महाराष्ट्राचे शेक्सपियर आणि आपण

इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं. राज्य, सत्ता आणि मुलुख किती महत्त्वाचा हे इंग्रजांना सांगायला नको. तरीही ते काय म्हणतात पाहा. ते म्हणतात, ''एक वेळ आम्ही आमचं इंग्लंड देऊ, पण आमचा शेक्सपियर कोणाला देणार नाही. '' आता ह्या पार्श्वभूमीवर आपलं बघा. राम गणेश गडकऱ्यांना गौरवानं ' मराठीचे शेक्सपियर 'असं म्हंटलं जातं. गडकऱ्यांचा तो गौरव अगदी सार्थ आहे. महाराष्ट्राचे शेक्सपियर असलेल्या राम गणेश गडकऱ्यांची जन्मतारीख आहे २४ मे १८८५. म्हणजे २४ मे २०१० ते २४ मे २०११ हा काळ गडकऱ्यांच्या १२५ व्या जयंतीचा काळ आहे. २०१० हे वर्ष महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणूनही गाजले. पण त्या वर्षात गडकऱ्यांची १२५ वी जयंती देखील आहे आणि आपण ती साजरी करावी हा विचार कोणाच्या मनात आल्याचे ऐकिवात नाही. इंग्रज त्यांच्या शेक्सपियरला जेवढे मानतात, तेवढी नाही, पण निदान वरवरची दखल तरी आपण आपल्या शेक्सपियरच्या म्हणजे राम गणेश गडकऱ्यांच्या बाबतीत ह्या महाराष्ट्रात घ्यायला हवी होती याबद्दल दुमत होऊ नये.

ह्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात ठाण्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनातील २६ डिसेंबरच्या एका कार्यक्रमाचा उल्लेख इथे आवर्जून करायला हवा. साहित्य संमेलनात प्रकाशन कट्टा नावाचे व्यासपीठ उपलब्ध करण्यांत आले होते. त्या व्यासपीठावर रामगणेशगडकरी डॉट कॉम ()ह्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा राम गणेश गडकरी - वेबसाईट झाला. आज हे संकेतस्थळ जगातील सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. गडकऱ्यांच्या १२५ व्या जयंती वर्षात हा कार्यक्रम झाला ही मराठीतील फार महत्त्वपूर्ण घटना मानायला हवी. याचं कारण हे संकेतस्थळ पूर्णपणे मराठी आहे, आणि त्यावर गडकऱ्यांचे समग्र साहित्य वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे. एकच प्याला पासून ते प्रेमसन्यास आणि भावबंधनपासून ते राजसन्यास आणि वेड्याचा बाजार पर्यंत गडकऱ्यांची संपूर्ण नाटके त्यावर उपलब्ध आहेत. हा सारा मजकूर युनिकोड तंत्राने उपलब्ध केलेला असल्याने गडकऱ्यांच्या नाटकातील एखादा संदर्भ शोधायचा झाला तर तो गुगलच्या सर्च पद्धतीने शोधता येतो. गडकरी साहित्यासाठी अशी सर्चची सोय जगात आजपर्यंत उपलब्ध नव्हती, ती ह्या संकेतस्थळाने प्रथमच उपलब्ध केली आहे. जगभरातील गडकरी साहित्याच्या अभ्यासकांची फार मोठी सोय त्यामुळे झाली आहे यात शंका नाही. नाटकांव्यतिरिक्त गडकऱ्यांचा काव्यसंग्रह 'वाग्वैजयंती', विनोदी लेखन 'संपूर्ण बाळकराम' वगैरे सर्व पुस्तके पूर्णपणे ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

खरं तर मराठी वृत्तपत्रांनी ह्या संकेतस्थळाच्या उपलब्धतेच्या बातम्या, आणि संबंधित माहिती सविस्तर द्यायला हवी होती. पण एकूण संमेलनाच्या गाजावाजात हे ऐतिहासिक काम गडकरी जसे गेल्या वर्षी दुर्लक्षित राहिले, तसेच दुर्लक्षित राहिले. मराठीत एखाद्या लेखकाचे समग्र साहित्य उपलब्ध करणारी संकेतस्थळे (क्वचित एखादा अपवाद वगळता) जवळजवळ नाहीत. अशी संकेतस्थळे उपलब्ध करणारांना खरं तर शासनाने आणि मिडियानेही प्रोत्साहन द्यायला हवे. एकीकडे मराठीचे दिवस वाईट आलेत, मराठी मरणोन्मुख झाली आहे असा आक्रोश करायचा, आणि दुसरीकडे मराठीत होणाऱ्या उत्तमोत्तम कामांनी दुर्लक्षित रहायचे हा दुर्दैवी विरोधाभास आहे.

ह्या बाबतीत आपण सर्व वाचकांनीही पुढाकार घ्यायला हवा. रामगणेशगडकरी डॉट कॉम ही साईट आपण सर्वांनी पहायला हवी, आणि त्याची माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला आपण आवर्जून द्यायला हवी. ही वेबसाईट मोफत आहे. त्यावर कोणत्याही जाहिराती नाहीत. त्यामुळे ह्या साईटच्या निर्मात्यांचा उद्देश व्यावसायिक नाही हे स्पष्ट आहे. एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणून ह्या भल्या मोठ्या साईटची निर्मिती अतिशय परिश्रमपूर्वक करण्यांत आली आहे. अशा प्रयत्नांना आपण वाचकांनी प्रोत्साहन द्यायलाच हवे. आपल्या सर्व मित्र परिवारांना अशी अस्सल मराठी ग्रेट साईट आल्याचा संदेश आपण एसएमएस करून पाठवायला हवा. ईमेलवरूनही हे कळवायला हवे. मोबाईलवर बोलताना तर हे आठवणीने सर्वांना सांगायला हवे. संपूर्ण साईट उभी करण्याचे काम कुणीतरी केले आहे. आपण निदान त्याचा प्रसार करण्यासाठी एखादा एसएमएस आणि एक ईमेल निश्चितच करायला हवी. आपल्या मित्र मैत्रिणींनाही आपण रामगणेशगडकरी डॉट कॉम ची माहिती सर्वांना पाठविण्याची विनंती आणि आग्रह करायला हवा. एवढं आपण करायलाच हवं. मराठीसाठी तेवढं केल्याचं समाधानही फार मोठं असेल यात शंका नाही.