ओशो आणि मी (अंतिम)

(एक खूणगाठ मात्र मनाशी पक्की केलीय, ओशोंनी केलेली चूक अजिबात करायची नाही, गुरू तुम्हाला साक्षात्काराप्रत नेईल असा चकवा कधीही निर्माण होऊ द्यायचा नाही! कोणताही आश्रम नाही की कुणी शिष्य नाही. पहिल्याच भेटीत प्रत्येकाला सांगायचं 'योर एनलाईटन्मेंट इज योर रिस्पाँसिबिलीटी! )

ओशो सिद्ध होते का? याचं निर्विवाद उत्तर होय आहे. ओशोंचं व्यक्तिमत्त्व वादग्रस्त आहे पण त्यांचं आध्यात्मिक योगदान त्यामुळे यत्किंचितही कमी होत नाही. काय आहे त्यांचं योगदान?

याची दोन उत्तरं आहेत. एक, अध्यात्म जीवन विरोधी नाही, सत्य संसारात राहून मिळवता येईल हा दिलासा त्यांनी संसारी माणसाला दिला, अध्यात्म फकिरीतून मुक्त केलं! आणि दोन, सत्य ही कुणा एकाची मक्तेदारी नाही हे दाखवून दिलं.

मी जेव्हा ओशोंनी अध्यात्म सामान्यां पर्यंत नेलं म्हणतो तेव्हा मला दोन गोष्टी अभिप्रेत आहेत.

(एक), पराकोटीचं वैभव निर्माण करून प्रत्येकाच्या मनात स्वतः विषयी कुतूहल निर्माण केलं, यामुळे कमालीचे श्रीमंत देखील त्यांना बेदखल करू शकले नाहीत आणि माझ्या सारखा सामान्य बुद्धिजीवी मध्यम वर्गीयही स्वतःला रोखू शकला नाही.
अध्यात्म ही निश्चितच पोट भरल्यावर येणारी गोष्ट आहे त्यामुळे जो उदर निर्वाहाच्याच चिंतेत आहे त्याला सत्याचा शोध घेता येणार नाही पण पोट भरलेला देखील प्रत्येक जण अध्यात्माकडे वळत नाही कारण त्याला मृत्यूची अनिवार्यता अस्वस्थ करेलच असं नाही. प्रत्येक गर्भश्रीमंत देखील त्याचा उपभोग आणि विलास मृत्यू व्यर्थ करेल हे जाणेलच असं नाही.

त्यामुळे अध्यात्माचा वेध हा सांपत्तिक स्थितीवर अवलंबून नाही तर तो तुम्हाला मृत्यू पार करण्याचा ध्यास किती आहे यावर अवलंबून आहे. एखादा मायकेल जॅक्सन सारखा अनभिषिक्त सम्राट त्याच्या अस्वास्थ्याचं उत्तर आत्महत्येत शोधेल तर एखादा बुद्धा सारखा राजपुत्र अध्यात्माचा वेध घेईल.

(दोन), ओशोंच्या इतका व्यासंग जगात कुणी करेल याची शक्यता नाही कारण अध्यात्माच्या प्रत्येक पैलूचा वेध त्यांनी स्वतः अभ्यास केलेल्या एक ते दीड लाख पुस्तकातून घेतला आहे. ती पुस्तकं आणि त्यातून त्यांनी निर्माण केलेलं साहित्य नुसतं वाचता वाचताच एखादा वेडा होईल. पण एक गोष्ट निर्विवाद की आज भूतलावर अध्यात्मातलं जे जे काही आहे त्याच्या अंताला जरी आपण पोहोचलो तरी तिथे हा माणूस उभा आहे!

मी त्यांचं सर्व लेखन आत्मसात केलंय याचा अर्थ असा नाही की मी त्यांची प्रत्येक ओळ वाचली आहे तर मला आवडलेल्या त्यांच्या अत्यंत निवडक पण अत्यंत महत्त्वाच्या लेखनातून सत्याप्रत पोहोचलोय. त्यामुळे त्यांच्या सर्व लेखनाचा अभ्यास केलेला जगातला कुणीही दिग्गज 'ओशो असं म्हणाले होते' असं म्हणाला तर निव्वळ अनुभवातून मी ते तसं म्हणाले असतील किंवा नाही हे सांगू शकतो, मला त्यांचं कोणतंही पुस्तक उघडायची गरज नाही.

जेव्हा ओशोंनी अध्यात्म सामान्यां पर्यंत पोहोचवलं असं मी म्हणतो याचा अर्थ, त्यांनी जगातल्या सर्व आध्यात्मिक प्रणाली एकाच सत्याचा उद्घोष करतात हे स्वतःच्या अफलातून व्यासंगानं निर्विवादपणे सिद्ध केलं.

