भारी पडली जात

भारी पडली जात
पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात
तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात
बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार
जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात
वाटेवरती काटे बोचरे, पसरून होते दाट
आता पोचलो कसाबसा मी, कित्येक खस्ता खात
एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात
आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत
सूर बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती नाक
नसेल जर का आवड माझी, मी बसू कशाला गात?
नारळ फुटला, प्रसाद वाटू, बोलून गेलेत काल
वाट पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो दात
निकाल आला, करुनी माझ्या, परिश्रमास मातीमोल
कर्तृत्वाचा बोर्‍या वाजला, नि भारी पडली जात
भिती मनातील आता तरी तू, पुरुनी दे वा जाळ
अभय जगावे, कसे जगावे, तू घ्यावे करुनी ज्ञात
.
.                                                 गंगाधर मुटे
.........................................................