काय असते लोकशाही? लागले समजावयाला
म्हैस ती दुभती निघाली अंगणी बांधावयाला
खाद्य चारा त्या म्हशीचा कोण खाते देव जाणे
घेतली चरवी निघाले धार ते काढावयाला
देव दासी आज झाली वाटते ही लोकशाही
तिजकडे वेळीअवेळी राबता छेडावयाला
बँक परदेशीच लागे राज्यकर्त्या चोरट्यांना
इभ्रतीची टांगती ते लक्तरे वाळावयाला
"नव पिढीला वाव द्यावा" मागणीचे काय झाले ?
आपुली औलाद नेते लागले थोपावयाला
ही कशी हो प्रेत यात्रा लोकशाहीची निघाली !
ठार करणारेच आले आज खांदा द्यावयाला
लोकशाहीचे कलेवर जाळणाऱ्या त्या चितेवर
राज्यकर्ते लागले बघ भाकऱ्या भाजावयाला
धर्म बुडता जन्म घेइन वायदा होता तुझा रे !
झडकरी यावेस देवा दानवा दंडावयाला
का हवा "निशिकांत" ईश्वर प्रश्न अपुले सोडवाया ?
पेटवू या रान सारे राक्षसा जाळावयाला
निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा