मंडई

"कुठे राहतो रे तू ? " अस कोणी विचारायचा औकाश , माझं उत्तर तयार असायचं. - "मंडई मध्ये राहतो ".
तेव्हढ्या उत्तरावरून समोरच्याला माझ्याबद्दल पुरेशी कल्पना यायची.

दर रविवारी काका आठवड्याची भाजी न्यायला यायचे. मी पण त्यांच्या बरोबर मंडई मध्ये जायचो. मंडई च्या विस्तीर्ण छताखाली प्रवेश केल्या केल्या कानावर वेगवेगळ्या आवाजांचा भडिमार व्हायचा. - "घ्या कोथिंबीर घ्या .. तीन ला एक , पाच ला दोन "...
बाबा नसल्यानं काकांचाच तेवढा धाक असायचा आमच्यावर. असले शब्द कानावर पडताच काकांच ठरलेलं वाक्य असायचं - "बघून घे वेड्या , जर मार्क नाही पाडलेस तर तुला बसवणार तिथे ..  "
त्यांच्या बरोबर आख्खी मंडई पालथी घालायचो. मंडईतून बाहेर पडताना ते नेहमी म्हणायचे , "छे, आज काही भाजी च नव्हती मंडई मध्ये "... ह्या शब्दांचा अर्थ तेव्हा जरी कळला नसला तरी आता मात्र अगदी व्यवस्थित कळतो.

रोज संध्याकाळी आई बरोबर भाजी आणायला जायचो. 'आज तरी काही खाऊ मिळेल' इतकीच माफक अपेक्षा मनात असायची.
रस्त्यातून जाताना त्या बुरुडांच्या वस्तीतून -  "काय बोंबल्या, भाजीला का? " असे एक-दोन तरी आवाज कानावर पडायचे. मग मी पण हळूच लाजून 'हो ' अस उत्तर द्यायचो आणि पुढे निघून जायचो.
घरापासून मंडई अगदी पन्नास- शन्भर मीटर अंतरावर आहे. तरीपण आई रात्री उशिरा भाजी घ्यायला का बाहेर पडायची ह्या गोष्टीच तेव्हा फार नवल वाटायचं.  त्याला पण एक कारण होत हे आत्ता आत्ता कळायला लागलं. संध्याकाळी भाजी सकाळपेक्षा जवळपास निम्म्या किमतीत मिळायची. त्यासाठी आईची सगळी खटपट.
रोज 'खाऊ घे, खाऊ घे ' अस मागे लागल्यावर आठवड्यातून एकदा ती 'तुकडा बिस्किट' चा सात रुपयांचा पुडा घ्यायची. तो पुडा घरी आल्यावर काही मिनिटांमध्ये संपून जायचा हे सांगायला नकोच.
आनेक वर्ष 'केळ' हे एकच फळ आम्हाला माहीत होत. रात्री त्या केळी विकणाऱ्यांना आपली गाडी बंद करून घरी जायची घाई लागली असायची. त्यामुळे सहा रुपये डझन असणारी केळी मग पाच रुपय्यानं मिळायची. त्याच केळ्यांच्या शिकरणीवर मी आणि ताई जोरदार ताव मारायचो.
-----
सकाळी दहा ला होणारा 'भोंगा' म्हणजे मंडई च अजून एक वैशिष्ट्य . अनेकांचा नित्यक्रम त्यावर अवलंबून असायचा.
संध्याकाळची गणपतीची आरती आणि तो घंटानाद संपूर्ण परिसरात आजही घुमतो.
जशी विचारांची उंची वाढली, तशी मंडई मला हळू हळू उलगडत गेली.
रात्री उशिरा पर्यंत जागून बांबूच्या काड्यांशी काहीतरी करत बसलेले बुरूड दिसायचे. आजही दिसतात.
तिथून जाताना 'बोंबल्या sss ' ह्या हाकेसाठी मी आजही आसुसलेला असतो. क्वचितच कधीतरी, पण  आजही ती हाक ऐकू येते.
भाजी विकायला बसलेले अनेक मित्र भेटतात. कधीकाळी माझ्याच इयत्तेत शिकणारे, माझ्याबरोबर  गोट्या आणि क्रिकेट खेळलेले ते परिस्थितीमुळे भाजी विकू लागले.
मग मी सहानुभुती म्हणून त्यांच्याकडून भाजी विकत घ्यावी. पावशेर घेताना चार शेंगा त्यांनी जास्तीच द्याव्यात.
 आणि भाजीचे पैसे घेताना त्यांनी म्हणावं, 'अरे वेड्या, तुझ्याकडून कसले पैसे रे?? ठेव तुलाच '..
असे हे सगळे खरे 'श्रीमंत' मित्र बघून कधी कधी स्वतः:चीच कीव येते. 

संध्याकाळी कधी तिथल्या उकिरड्यावरून अन्न वेचून वेचून खाणाऱ्या आजीबाई दिसतात. आपण त्यांच्याकडे पाहव आणि त्यांनी आपल्याला एक मस्त 'समाधानी' हास्य द्यावं.

आजही 'शंकरराव' दिसतात. लोकांच मॉलिश करून द्यायचा त्यांचा  धंदा इतक्या म्हातारपणी आजही त्यांनी सुरू ठेवलाय. त्यांच्यावर नजर भिडावी आणि त्यांनी आपलेपणानं विचारावं - 'ए बोंबल्या, तुझं देऊ का रे मॉलिश करून ? '..
आपल्याला रस्त्यात शर्ट काढून मॉलिश करून घ्यायची लाज वाटावी आणि मग त्यांना नकारायच. पण त्याला  त्याचं  उत्तर तयार असत- 'अरे, तुझ्या बापाच मॉलिश करून द्यायचो मी .. तू कशाला लाजतोय ?? हे हे हे  ' ....

डाळिंब विकण्यार्या त्या काकांची मला लहानपणी खूप भीती वाटायची. त्यांची ती भारदस्त अंगकाठी, पीळदार मिशा... आजही ते त्याच जागेवर डाळिंब विकताना दिसतात. फक्त आता त्या मिशा पांढऱ्या पडल्या आहेत. आणि मनातल्या 'भीतीची' जागा 'आदरानं ' घेतली आहे.

पुढे गेल्यावर लागतात ती शेवयांची दुकान. 'गणेश शेवई वापरा' अस मोट्ठ्या अक्षरात लिहिलेली त्यांची ती पाटी  आणि पापड-कुरडयांच्या त्या बाहेर ठेवलेल्या पिशव्या. जाता जाता त्या पिशव्यांमधून एखादी कच्ची पापडी उचलायची सवय आजही जात नाही.
रात्री उशिरा दुकान बंद करून तिथले मजूर मद्यपान करत बसलेले दिसतात. अनेकांचे चेहरे ओळखीचे दिसतात. लहानपणी पापड्या चोरताना त्यांचे ओरडे खाल्लेले पण आठवतात.
-----
ह्या मंडई मध्येच लहानाचा मोठा झालो.  आयुष्याला ह्या मंडईनं एक प्रकारचा लळा लावला, जिद्दीनं जगायला शिकवलं.. परिथितिची जाणीव करून दिली.
मी कुठेही असलो, तरी रोज संध्याकाळी सातला कानामध्ये गणेशाच्या आरतीची घंटा घुमू लागते.

अनेक जण मंडई ला घाण, गलिच्छ अस संबोधतात.  तिथल्या लोकांना पण नाव ठेवतात. त्या 'घाणीतून' बाहेर पडायचे सल्ले देतात.
पण मनात 'मंडई' ही एक गोष्ट कायमच असणार आहे.मंडई मधून हा वेडा निघून जाऊ शकत नाही  आणि  ह्या वेड्याच्या मनातली मंडई कधी जाऊ शकत नाही.