मंदीर मारुतीचे कोणी कुठे हलवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
तो पार मंदिराचा रात्री जमून सारे
सुख दु:ख सांगताना जाती रमून सारे
हुंकार वेदनांचे नव्हते कुणी लपवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
जागेत मम घराच्या झालाय मॉल आता
डीजेवरी डुलूनी धरतात ताल आता
येथे शुभं करोती होते मला शिकवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
विकतो पिझा दुकानी म्हणतात हट तयाला
गर्दी अमाप असते आळस घरी बयाला
आईत अन्नपूर्णा मजला तिने भरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
तांदूळ हात सडीचा शिजवीत माय होती
साजूक तूप माया ओतीत माय होती
सारेच लाड माझे होते तिने पुरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
शाळा इथे असावी तो काळ दूर नव्हता
गणवेष बूट कसले? शिकण्यात सूर होता
आदर्श पाठ येथे होते किती गिरवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
झोतात पश्चीमेच्या का लोप संस्कृतीचा
दिसतोय काळ आला बेभान विकृतीचा
विझण्यास ज्योत आम्ही काहूर का पुरवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E MAIL: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा