एक लहान पण गुणवत्तेने महान पुस्तक

"अष्टविनायकदर्शन-पण जरा वेगळे " हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारीत एक  पुस्तिका BOOK GANGA नावाच्या eBOOKs प्रकाशित करणाऱ्या संस्थेने त्यांच्या www.bookganga.com या संकेत स्थळावरील  त्यांच्या On line  Book store of Indian Literature मध्ये  व्यक्तिचित्रण या category त उपलब्ध केले आहे. पुस्तकाच्या (एकूण  ४०पैकी) १४ पाने (हे ई-बुक विकत घ्यावे का याचा निर्णय करण्यासाठी)  मोफत वाचता येतात. त्यासाठी  खालील लिंक वापरावी.
दुवा क्र. २
पुस्तकातील मनोगत, श्री. घळसासी यांचा अभिप्राय अवश्य वाचावा असा आहे. पुस्तकात सुमारे चाळीस फोटो आहेत. फ्रंटपेज आकर्षक आणि कल्पकतेने सजवले आहे. पुस्तक विकत घेण्यासाठी कॉंप्युटर, इंटरनेट व इ-मेल अड्रेस लागतो. पैसे त्यांनी दिलेल्या ब्यांकांमधील अकाऊंटला भरता येतात. यापुढे या प्रकाराची पुस्तके प्रकाशित होण्याचे प्रमाण वाढणार आहे. तेव्हा हाही अनुभव (किंमत फारशी नसल्याने ) घेऊन पाहण्यास हे पुस्तक उत्तम आहे.

लेखक म्हणतो, " अगदी युरोप-अमेरिकेच्या सहलींना जाता येईल इतपत सुबत्ता या देशात, आपण स्वतंत्र झाल्यामुळे आली. पण रत्नागिरीस गेल्यावर पतितपावनमंदिर वा युरोपात गेल्यावर मार्सेलिसला वा लंडनमध्ये हायगेट भागातील इंडिया हाऊसला जाऊन यावे असे भारतीयांना वाटते का? ज्यांच्या त्यागाच्या पायावर आपली ही प्रगती होऊ शकली त्यांचा आपल्याला विसर तर पडलेला नाही ना? पारतंत्र्यात असतांनाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वीर सावरकर, जमशेदजी टाटा, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर, सी. व्ही. रामन, महात्माजी यांच्यासारख्या अनेक भारतीय सुपुत्रांनी स्वदेशात तसेच परदेशातही आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा उमटवल्या  आहेत. जगभर आता सहजपणे हिंडू फिरू शकणाऱ्या आजच्या भारतीयांना या सुपुत्रांची ओळख आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणे आवश्यकच आहे. त्यांच्या तेथील कार्याची माहिती असेल तर, परदेशातील लोकांचे कर्तृत्व पाहात असतांनाच आपल्यातही अशी शक्ती आहे याची त्यांना जाणीव होईल व अधिक काही करण्याची प्रेरणा मिळेल. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देश स्वतंत्र व्हावा यासाठी घरादाराची पर्वा केली नाही व पराकोटीच्या यातना सहन केल्या  अशांबद्दलच्या कृतज्ञताऱ्यात्राही लोकांनी कराव्यात, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. अलिकडे शिक्षक कांही बोलले, आईवडील रागावले, परीक्षेत अपयश आले, अशा तुलनेने अतिक्षुल्लक कारणांसाठी किशोरावस्थेतील मुलांपासून ते पदव्या घेतलेल्या तरुणांपर्यंत आत्महत्त्या करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तरूण ही देशाची बहुमोल संपत्ती आहे. पुस्तकातील चवथ्या प्रकरणातील "अष्टविनायक दर्शन – एक अभ्यास" हा सावरकरांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाच्या आठ महत्त्वाच्या पैलूंचा अभ्यास आहे. हा अभ्यास कमकुवत मनाच्या तरुणांना फार फार उपयुक्त ठरेल. याचा अर्थ ही यात्रा आणि हा अभ्यास फक्त तरुण वर्गालाच उपयोगी आहे असे मुळीच नाही. अगदी नववी दहावीत शिकणाऱ्यांपासून ते वाचू / ऐकू शकणाऱ्या कोणाही व्यक्तीला या दोन्ही यात्रा उपयुक्तच आहेत आणि त्यामुळे नैराश्याच्या आहारी गेलेले तरूण व कोणत्याही वयाच्या व्यक्ती सावरतील अशी खात्री वाटते.       दक्षिण आफ्रिकेत, महात्माजींनी रेल्वे प्रवासात त्यांचा न्याय्य अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या साम्राज्यवाद्यांना विरोध करण्याचा जो कणखरपणा दाखवला, त्या घटनेचे एक उचित प्रेरणादायी स्मारक आज तेथे उभे आहे. फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात स्वा. सावरकरांनी घेतलेल्या, त्या  विलक्षण साहसी उडीला,   ८ जुलै २०१० ला शंभर वर्षे झाली. ज्या उडीने हजारो तरुणांना साम्राज्यवाद्यांच्या विरोधातील त्या स्वातंत्र्यलढयात उतरण्याची प्रेरणा दिली, त्या साहसाची व शौर्याची दखल घेणारे प्रेरणादायी स्मारक मात्र तेथे आपण निर्माण करू शकलेलो नाही. याची कुणालाच खंत वाटत नाही? जो देश देशभक्तांची उपेक्षा व अवहेलना करील त्या देशात देशभक्तांऐवजी देशद्रोह्यांचेच भरघोस पीक निघेल यात काय नवल?"

या पुस्तिकेत पेरलेले सावरकर विचार दर्शन आजही किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगायला नको.