संकेत प्राक्तनाचा मी एकले असावे
करता हिशोब पदरी मम शून्य का उरावे ?
स्मरणातही न येती का मायबाप मजला ?
कोणीतरी रुजवले अन प्रसवले असावे
माझा कयास माझी कुंती नसेल आई
म्हणुनीच मज बुडवले गंगाजळी नसावे
आता जगावयाच्या शिक्षेस भोगण्याला
पर्याय काय दुसरे? मृत्यूतही बघावे
मम वेदना जगाला केव्हा कशा दिसाव्या ?
मुद्दाम डोळसांनी धृतराष्ट्र का बनावे ?
अपुल्यात शोध घेता अपुले कुणी न दिसले
अपुलेपणा मिळाया शत्रूस चाचपावे
शोकांतिका बघाया कोणास वेळ आहे ?
किरदार मीच, मजला मी दर्पणी बघावे
दिसल्या उदंड राशी उत्तुंग वेदनांच्या
इतिहास आज झाल्या प्रेतास हे कळावे
"निशिकांत" राग धरण्या आहे तुला कुणी का ?
ठरवून मीच आता माझ्यावरी रुसावे
निशिकांत देशपांडे मो.नं. :-- ९८९०७ ९९०२३
E Mail:- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा