चेहरा हसरा केला.
"असो. चल तू आता दमला असशील, भुकेला असशील. फ्रेश हो. मी वाढते तोपर्यंत. तुझ्या आवडीची मटकीची उसळ केलीये. ", उसन्या उत्साहाने पदर खोचत त्या म्हणाल्या.
रवी एकदम ओशाळवाणा झाला. खाली मान घालून अजिजीच्या स्वरात म्हणाला, " अगं, मी लगेच इकडेच येणार होतो पण विनूमामाने इतका आग्रह केला की मला मोडवला नाही. तिकडेच घेऊन गेला आधी तो. आणि माईआजीनंही इतका आग्रह केला की बस. मला तिथे खावंच लागलं. त्यामुळे आत्ता भूक नाही गं. पण मी संध्याकाळी जेवेन ना. आलोच मी फ्रेश होऊन".
एवढं म्हणून तो त्यांची नजर टाळून पटकन टॉवेल घेऊन बाथरूमकडे पळाला. त्या त्याच्याकडे पाहात होत्याही आणि नव्हत्याही. नुकतंच बांधलेलं नवं कोरं घर लुटावं तशी त्यांची नजर वैफल्याच्या भावनेने रिती झाली. वेड्या संतापाने मोठ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यांमध्ये लाल शिरांच्या तारा गांडूळांच्या प्रजेसारख्या पसरू लागल्या. स्वतःच्या ही नकळत त्या स्वयंपाकघरात गेल्या. ताट घेऊन कट्ट्यावर ठेवलं. भरून येणाऱ्या डोळ्यांनी प्रयत्नपूर्वक पाहात एकेक पदार्थ वाढून घेतला. ताट उचलून त्यांनी टेबलावर ठेवलं आणि खुर्चीच्या पाठीवर दोन्ही हात गच्च धरून काही क्षण उभ्या राहिल्या. एक क्षणभर त्यांनी डोळे मिटले आणि मग अचानक दु:खाच्या लाटांनी उन्मळून पडाव्या तशा त्या अनावरपणे गदगदून रडू लागल्या.