औपचारिकता आणि सौजन्य

मी ज्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे ते पुस्तक बऱ्याच जणांना अनावश्यक अथवा कृत्रिम वाटू शकेल. मला विचाराल तर मला या पुस्तकाचा वैयक्तिक आयुष्यात तसेच कार्यक्षेत्रात खूप फायदा झाला आहे आणि माझं हे लाडकं पुस्तक आहे.
वागण्याबोलण्यातील मार्दव, औपचारिकात, सौजन्य, माफक प्रमाणात पेहेरावातील अभिरुची आदी गोष्टी कालबाह्य झाल्यासारख्या वाटत असल्या तरी आजही आपण समोरच्याकडून या गोष्टींची अपेक्षा करतोच. या काही मुद्द्यांवर कितीही नाही म्हटलं तरी समोरची व्यक्ती जोखली जाते, तिच्या व्यावसायिक यशापयशाचे, सामाजिक स्थानाचे, मुख्य म्हणजे बुद्धिमत्तेचे आडाखे बांधले जातात. फार कशाला वैयक्तिक आयुष्यात देखील पाहाल तर "आपलं तेच खरं" करून चालत नाही. सर्वांना बरोबर घेऊन चालावं लागतं. सॉफ्ट स्किल्स हे सगळीकडेच कामी येतात. कोणत्याही नात्यात दुसऱ्या व्यक्तीला न दुखावता, पुरेसं अंतर राखून नातं निभवावं लागतं. खलील जिब्रान म्हणतो तसं - "let the winds of the heavens dance between you". ही औपचारिकात, शिस्त आपल्याला कोणी शिकवत नाही याउलट पाश्चात्य संस्कृतीमध्ये या गोष्टींचे रीतसर बाळकडू लहानपणापासून मुलांना दिले जाते. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ही गॅप सांधायचा प्रयत्न करू लागले. आणि खूप वर्षे शोध घेतल्यानंतर मला एक अप्रतिम पुस्तक सापडले. ते हे पुस्तक - "मिस मॅनर्स - गाईड टू एक्सक्रूशिएटिंगली करेक्ट बिहेव्हिअर"
या पुस्तकामध्ये सल्ले दिलेले आहेत. जवळजवळ प्रत्येक सामाजिक, वैयक्तिक, कार्यक्षेत्रातील प्रसंगात कसे वागावे ज्यायोगे आपण आणि आपल्या भोवतालच्या लोकांचे जीवन सुसह्यच नाही तर आनंदी होईल या दृष्टिकोनातून, बारकाईचे पण सोपे असे हे सल्ले दिलेले आहेत.
साधे साधे प्रसंग असतात - आपली एखादी मैत्रीण "अशुद्ध" बोलत असते. आपल्याला खूप कळकळीने वाटत असते की तिला हे सांगावे पण ती दुखावली तर जाणार नाही ना याची भीती देखील मनात असते. मग अशा वेळी दुर्लक्ष करायचे आणि तिला तसेच वाऱ्यावर सोडायचे का? तर नाही आपण कशा रीतीने तिला तिच्या अशुद्ध उच्चाराची जाणीव विनयपूर्वक करून देऊ शकतो ते या पुस्तकात वाचायला मिळेल.
कधी काही गंभीर प्रसंगदेखील असतात जसे - लग्नाआधी माय-लेकींचे जिव्हाळ्याचे संभाषण जे अर्थात "लैंगिक बाबींविषयी" चर्चा करणारे होणार. ते कितपत आवश्यक आहे अथवा नाही अथवा कसे वगैरे.
तर काही इतर देशांमधील रूढी जसे - युरोपमध्ये स्त्री - पुरुष सामोरे आले असता कोण पहिल्यांदा अभिवादन करतो? अमेरिकेत स्त्री करते तर युरोपमध्ये पुरुष करतो वगैरे वगैरे.
अनेक रूढी अशा आहेत ज्या आपल्याला माहीत देखील नाहीत. साहजिक आहे या पाश्चात्य रूढी आहेत. मी हे नाही म्हणत की हे पुस्तक कोळून पिऊन तुम्ही प्रत्येक रूढीचे निष्णात तज्ज्ञ बना पण एक मानसिक बैठक जरूर बनते की काही लोक हे किती समोरच्याचा विचार करून समाजात वावरतात. एक खूप सुसंस्कृत अशी बैठक हे पुस्तक वाचल्यावर लाभते. एक "फिनिश" येतं, समोरच्याला, स्वतःपेक्षा काकणभर सरस लेखण्याची सवय, शिस्त लागते.
भले मग ती अनेकांना कृत्रिम वाटेल. पण मला १० च्या फूटपट्टीवर हे पुस्तक ७ इतकं आवडलं.

(चित्र दुवा क्र. १ येथून साभार : प्रशासक)