इथे मला स्वामी रामतीर्थांच्या जीवनातली घटना आठवते. ते स्वतः गोल्ड मेडॅलिस्ट आणि लाहोर युनिव्हर्सिटीचे अत्यंत बुद्धिमान असे गणिताचे अध्यापक होते. त्यांनी स्वामी विवेकनंदां कडून दीक्षा घेतली आणि मग प्रथम जपान आणि नंतर अमेरिकेत, हिंदू धर्मातल्या वेदांतावर चार वर्ष प्रवचनं दिली (१८९१-९४). जेव्हा ते भारतात परतले तेव्हा स्वतःच्या एनलाईटन्मेंट वर शिक्कामोर्तब मिळवण्यासाठी ते सरळ बनारसला गेले.

तिथे मोठी मजेशीर घटना घडली ज्या हिंदू पीठा समोर ते उभे राहिले त्याच्या निर्णायक मंडळाच्या एका सदस्यानं त्यांना एक साधा प्रश्न विचारला 'तुम्हाला संस्कृत येतं का? ' स्वामी रामतीर्थांवर मोठी नामुष्की ओढवली कारण त्यांचं आयुष्य पंजाबमध्ये (सध्या पाकव्याप्त) गेल्यामुळे त्यांना संस्कृत येत नव्हतं! संस्कृतच येत नाही म्हटल्यावर सगळा विषयच संपला! वेदांतावर परदेशात अत्यंत प्रभावी प्रवचनं देणारा माणूस बनारसला व्यर्थ ठरला.

मी जर तिथे हजर असतो तर म्हणालो असतो की सत्याचा आणि भाषेचा काय संबंध? सत्य शब्द उमटण्यापूर्वी आहे! मग तो शब्द संस्कृत असो की फारसी त्यानं काय फरक पडतो? पण स्वामी रामतीर्थ निमूटपणे परतले आणि तिहरीला (गढवाल स्टेट) संकृतचं अध्ययन करायला गेले. अशी दोलायमान स्थिती ओशोंचं साहित्य समग्रतेनं वाचलं तर कुणाचीही होणार नाही.

मला उपनिषदं माहिती नाहीत किंवा मी वेद वाचले नाहीत किंवा कुराण अगर बायबल मधला दाखला मला स्वतः विषयी संदिग्ध करतो, किंवा मला झेन कोन उलगडता येत नाही त्यामुळे मी 'मला सत्य गवसलंय' असा उद्घोष करू शकत नाही अशी परिस्थिती येणार नाही.

या दोन कारणांमुळे ओशोंनी सत्य सामान्य माणसाला उपलब्ध करून दिलं असं मी म्हणीन.

मला त्यांच्या एका वाक्यानं मात्र चकित केलं आहे. जेव्हा ते अमेरिकेतून डिपोर्ट झाले आणि भारतात आले तेव्हा म्हणाले 'प्रकृती अंधी है! '

टोटल रिस्पाँसिबिलिटी, टोटल फ्रिडम म्हणणारा सिद्ध असं विधान कसं करू शकतो? काय असेल इतक्या प्रतिभावान माणसाच्या अपयशाचं कारण असा मी विचार करतो तेव्हा मला एकच गोष्ट लक्षात येते की 'अटेंशन सिकींग' या वृत्तीनं ते जगात प्रसिद्ध झाले. त्यांच्या पहिल्या रोल्सरॉईसमुळे ते सर्वांचं लक्ष वेधू शकले पण मग तो प्रसिद्धीचा झोत इतका प्रभावी होत गेला की त्यांनी खुद्द अमेरिकन प्रेसिडेंट (रोनाल्ड रेगन) आणि सर्वोच्च ख्रिश्चियन धर्मगुरु व्हॅटीकन पोपला आव्हान दिलं. जी मानसिकता त्यांना शिखरावर घेऊन गेली तिच खाली घेऊन आली, त्यात 'प्रकृती अंधी है' असं एका सिद्धानं म्हणणं म्हणजे गाण्याची सम चुकण्या सारखं आहे.

मी जर त्या वेळी त्यांच्या समोर असतो तर म्हणालो असतो, 'ओशो, ये तो गुरुत्वाकर्षण को 'तुम बहिरे हो' कहेना हुवा'

या वर ओशो काय म्हणाले असते हे कुणीही सांगू शकणार नाही कारण ज्याचं बोलणं प्रेडि़क्ट होऊ शकेल तो मास्टर काय? त्यांनी अत्यंत समर्थपणे पुन्हा सम साधली असती आणि मी म्हणालो असतो.....! (ओरिजिनल लेखात इथे स्माइली आहे )

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १