शून्यात विश्व माझे बघतो कधी कधी मी
विश्वास तोलताना चुकतो कधी कधी मी
बघता वळून मागे कोणी कसे दिसेना?
गतकालच्या प्रवाही फिरतो कधी कधी मी
बागेत आज आहे आरास पकळ्यांची
पतझड बघून दारी थिजतो कधी कधी मी
हे वस्त्र जीवनाचे झाले जरी पुराने
नवरंग कुंचल्याने भरतो कधी कधी मी
वैफल्यग्रस्त आहे हा खेळ जीवनाचा
पीण्यास मृगजळाला निघतो कधी कधी मी
अंधा र पाचवीला आहे पुजून माझ्या
दिसता कुठे कवडसे बुजतो कधी कधी मी
चोहीकडे पसरला दुष्काळ भावनांचा
ओले बघून डोळे रुजतो कधी कधी मी
लख लख प्रकाश जगती संबंध काय माझा ?
अंधार शोधण्याला विझतो कधी कधी मी
प्रेतास हक्क आहे नव वस्त्र अन फुलांन्चा
म्हणुनीच कोण जाणे सजतो कधी कधी मी
"निशिकांत" आस तुजला उमलेल फूल याची
काट्यासवे म्हणूनी जुडतो कधी कधी मी
निशिकान्त देशपान्डे मो न. 98907 99023
प्रतिसादाची अपेक्षा