संदर्भः- आदर्श गृह सोसायटी घोटाळा प्रकरण
पाहता "आदर्श" कोठे येतसे मजला शिसारी
मातले "आदर्श" इतके वाजते त्यांची तुतारी
सदनिका "आदर्श" मधल्या जाहल्या मृगजळ तयांना
चोरट्यांच्या, लाटण्यास्तव, लागल्या मोठ्या कतारी
हरवले सौभाग्य, त्यांचा घास हिसकाऊन नेला
गांजल्यांना गांजण्या का घेतली त्यांनी सुपारी ?
वाढला नैवेद्य होता दावण्या शहिदास आम्ही
उच्चभ्रू आली गिधाडे चोच माराया विषारी
सर्व बगळे आज म्हणती पाप म्या केलेच नाही
रात्र सारी देहविक्रय ती कशी दिवसा कुमारी?
आज जनगणनेत माझी जात मी सांगू कशाला?
लाचखोरांना असावी वेगळी खानेसुमारी
तापलेला सूर्य आहे बेफिकिर इतका कसा हा?
पोचली नाही तयावर राज्यकर्त्यांची बिमारी
कारगिल दुसरे घडावे वाटते का लांडग्यांना?
तोडुनी लचके शवाचे मज पुन्हा यावी उभारी
दुर्गुणांचे आज जगती वाजती लाखो नगारे
वेडसर "निशिकांत" छेडी सदगुणाची एक तारी
निशिकांत देशपांडे मो न ९८९०७ ९९०२३
E Mail:- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा