मीच आहे घडविले

मी जसा आहे तयाला मीच आहे घडविले
राहिलो तोऱ्यात जगलो ना कुणाला विनविले

आरसा हा दवितो मज चेहरा आहे तसा
मुखवट्याने चेहऱ्याला मी कधी ना सजविले

वाल्मिकी होणे न जमले खंत याची मज नसे
पाप वाल्या कोळियाचे मी न केले करविले

मांडला नाही कधी  मी बाजार दु:खाचा कुठे
पेटलेल्या वेदनाना आसवाने शमविले

सोबती  अंधार आहे मी उजेडा पारखा
गप्प जगलो मी कुणाचे दीप नाही विझविले

सण दिवाळीचा कशाला साजरा करता तुम्ही?
लाउनी पणत्या हजारो का गरीबा हिणविले?

लक्तरे पाहून माझी ना कुणी हेलावले
माझिया गजला सुरानी सर्व लोका रडविले

कोण म्हणतो भार होतो या धरेला आमुचा?
भार ज्यान्चा होतसे त्यानीच का हे ठरविले?

घेतले काहीच नाही या जगी पण मी तरी
श्वापदान्चे पोट भरण्या प्रेत माझे पुरविले

का अशी डोळे मिटूनी न्याय करते देवता?
पोंचलेले हात ज्यांचे पारड्याला झुकविले

काळजी "निशिकांत" आहे जग निघाले हे कुठे?
पांडवांना कोठडी अन कौरवांना मिरविले

निशिकांत देशपांडे    मोंअ. ९८९०७ ९९०२३

E Mail:-  nishides1944@yahoo.com

प्रतिसादाची प्रतीक्षा