ओशो आणि मी (तीन)

(आश्रमात सर्वात कहर काय असेल तर ती ओशोंची समधी! जगातल्या कोणत्याही सिद्धाची अशी समाधी नाही कारण ती ऐय्याशी, तो रूतबा आणि ती नजाकत आता होणे नाही. )

लाओत्झू या ओशोंच्या आश्रमातल्या निवासाला काचेचं एक प्रवेशद्वार आहे आणि तिथे बसायला मरून कार्पेटवर स्वच्छ पांढऱ्या चेअर्स आहेत. समोर तुम्हाला पहिल्यांदा काय दिसत असेल तर ओशोंची अलिशान रोल्सरॉईस! तुम्ही निरखून बॅकसीट वरच्या काळ्या गॉगल ग्लासेस मधून पाहिलं तर आत दिसतात सुरेख मांडून ठेवलेली ऊंची मद्य आणि नजाकतदार चषक. नजर खिळून राहावी अशी इमॅक्युलेट कंडीशन मधली ती ब्लॅक रोल्सरॉइस फक्त स्विच द्यायचा अवकाश की आज सुद्धा चालू होईल. त्या रोल्सरॉईस पासून बुद्धा हॉलचा पोडियम जेमतेम तीनशे पावलं बट द मास्टर वुड कम फॉर द डिस्कोर्स इन अ लिमोझीन!

पांढरे मोजे आणि मरून रोब परिधान करून तुम्ही समाधीकडे निघालात की थक्क होऊन बघत राहता, दोन तीन वळणं घेणाऱ्या त्या पाथ वे च्या भिंती बुकशेल्वच्या आहेत. त्यात जगातल्या अनेकविध विषयां वरची अक्षरशः लाखो पुस्तकं आहेत आणि प्रत्येक पुस्तक आता ऊघडून वाचता येतील असं ठेवलं आहे.

या माणसाचा व्यासंग बघून कुणीही वेड व्हावं, इथल्या पुस्तकांची नुसती टायटल्स वाचायला दोन दिवस लागतील! मला स्वतःलाच इतकं थोर वाटायला लागलं की या माणसाच्या सगळ्या ज्ञानाचं सार म्हणजे त्यांच प्रत्येक महत्वाचं पुस्तक आपल्याला वाचायला मिळालंय.

समाधी म्हणजे वास्तुशास्त्राच्या कारागीरीचा अफलातून नमुना आहे. साधारण पंधरा फूट ऊंचीच्या संपूर्ण ग्लास वॉल्स असलेला प्रशस्त सेमी सर्क्युलर हॉल, इटालियन मार्बलच्या देखण्या खांबांनी तोललेला आणि संपूर्ण इटालियन मार्बलचं फ्लोअरींग. प्रवेशाद्वाराच्या उजव्या बाजूला ओशोंची संगमरवरी समाधी, तिच्यावर ओशोंचा हसरा फोटो आणि ओशोंनी लिहिलेला एपीटाफः

'ओशो नेव्हर बॉर्न अँड नेव्हर डाइड ओन्ली विजीटेड धिस प्लॅनेट अर्थ बीटवीन... आणि त्यांचा कालावधी.

ग्लास वॉल्स मधून बाहेर दिसतात त्या झेन गार्डन मधल्या विवीध आकारच्या दगडांच्या मोहक रचना, त्या दगडातून लिलया वाहणारे झरे आणि रानात आहोत असं वाटावं अशी गर्द हिरवी झाडं आणि त्यांना लाजून बिलगलेल्या वेली.

माझी नजर कशावर खिळून राहिली असेल तर ते समाधीच्या बरोबर मध्यभागी सिलींगला असलेलं प्रकाशमान झुंबर! एकात एक असलेल्या तीन क्रिस्टलच्या वर्तुळाकार रचनेत दिवे असे काही खुबीनी बसवलेत की संपूर्ण झुंबर हिऱ्यांचं आहे असा भास होतो. ही रचना बहुदा स्वतः ओशोंची आहे आणि आध्यात्मातला शेवटचा बिंदू सहस्त्रार काय असेल याचं ते अत्यंत रम्य दृष्य रूप आहे. त्या नुसत्या झुंबराकडे बघून जगातल्या कुठल्याही संवेदनाशील व्यक्तीला आध्यात्माचं दुर्दम्य आकर्षण वाटेल कारण ते झुंबर ओलांडलं की त्याच्या वर आपलं स्वरूप आहे, अनंत मोकळं आकाश!

दिवसातल्या ठराविक वेळात कुणीही समाधीत जाऊन शांतपणे बसू शकतं, फ्री ऑफ चार्ज! या समाधीत मी कितीदा आणि किती वेळ बसलो आहे याचं आज मला स्मरण नाही.

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १