पीस - ऑन डिमांड!

कधी कधी आजूबाजूच्या वातावरणातली, निसर्गातली शांतता, निर्मळता अगदी अलगद मनात उतरते. एरवी नाहीतर, अगदी निर्विचार मन सापडणं तसं मुष्कीलचं. कधी कसली काळजी, कधी कसलीतरी घाई, कुठलतरी दडपण, नाहीतर सतत विचरांचं चक्र चालूच असतं. पण कधीतरी अचानक असं काहीतरी होतं.... आजूबाजूला एखादं सुंदर दॄष्य दिसतं, किंवा एखादा साधासाच प्रसंग घडतो आणि क्षणात सगळे विचार, सगळी काळजी पुसून टाकली जाते. एखादी मोठी लाट यावी आणि किनाऱ्यावरचा कचरा तिनं एका झटक्यात धुवून टाकावा, तसंच काहीसं! त्याही दिवशी असचं काहीसं झालं.... ऑफीसमध्ये काहीतरी कटकट झाली होती. खूप काम केलं होतं पण हवे तसे रिझल्टस मिळाले नव्हते. काम संपवायला दिवस कमी उरले होते.. बरोबर काम करणाऱ्याला अपघात झाला होता त्यामुळे त्याचंही काम माझ्यावर येवून पडलं होतं.. सगळ्या बाजूंनी डोक्याला ताप नुसता! घरी येवून स्वयंपाकाचं आणखी एक काम नको म्हणून रात्री जेवायला बाहेरच गेलो. मग शतपावली म्हणून निघालो आणि बोलताबोलता बरचं चालणं झालं. घराजवळ पोचतच आलो होतो; आमच्या कम्युनिटी मधल्या स्विमिंग पूल जवळून चाललो होतो आणि अचानक मंद हळूवर बासरीचे सूर कानावर यायला लागले. रात्रीचे ११, ११-३० वाजले होते. आत्ता, ह्यावेळी इथे कोण बासरी वाजवत असेल? आम्ही आपसूक त्या आवाजाच्या दिशेनं ओढले गेलो. पूलचं दार उघडून आत गेलो. पण कोणीच दिसेना. तिथेच आमच्या कम्युनिटीचं लिझिंग ऑफीस आहे. तिथेही आत डोकावून पाहिलं. पण रात्री ११-३० ला तिथे कोण असणार? काहीच कळेना की कुठून इतके सुंदर सूर ऐकू येत आहेत. अक्षरश: बुचकळ्यातच पडायला झालं होतं.

थोडी शोधाशोध केल्यावर 'स्पा'च्या मागे असलेल्या झाडांत काही स्पीकर्स दिसले आणि तिथूनच ते सूर ऐकू येत होते.. कोणी लावली होती सीडी एवढ्या रात्री कोणास ठावूक! आजूबाजूला तर कोणीच नव्हतं. आपल्यासाठीच लावली असेल सीडी अशी सोयीस्कर समजूत करून घेवून आम्ही तिथेच बैठक मारली.. निवांतपणे 'स्पा'मधल्या गरम पाण्यात पाय बुडवून! भरपूर मोठी रपेट झालीच होती. त्यामुळे पाय दुखायला लागले होतेच. त्या बुडबुडणाऱ्या गरम पाण्यात पाय सोडून बसल्यानं फारचं बरं वाटत होतं. एकदम रिलॅक्स्ड! आणि कानांवरती ते मधूर सूर. काही वेगळंच संगीत होतं ते. संथ, हळूवार, गोड, सुरेल संगीत! पूर्वी कधीही न ऐकलेलं; पण पहिल्यांदा ऐकताक्षणी मनाचा ठाव घेणारं... एखाद्या ओल्या फडक्याने पाटी स्वच्छ पुसून टाकावी तसे ते सूर मनातले सगळे विचार पुसून टाकत होते. मनात फक्त शांतता उरली होती. ती ही प्रसन्न. कोणताही कोलाहल नाही. गजबजाट नाही. बाहेरही आणि मनातही..... समोर अतिशय स्वच्छ आणि सुंदर स्विमिंग पूल होता. त्याच्या आतले दिवे चालू होते. पाण्याखालच्या त्या दिव्यांमुळे पाणी उजळून निघालं होतं. क्वचित येणाऱ्या सुखद झुळकेमुळे शेजारच्या झाडांची पानं हळूवार हलत होती. वर आकाशात पाहिलं तर असंख्य चांदण्या नेहमीच्याच उत्साहानं लुकलुकत होत्या. आजूबाजूच्या सगळ्या वातवरणात एक सुखद हार्मनी जाणवत होती. मिलाफ होता. भोवतालची प्रसन्नता अगदी अलगद मनात उतरली होती आणि मनातली भोवताली.....

एरवी मला सतत कसली ना कसली बडबड करायची असते. बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. पण त्या वेळी अगदी नकळत मी शांत झाले. तीन चार तासांपूर्वी ऑफीसमधून घरी आले तेव्हाची तणतण, कटकट कुठल्या कुठे विरून गेली. सगळा मूडच पार बदलून गेला. कानावर ते सूर झेलत, कधी डोळे मिटून तर कधी ते दृश्य डोळ्यांत साठवून घेत; असेच कितीतरी वेळ आम्ही बसून राहिलो. आजही ते आठवलं की त्या दिवशीचं सगळं दॄश्य पुन्हा अगदी तसच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. तीच प्रसन्नता, पुन्हा तितक्याच उत्कटतेनं अनुभवायला मिळते.

मला नेहमी वाटतं की आणखीन काही वर्षांनी जेव्हा माझ्याच आयुष्याकडे मी मागे वळून पाहीन, तेव्हा हे असे क्षण नक्की आठवतील. अनपेक्षित आनंदाचे, निर्मळ प्रसन्नेतेचे हे क्षण आपण भरभरून अनुभवले; ही जाणीव नक्कीच समाधान देवून जाईल. असाच अनुभव आला होता जेव्हा स्वामी विवेकानंदांच्या कन्याकुमारीमधल्या स्मारकात आम्ही गेलो होतो... बरोबर मित्रमैत्रिणींचा ग्रुप. कॉलेजलाईफ नुकतंच चालू झालेलं. हळवं, निसरडं, प्रेमात पडण्याचं वय. मला कुणीतरी आवडायला लागलं होतं, पण त्याला दुसरीच कोणी आवडतीय की काय, असं वाटतं होतं. मग थोडीशी चिडचिड, हुरहूर, सतत बरोबर राहण्यासाठीची धडपड, ट्रीपमधल्या अगदी बारिकसारिक घटना, प्रसंगावर विचार करणं, स्वतःच्याच मनाशी अर्थ लावत बसणं वगैरे वगैरे.... मनात विचारांची भाऊगर्दी... गोंधळ... स्मारकाकडे जायला बोटीत बसलो आणि बोटीनं असे काही हेलकावे खायला सुरूवात केली... कधी एकदा पोहोचतोय असं झालं नुसतं. दुपारचं कडकडीत ऊन होतं. पोहोचलो तर बाहेर ही एवढ्ढी भली मोठी रांग.... उन्हातही उभं राहवं लागलं बराच वेळ. परिस्थितीनं आणि मनस्थितीनं वैताग आणला होता, एवढं खरं. अखेर एकदाचं आत जायला मिळालं.

एका प्रशस्त हॉलमध्ये तसा अंधारच होता, आत पाउल ठेवताक्षणी सुखद गारवा जाणवला. समोरच एक भला मोठा 'ॐ' होता. 'ॐ' अक्षरामागे निळसर प्रकाश होता. निळ्या प्रकाशात उजळलेल्या त्या 'ॐ' कडे बघून इतकं शांत आणि इतकं हलकं वाटलं! शेजारी स्वामी विवेकानंदांचं स्मृतीचित्र होतं. त्याकडे नुसतं बघूनही एकदम प्रसन्न वाटलं. 'ॐ' समोर सगळे जण डोकं टेकून, नमस्कार करून पुढे जात होते. मी ही तेच केलं. जास्त थांबायला वेळ नव्हता कारण मागे लोकांची रांग होती. पण त्या दोन क्षणांतही आधीचा सगळा त्रास, व्याप, ताप पुसून गेला. मनातले सगळे विचार, द्वंद्व एकदम थिजून गेल्यासारखं झालं. निरामय शांततेचे काही क्षण अनुभवायला मिळाले.

असा एखादाच अनुभव, असं एखादंच दॄश्य अगदी अनपेक्षितपणे मन भरून टाकतात. उदबत्तीच्या सुगंधानं एखादी खोली भरून जावी तसे मनातले कानेकोपरे सगळे त्या शांततेनं, प्रसन्नतेनं भरून जातात. असे जास्तीत जास्त क्षण गोळा करता यावेत, असं वाटतं राहतं. पण त्यांच्या मागे धावून ते नक्कीच मिळत नाहीत आणि कधी ध्यानीमनी नसताना अचानकपणे गवसतील; हे सांगताही येत नाही. एकदा ताईच्या मुलीला झोपविण्याचा प्रयत्न करत होते. ६ महिन्यांचं लहान बाळ. डोळ्यावर झोप आली होती पण झोप लागत नव्हती. आधी फिरवलं, हिंडवलं. मग माझ्या दिव्य अशा आवाजात थोडंसं गाणंही गुणगुणलं(! ) शेवटी मीच कंटाळले आणि तिला पलंगावर ठेवलं. पाणी पिऊन आले आणि बघते तर ती झोपली सुद्धा. क्षणार्धात गाढ झोपी गेलेला तो छोटा निरागस चेहरा... कसली काळजी नाही. भविष्याची चिंता नाही... तिच्याकडे बघून नकळत माझं मन निवांत झालं. एका इंटरव्ह्यूला जावून आले होते. काय करायचं, काय नाही, असंख्य विचार पळत होते... शांत निजलेला तो जीव पाहिला आणि सगळे विचार अचानक बंद पडले.

आजही कधी मनात खूप कडकड झाली, डोक्याला ताप झाला की मी माझ्या भाच्चीचा तो निरागस चेहरा आठवते किंवा विवेकानंद स्मारकातला तो निळा 'ॐ', नाहीतर स्विमिंग पूल जवळ ऐकलेले ते बासरीचे हळूवार सूर...! आणि खूप शांत वाटतं. पीस - ऑन डिमांड! हवी तेव्हा मन:शांती! अर्थात, हे प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. पण ह्या प्रसंगांच्या आठवणी मुद्दाम मनात आणल्या तरी मनावर हलकी फुंकर घातल्यासारखं नक्की वाटतं. त्या त्या वेळी जी काही चिडचीड, कटकट झाली असेल ती क्षणभर का होईना पण विसरायला होतं. 'झालं गेलं गंगेला मिळालं' म्हणून पुढच्या क्षणाकडे नव्यानं पाहता येण्याची शक्यता तरी निर्माण होते. पीस - ऑन डिमांड ही कल्पना पहिल्यांदा ऐकली तेव्हा ऐकताक्षणी मला हा शब्दप्रयोग इतका आवडून गेला! आजकाल इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या युगात पाहिजे त्या वेळी, पाहिजे ती टी. व्ही. सिरियल व्हिडिओ - ऑन डिमांड सारख्या सुविधेमुळे बघणं शक्य आहे, मनात एखादं गाणं आलं तर पुढच्या मिनिटाला ते ऐकता येईल अशी ऑडिओ - ऑन डिमांड सोय पुरवणाऱ्या वेबसाईटस आहेत. अशीच जेव्हा हवी असेल तेव्हा मन:शांती मिळवायचीही सोय करता येवू शकते; अशी अचानक मला जाणीव झाली; जेव्हा मी पीस - ऑन डिमांड हा शब्दप्रयोग ऐकला...! कुठल्याच वेबसाईटवर 'लॉग इन' करण्याची गरज नाही. फक्त हृदयात जपलेल्या प्रसन्न आठवणी मनात आणून पाहायचं!