तू झोप चोरल्याने

दु:खी कधी न झालो तू झोप चोरल्याने
झालो उदास, स्वप्ने अर्धीच राहिल्याने

बेरीज काय असते? शिकलो कधीच नाही
कळले हिशोब सारे तू प्रीत तोलल्याने

काढीत अर्थ असतो कळण्या तुझे इशारे
ताकास फुंकतो मी मज दूध पोळल्याने

जखमा अधीर, तुझिया स्पर्षास मजप्रमणे
हसतात त्या खुलूनी तू मीठ चोळल्याने

जखमा दिल्या जयांनी आहे ऋणी तयांचा
निर्ढावलो जगी मी घावास झेलल्याने

ओसाड बाग होती हिरवळ कुठेच नव्हती
पाने नवीन फुटली अश्रूस शिंपल्याने

दगडास का उगाला पुजतात लोक सारे ?
लिलयाच देव झाला शेंदूर फासल्याने

मृगजळ समोर मागे, पळतो उगाच आहे
नाही जगात त्याचे अस्तित्व भासल्याने

"निशिकांत" शुन्य उरले आयुष्य सांजवेळी
तुज काय रे मिळाले? कोणात गुंतल्याने

निशिकांत देशपांडे मो.नं.;-- ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा