पण मी तरूण आहे

साठीस पार केले पण मी तरूण आहे
उम्मीद मज उद्याची दिसते अजून आहे

एकास पार करता नवखेच ध्येय दिसते
मार्गी अखंड चलणे माझा जुनून आहे

आशा जयास नाही उगवेल सूर्य याची
तारुण्य लुप्त त्यांचे जगणे करूण आहे

खर्चू कशास जीवन बघण्यात ओंगळाला ?
बघणे अथांग सुंदर डोळे भरून आहे

जखमा दिल्या जयानी विसरून त्यास गेलो
बघणे न आज मजला मागे फिरून आहे

विकलांग मी जरी मम श्वासात आग आहे
समजू नकात मजला पडलो मरून आहे

उत्सव घरात माझ्या हुंकार वेदनांचा
नियतीस मात देण्या उरलो पुरून आहे

जगणे जयास छळते मरणे पुढेच पळते
लढणेच मार्ग त्यांना जाण्या तरून आहे

"निशिकांत" सांग त्याला मृत्यू समोर येता
भीती तुझ्या मिठीची गेली उडून आहे

निशिकांत देशपांडे    मो. न. ९८९०७ ९९०२३
E Mail:- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा