''श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते''

एक ओठी,एक पोटी,जाणल्यागत वाटते
हात ते फैलावणे,आता न स्वागत वाटते
गोड वाणी मागचे अनुभव कडू आल्यावरी,
बोलणे सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते
भांडला ''कैलास'' इतुका कडकडा सार्‍यांसवे,
मूक माझे राहणेही भांडल्यागत वाटते.
--डॉ.कैलास गायकवाड