गाढव

निमित्त होतं ते कल्याणगडावरच्या स्वारीच! 'गाढव' ह्या प्राण्याचा इतक्या जवळून अनुभव पहिल्यांदाच घेता आला. हनुमान मंदिराच्या बाहेरच त्या गाढवाच्या मादीनं एका पिलाला जन्म दिलेला. जेमतेम २-३ दिवसांच ते ''गाढवाचं' पिलू पाहून जरा आश्चर्य, आणि सोबतच गंमत पण वाटली. पिलू अतिशय नाजूक आणि गोंडस होतं. आपल्या आईच्या पायात घुटमळणार ते पिलू पाहून मजा येत होती. ते ह्या जगाशी एकदम अपरिचित होतं. एखाद्या कुत्र्या - मांजराच्या पिलाला आपण ज्या प्रकारे जवळ करतो, कुरवाळतो त्याच प्रकारे त्याला सुद्धा जवळ करायचा मोह मला होत होता. ते एक 'गाढव' आहे हि भावना अजून मनाला शिवलीपण नव्हती. त्याचे अनेक फोटो काढले. त्याची आई पण आम्हाला त्याच्या बऱ्यापैकी जवळ जाऊन देत होती. शेवटी हळूच मी त्या गोंडस पिलाला हात लावून पहिला. ते घाबरून त्याच्या आईच्या पाठीमागे जाऊन लपून बसलं. मी आणि डी. जे. दोघाही ह्या गोष्टीचा मस्त पणे अनुभव घेत होतो.

इतर प्राण्यांच्या पिलाशी तुलना केली असता त्या गाढवाच्या पिलाच्या आचारात फार काही वेगळं - नव्हे 'गाढवपणा' जाणवला नाही. सगळीकडे शांतता होती. त्या 'गाढवांच्या' पायांच्या आवाजाखेरीज कसला च आवाज नव्हता. मनात मात्र एक विचार सालात होता.. शेवटी न राहून मी शांततेचा भंग केला, "काय रे डीजे, आपण माणसं गाढवाला इतके कमी का लेखतो रे? आणि आपण एखाद्याला 'गाढव' म्हणून हाक का बरं मारतो? आणि गाढव च का? इतर कोणता प्राणी का नाही? "

दोन मिनिटं शांतता होती. नंतर डीजे नि काहीतरी विचार करून बोलायला सुरुवात केली.. "हे बघ वेड्या, आपण माणसं गाढवाकडून कामं करून घेतो, आणि ते पण मुकट्यानं दिलेलं काम एकदम प्रामाणिकपणे पणे पार पाडतं. "

"हो बरोबर, मग ह्याचा आणि कोणी कोणाला 'गाढव' म्हणून चिडवण्याचा काय संबंध? " - मी उलटप्रश्न केला. डीजे नि पुढे काय बोलायचं ते मनात ठरवलेलं असावं. तो उत्तरू लागला- "माझ्या मते प्रामाणिकपणा, सहनशीलता, कष्ट करण्याची तयारी ह्या सगळ्याचं दुसरं नाव म्हणजे 'गाढव'...... कळलं का आता? "

पुढची काही मिनिटं विचार करण्यात गेली. गोष्ट खूपच विचित्र होती पण मनाला हळूहळू पटायला लागली होती. मी परत एकदा तोंड उघडलं - " अरे डीजे, तुला ती लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवतीये? ते गाढव कामचुकारपणा करत असतं आणि रोज नदीच्या पाण्यात जाऊन आपल्या पाठीवरचं ओझं कसं कमी होईल त्याचा प्रयत्न करत असतं....; खरंच ते गाढव असतं का रे? की त्याच्या जागी कोणी माणूस असतो? माझ्या मते तर माणसानं स्वत:ला उघडं पाडायला नको म्हणून 'माणूस' ह्या शब्दाऐवजी त्या गोष्टी मध्ये 'गाढव' हा शब्द वापरला असावा. " "खरंय वेड्या तुझं. अरे इथे प्रामाणिकपणानं काम करणाऱ्याला 'गाढवासारखंच' वागवलं जातं..... कष्ट करून आपल्या आयुष्याचा गाडा ओढणारा इथे गाढव असतो, चांगलं काम करणारा हा पण इथे गाढवच की.. एखाद्या कष्टाच्या कामाला इथे "donkey work" असं संबोधलं जातं. बऱ्याच वेळेस एखाद्याच्या भोळ्या स्वभावाला आपण माणसं काहीही विचार न करता 'गाढवपणा' म्हणतो.. "

"कळलं, कळलं साहेब... गाढव म्हणजे काय ते अगदी व्यवस्थित कळलं बरं का... बरं मग डीजे, मला सांग माणसाची व्याख्या कशी करता येईल? " - मी त्याला मध्येच तोडत बोललो.

"अरे अगदी सोपं आहे... त्या निरागस प्राण्याच्या प्रामाणिकपणाला 'गाढवपणा' अशी उपाधी देणारा म्हणजे माणूस. गाढवांच्या कष्टाचा उपयोग करून स्वत:ची प्रगती साधणारा म्हणजे माणूस... अन्याय, अत्याचार करणारा तो माणूस आणि ते सहन करणारा पण माणूसच की.. दुसऱ्यांवर होणारा अन्याय बघत बसणारा म्हणजे माणूस....

आणि अगदी पुढे जाऊन विचार केलं तर समाजातील खऱ्या 'गाढवांना' चा आपला प्रतिनिधी बनवणारा तो खरं माणूस.... पर्यावरणाचा ऱ्हास करून आपली उन्नती करू पाहणारा तो खरा माणूस.. सगळं कळत असून पण न कळल्यासारखं वागणारा म्हणजे माणूस.. अजून 'माणसाच्या' किती व्याख्या देऊ तुला वेड्या? "

"डीजे, तू जे बोलतोयस ते सगळं भिडतंय रे मनाला.. पण आता एक प्रश्न पडायला लागलाय... नक्की जगायचं कसं मित्रा? स्वत:ला गाढव म्हणवून ताठ मानेनं जगायचं की माणूस म्हणून एखाद्या पशूप्रमाणे जगायचं? "

खरं तर दोघांनाही प्रश्नाचं उत्तर माहीत होतं.. पण दोघांनाही ते ओठावर आणून व्यक्त करायची हिंमत झाली नाही... कारण दोघांनीही कधी ना कधीतरी 'माणूसपणा' केलाच होता की....