असाही एक समारंभ!

याआधी- एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!

आजीकडे तिच्या वाढदिवसाचे फोटो पहायला काही खास दोस्तमंडळी जमली होती, त्यांच्या फर्माइशीवरून व्हेज पुलाव आणि कॉर्न पॅटिस करून नेले होते. शिवाय आजीने एक प्रकारचे क्रिमसॉसमधील श्वाइनफ्लाइश ( पोर्क) ३, ४ प्रकारचे केक्स, कॉफी इ. तयारी केलीच होती. गप्पा मारत, खिदळत फोटो बघत असताना हान्स विमेलमान आजोबांचा विषय निघाला. हे विमेलमान आजोबा आता ९० वर्षांचे होणार होते. चार महिन्यांपूर्वी ८६ वर्षांची विमेलमान आजी कार्डिअॅक अॅरेस्टने पटकन निघूनच गेली तेव्हापासून ते जरा सैरभैर झाले होते. त्यांचा मुलगाही साठीच्या पुढचा, हानोफरला राहणारा असल्याने एवढ्या मोठ्या घरात कशाला रहायचे अशा विचाराने घर बंद करून त्यांनी त्यांची रवानगी वृद्धालयात करून घेतली होती. हानोफरचाच असलेल्या हान्सीयुर्गानने सारी जबाबदारी आपणहून शिरावर घेतली होती. हे आजोबा नव्वदीत पोहोचले असले तरी ठणठणीत होते, आता वयानुसार कधी काही विस्मरण होते त्यांना पण तशी प्रकृती उत्तम आहे दर १५ दिवसांनी बोलिंगला आता आता पर्यंत ते स्वतः गाडी चालवत येत असत, हल्लीच गेले काही महिने हान्सीयुर्गानच त्यांना आणतो आणि पोचवतो. आता हा हान्सीयुर्गान म्हणजे ह्याच वर्षी ७० वा वाढदिवस साजरा करणारा तरुण आहे. आजोबांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचा विषय त्याने त्याच्या मुलापाशी काढला पण मुलगा आणि सून दोघेही अजिबात उत्साही दिसले नाहीत. त्यांदोघांनी चिकार कारणं सांगितली, अळंटळं केली. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की मुलगा आणि सुनेला ह्या म्हाताऱ्याचे काही करायला नकोय आणि पैसा तर हवा आहे!

हा गौप्यस्फोट त्याने ह्या फोटो बघण्याच्या गेट टू गेदर मध्ये केला. सगळी मित्रमंडळी ७० च्या पुढचीच, सगळेच हळहळले. हान्सीयुर्गान बहुतेक मनाशी काही योजूनच आला होता. त्याने सर्वांना सांगितले, " आपणच सर्वांनी मिळून हा समारंभ करायचा आणि त्याच्या एकुलत्या एका मुलाला आणि सुनेला पाहुण्यासारखे बोलवायचे. " सर्वांनी टाळ्या वाजवून त्या कल्पनेचे स्वागत केले. बाकीचे लोकं आजीच्या बड्डेची फिल्म बघण्यात गुंग असताना आकिम आजोबा आणि हान्सीयुर्गानने आमंत्रितांची लहानशी यादी केली. दुसऱ्या खोलीतून विमेलमान आजोबांच्या वृद्धालयात फोन लावला आणि तेथे खालीच तळमजल्यावर असलेल्या हॉलमध्ये वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. कॉफी, खुर्च्याटेबलं आणि कपबशा, पेले इ. ची व्यवस्था तेथे होणार होती. थोडेसे डॅकोरेशनही तेथील लोकांनी करू असे सांगितले. मग हान्सीयुर्गानने सर्वांना घरून एकेक केक करून आणायला सांगितले, सगळ्यांनी त्याची कप्लना उचलून धरली आणि ही मिटिंग बरखास्त झाली. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती! हे सार्वत्रिक सत्य आहे हे तिथे मला समजले.आम्ही चौघं जण त्या दिवशी दुपारी केक करून घेऊन निघालो. वृद्धालयात पोहोचलो तर स्वागताला हान्सीयुर्गानकाका आणि मार्लिसकाकू तयारच होते. विमेलमान आजोबा सूटाबूटात एका सोफ्यावर अगदी तयार होऊन बसले होते. आम्ही आमचे केक तेथल्या टेबलावर ठेवत असतानाच एकेक जण येऊ लागले आणि विशेष म्हणजे प्रत्येक जोडप्याने किमान एक केक बरोबर आणला होता. विमेलमान आजोबांचा मुलगा आणि सूनही तिऱ्हाइतासारखे आले. हान्सीयुर्गान काकाच त्यांचा मुलगा असल्यासारखा सगळ्यांचे आगत स्वागत, हवे नको पाहत होता. झेक्टची बाटली उघडून (जर्मन शँपेन) सर्वांचे प्याले भरले आणि विमेलमान आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या! त्यांनीही सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. अर्थात जीवनभर साथ दिलेल्या आजीची आठवण तर त्यांना येत असणारच पण त्यांनी अतिशय संयमित शब्दात "आज ती असती तर आज अजून मित्रमंडळींना बोलावून झक्कपैकी दिवसभराचा समारंभ केला असता, आमच्या लग्नाच्या डायमंड ज्युबिलीसारखा.. " एवढे एकच वाक्य बोलून सगळ्यांना प्रोस्ट म्हणजे चियर्स करून झेक्टचा प्याला ओठाला लावला. नंतर सर्वांना जाग्यावर बसायला सांगून कॉफी आणि केकचा आस्वाद घ्यायला सांगितला. सगळ्यांनी काफे उंड कुकनचा मनमुराद आस्वाद घेतला. हसत, हसवत दोन तास सर्वांनी मजेत घालवले. विमेलमान आजोबा एवढा वेळ सर्वांच्यात बसले होते, त्यांना खोलीत जाऊन आराम करायची अजिबात गरज वाटली नाही.

काफे उंड कुकन झाल्यावर हळूच हान्सीयुर्गान काकाने आम्हाला दोघांना बाहेर बोलावले आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली विमेलमान आजोबांची खोली दाखवतो असे म्हणत लिफ्टचे बटण दाबले. आम्ही आजोबांची खोली पहायला गेलो. त्यांना घरासारखे वाटावे म्हणून त्या खोलीत या माणसाने ह्या खोलीत पूर्वी असलेले सामान बाहेर काढायला लावून आजोबांच्या घरातले लहानसे लाकडी कपाट, त्यांचा पलंग आणि साइड टेबल आणवले आणि त्यांना त्यांच्या घरातीलच खोलीत आहोत असे वातावरण केले. ते पाहताना खरचं भरून आले. आम्ही खाली आलो तर आमच्या आजीने आमच्या चेहऱ्यावरुनच आम्ही विमेलमान आजोबांची खोली बघून आलोत हे ओळखले. थोडा वेळ अंतर्मुख व्हायला झाले पण आता निघायची वेळ होत आली होती. विमेलमान आजोबांचा मुलगा आणि सुनेला आम्ही प्रथमच पाहत होतो, त्यांची ओळख करून द्यायला आजी विसरली नाही. ह्या हृद्य समारंभाला हान्सीयुर्गान काकाने आम्हालाही बोलावले त्यामुळे नाती आणि मैत्री अशीही जपतात हे समजले.