माणसं तशी क्रूरच
कायदे नियमांमुळे ती
माणसासारखी वागतात
हत्यारं नव्हती तेव्हा
बुकलून प्राणी मारायचे
बिचाऱ्या प्राण्याचा श्वास
वरचा वर खालचा खाली व्हायचा
हत्यारं विकसित झाली
प्राणी मारणं सोप झालं
केव्हा श्वास उडाला हे
प्राण्यालाही कळेनासं झालं
कायदे नियमांमुळे माणसे
आता शब्दाने मारतात
वर्षानुवर्षे मग ते
कोर्टाच्या खेटा घालतात
"शब्द मोठे शस्त्र आहे
जपून वापरा बरे "
मोठे लोक सांगून गेले
बाकीचे सोईने विसरून गेले
एरवी सासू खोकत असते
कमरेमध्ये वाकत असते
सुनेला छळताना तिला
केवढे तरी बळ येते
हुंडाबळी , लैंगिक शोषण
खून, मारामारी , दरोडा
कधीतरीच करतात माणसं
आणि भूक भागवून घेतात
एकदा तरी माणसाला या
पिंजऱ्यामध्ये ठेवावं
आणि वाघाला मात्र बाहेर
मोकळं ढाकळं सोडून द्यावं
म्हणजे माणूस हतबल होईल
शेळीहून शेळी होईल
बंदिस्त जागेत तो
कावरा बावरा होईल
वाघ पिंजऱ्यात असेल तर
निदान डरकाळत राहील
दीनवाणेपणाने माणूस मात्र
जिवाची भीक मागत राहील