असा गंधर्व पुन्हा न होणे..!!

भीमसेन जोशींचे निधन.. ऑफिस मध्ये आल्या आल्या 'सकाळ' वर ही बातमी वाचली.

खूप धक्का बसला वगैरे म्हणता येणार नाही. कारण गेले काही दिवस त्यांच्या तब्येती विषयी काहीबाही ऐकायला येतच होते. आणि एकंदरीत  त्यांचे वय पाहता  मनाला पुढील अशुभाची चाहूल लागली होती. पण म्हणतात ना, आनंदाच्या झाडाची कितीही फुले तोड़ता आली तरी 'आणखी हवे' चा पुकारा मन काही थांबवत नाही. तसेच पंडित भीमसेन जोशींचे गाणे.. कितीही ऐका, दरवेळी नवा सुगंध येतो त्यातून. जिवंतपणी समाधीचा अनुभव घ्यायचा असेल तर पंडितजींच्या गाण्यासारखे दुसरे साधन नाही.. या गारुडातून कोणाचीही सुटका झाली नाही. मग तो अगदी एखादा सुपरस्टार असो किंवा एखादा 'माउलीच्या भेटीला' निघालेला वारकरी .. त्यांच्या अलौकिक स्वरांनी जेथे साक्षात पंढरीच्या विठोबाला भरून टाकले तिथे तुमच्या-आमच्यासारख्या मर्त्य मानवांची काय कथा हो? 

       माझी खात्री आहे, आता आकाशातले तमाम देवदेवता आनंदात असतील... इतकी वर्षे या गंधर्वाला भूलोकावर पाठवल्यामुळे रिकामा झालेला त्यांचा दरबार आता भरला असेल. पण ही पृथ्वीवरची मैफल संपली त्याचे काय? 

      असा निराश विचार मनात आला, पण तितक्यातच असे वाटले की अरे, पंडितजींनी आपल्या सर्वांना सुरांचा जो अमूल्य ठेवा दिला आहे तो एक नाही तर सात जन्म पुरणारा आहे मग काळजी कशाला?