का रडाया लागला ?

आसवे नकली जरी ती बोलबाला जाहला
आज मगरीसम जमाना का रडाया लागला ?

आसवे गाळून त्यानी साधली जवळीक पण
मी लपवल्या आसवांचा भाव कोणी पाडला ?

नाटकाचे आज जगती स्तोम इतके माजले
हात मायेचा कधी मज गारद्याचा वाटला

पेटल्या लाखो मशाली फक्त दिसती या जगा
तेवणारा दीप का मग वळचणीला टाकला ?

बेगडी आयुष्य सारे कळवळाही बेगडी
ओंगळाला सजवण्याचा चंग कोणी बांधला ?

मंदिराच्या पायरीवर भक्त ना रुचले मला
माजगा जो नोट टाकी याचका तो चांगला

संपदा गडगंज होती खूप त्याला मित्रही
प्रेतयात्री लाख होते ना कुणी पाणावला

दूर अंधारास करण्या जन्मला तो पण तरी
सूर्य का थकल्या प्रमाणे आज ग्रहणी वागला ?

हात वारूळी मराया घातला "निशिकांत"ने
अस्तिनी तुझियाच होता साप वेड्या नांदला

निशिकांत देशपांडे    मो. न.. ९८९०७ ९९०२३
E Mail:-  nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा