मी सांगत आहे

डबडबलेल्या डोळ्यांना मी सांगत आहे
ओघळण्याची रीत जगी या संपत आहे

चंगळवादी जीवनशैली फॅशन झाली
स्वैराचारामध्ये दिसते रंगत आहे

काल उद्याची नसते पर्वा मजला केंव्हा
ठोकर मारुन आज जगावे आदत आहे

जे न गवसते ते शोधावे छंद जिवाला
मृगजळ पुढती, शिवणापाणी खेळत आहे

उरले वाईट काय घडाया अपशकुनाने ?
ओरडणारऱ्या टिटवीचेही स्वागत आहे

अश्रू, जखमा, बंद उसासे घेउन आले
मित्रासोबत ठरली अंगतपंगत आहे

रुद्राक्षाची माळ, कपाळी भस्म कशाला ?
फसवायाची खूप जुनी ही पध्दत आहे

घेतच असतो देव परिक्षा दुबळ्यांची का?
काय नतिजा पुसण्या कोणा हिंमत आहे

"निशिकांता"ची मैफिल सूनी सूनी होती
गजला इतक्या भुक्कड तुजवर लानत आहे

निशिकांत देशपांडे मो.नं. :-- ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा