प्रेतास आज माझ्या पडला सवाल आहे
दु:खी कुणी न कैसे? जो तो खुशाल आहे
पडलो चितेवरी मी ऐकू किती कळेना
भाषण करावयाला गर्दी कमाल आहे
"झाला कधी न ऐसा होणे कधीच नाही"
घालून हार म्हणती मी बेमिसाल आहे
रडणे तऱ्हेतऱ्हेचे प्रेतास हे कळेना
रडतोय आप्त, का तो शंभू कवाल आहे?
खोटीच का असेना तारीफ ऐकता, मज
मेलो अधी न का मी? याचा मलाल आहे
विसरून दु:ख जाण्या प्याले किती रिचवले?
धंदा बराच झाला म्हणतो कलाल आहे
स्मरणार्थ शायरीच्या पाल्हाळ वाचनाने
फोटोतल्या मलाही केले हलाल आहे
"निशिकांत" एक कोणी ओले करून डोळे
गुंडाळण्यास तुजला दिधली दुशाल आहे
निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा