आवरण (ग्रंथपरिचय )

आतापर्यंतच्या आयुष्यात मला दोनतीन वेळा उत्तर भारतात जाण्याची संधी मिळाली. एकदा तर काशीतच माझा मुक्काम होता तरीही काशीविश्वेश्वराचे दर्शन मी घेऊ शकलो नाही याची खंत "आवरण" ही ज्ञानपीठविजेते डॉ.एस.एल.भैरप्पालिखित व उमा कुलकर्णी यांनी अनुवादित कादंबरी वाचल्यावर नष्ट झाली कारण मूळ काशीविश्वेश्वराचे मंदीर आता अस्तित्वातच नाही.  औरंगजेबाने त्या मंदीराचे रूपांतर " ग्यानवापी मशिदी"त केले आहे आणि त्यासमोर एक छोटीशी वास्तु नंतर पुन्हा दिल्लीतील मोगल बादशाही अंमल उतरणीला लागल्यावर आणि पेशव्यांनी अटकेवर झेंडा फडकवल्यावर उभारण्यात आली आहे.तीच काशीविश्वेश्वराचे मंदिर म्हणून ओळखली जाते.( या गोष्टीची प्रत्यक्ष काशीविश्वेश्वराला जाऊन आलेल्या व्यक्तीकडूनही मी खात्री करून घेतली.) औरंगजेबाने आणखीही बऱ्याच मंदिरांचे मशिदीत रूपांतर केले. शहाजहाननेही काशीमधीलच शहात्तर देवळांचा नाश करण्याचे फर्मान जारी केले होते ही माहितीही " आवरण " याच कादंबरीत वाचली. कन्नडमध्ये या कादंबरीच्या दोन वर्षात बावीस आवृत्त्या निघाल्या.शास्त्रज्ञ आणि इतिहासकार एन्. राजाराम यांच्या मते ही भारतीय "दा विंची कोड"  आहे.वैयक्तिक स्वार्थ व भीतीपोटी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणे हे जगात कसे चालले आहे हे दाखवणे हे दोन्हीमधील समान सूत्र.

"आवरण"कादंबरीच्या सुरवातीसच बौद्ध व वैदिक या दोन्ही तत्त्वज्ञानात उल्लेखलेल्या विस्मरणाने सत्य झाकाळून टाकणाऱ्या मायेचा म्हणजेच "आवरणा" चा संदर्भ त्या वाङ्ग्मयातील अनेक श्लोक उद्धृत करून दिला आहे. त्यातील दोन खाली दिले आहेत. असत्य बिंबवणाऱ्या कार्याला "विक्षेप" व व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "अविद्या " म्हणतात.बौद्ध तत्त्वज्ञ त्यासच संवृत्ति असे म्हणतात. त्याविषयी बौद्ध तत्त्वज्ञान म्हणते

अभूतं ख्यापयत्यर्थं भूतमावृत्य वर्तते ।

अर्थ: ते (संवृत्ति) नसलेला अर्थ दाखवते आणि आहे ते झाकून टाकते.

वेदकर्त्यानी दिलेले एक उदाहरण

तामसो हि प्रत्यय आवरणात्मकत्वात्वादविद्या ।

विपरीतग्राहकस्संशयोपस्थापकोsग्रहणात्मको वा ॥

अर्थ: अविद्या तमोरूपी असून झाकोळून टाकणारी आहे.सत्याला विरोधी रूपात दाखवणारी,एवढेच नव्हे,संदेह निर्माण करनाऱ्या रूपात दाखवणारी अविद्या वस्तुस्थितीचे आकलन करू शकत नाही. -- शांकरगीताभाष्य

सत्याचा शोध किंवा असत्यावरील आवरण काढणे हाच कादंबरीचा हेतू असल्यामुळे तो शोध घेण्याविषयी लेखक किती दक्ष आहे ते पुस्तकातच उल्लेखलेल्या एकशेपस्तीस संदर्भावरून समजून येते .

कादंबरीची नायिका मूळची लक्ष्मी कर्नाटकातील नरसापूरच्या नरसिंहगौडाची मुलगी.पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमश्ये शिकत असताना मुस्लीम आमिरच्या प्रेमात पडते. आमिर हिंदू धर्म स्वीकारून नाव बदलून लग्न करण्यास तयार असेल तर या लग्नास नरसिंहगौडा संमती दर्शवतात.त्यांच्या मते तिच्या पोटी जन्मास येणारी संतती देवालयाचा नाश करील आणि ते पाप त्यांच्या माथ्यावर बसेल.यावर लक्ष्मी आजच्या काळात तसे कसे घडेल असे म्हणते पण नरसिंहगौडा जहांगीर ,शहाजहान या हिंदू आयांच्या मुलानीही देवळे पाडली,मूर्ती फोडल्या हे सांगून त्यांचा धर्मच तसे सांगतो आणि ते तसेच वागणार(कादंबरीच्या कालापर्यंत बामियनची बौद्धमूर्ती फोडली गेली नव्हती नाहीतर त्याचाच उल्लेख नरसिंहगौडानी केला असता)अर्थातच लग्न करण्यासाठी लक्ष्मीलाच धर्म बदलून रझिया व्हावे लागते.

रझियान पाच वेळा नमाज पढावा, रमजानचे कडक उपास पाळावेत एवढेच काय तिने गोमांस खावे ही तिच्या सासूची इच्छा. तिला मुलगा होतो तेव्हा त्याच्या सातव्या दिवशी दोन बकऱ्यांचा बळी देण्यात येतो या सर्व अपरिचित गोष्टींमुळे ती अस्वस्थ होते पण तिच्या प्रोफेसर शास्त्रींनी मुलगा झाल्याबद्दल तिच अभिनंदन करून तिच्या वडिलांनी मात्र त्यावर अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त न केल्याचे सांगून जोपर्यंत धर्माच अस्तित्त्व आहे तोवर मानवता रहाणार नाही अस आपले मत व्यक्त केल्यावर रझिया (लक्ष्मी)ला धीर येतो व वडिलांविरुद्ध तिच्या मनात राग वाढतो आणि ज्या धर्माने आपल्या पित्याच्या अंत:करणातली मानवता नष्ट केली त्याचाही तिला तिटकारा येतो व तीही  कम्युनिस्ट विचारसरणीच्या  प्रा.शास्त्रींच्या सुरात सूर मिसळून स्त्रिया व दलितांवर अन्याय करणारा हिंदु धर्मासारखा धर्म सोडून ज्यात हा समतावाद चौदाशे वर्षापूर्वीच निर्माण करण्यात आला (असे सर्व मुस्लिम धर्ममार्तंडांचे मत) त्या (म्हणजे मुस्लीम) धर्मात आपण प्रवेश केला असे जाहीरपणे सांगायला सुरवात केली.त्यामुळे हिंदू धर्मीय चिडून आपल्याला नावे ठेवतील,असे तिला वाटत होते पण तसे काही न घडता उलट एक धाडसी महिला म्हणून तिचे फोटो छापले जाऊन तिचे कौतुक होते अर्थात त्याच्यामागे शास्त्रींसारखे तथाकथित बुद्धिवादी व कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक असतात.

रझिया व आमिर यांच्यावर केंद्रसरकारकडून हेरिटेज स्थळांचे चित्रण करून त्यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या प्रकल्पातील हंपी या स्थळाचे चित्रण करण्याची कामगिरी सोपवण्यात येते.खरे तर या प्रकल्पामागे जातीनिरपेक्ष आणि डावे पक्ष यांचा शिक्षण व माध्यम यातून अल्पसंख्यांकाना लक्षात येण्यासारखा मोठेपणा देऊन चित्रण करण्याचा हेतु होता.हंपी येथील नृसिंहमंदिराचा विध्वंस मुस्लिमानी केला नसून तो मध्ययुगीन सरंजामशाही व त्याला विरोध करणाऱ्याच्या संघर्षात घडून आला आहे असे दाखवण्याचा त्यांचा हेतु होता.पण रझियाला तिच्या बालपणातील प्रसंगावरून हिंदू जमीनदार व रयत आपापसात भांडले अगदी एकमेकांचे जीव घेतले तरी एकमेकांच्या मंदिरांचा ते विध्वंस करत नाहीत याविषयी खात्री होती त्यामुळे अशा चित्रिकरणासाठी पटकथा लिहिण्यास ती तयारी दाखवत नाही.आमिरला तिचे म्हणणे चुकीचे नाही हे कळले तरी तो हुकुमाचा ताबेदार असल्यामुळे व त्याला ते सोयिस्कर पण असल्यामुळे तिने तसे करावे असे सूचित करतो.त्याच काळात मुस्लिम धर्ममार्तंडांनी रझिया कुंकू लावते,ती उर्दू नीट बोलत नाही व गोमांस खात नाही या कारणामुळे आमिरच्या कुटुंबावर बहिष्कार घालण्याची धमकी दिलेली असते. आमिर व तिने स्वतंत्र रहावे असे त्यामुळे ती सूचित करते.पण आमिरला हे पटत नाही व तो तिला तीन वेळा तलाक म्हणून मोकळा होतो.शिवाय त्यांच्या धर्माप्रमाणे त्याला तलाक न देताही दुसरे लग्न करणे शक्य होते.आणि नंतर तो दुसरे लग्नही करतो.

रझियाचे वडील वारल्यामुळे ती त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाते आणि ती मुस्लीम झाली असली तरी तिचे नातेवाईक साधे प्रायश्चित्त घेऊन तिला अंत्यविधीत सामील व्हायला परवानगी देतात.आपल्या वडिलांचा प्रचंड ग्रंथसंग्रहातून ती हंपीविषयी व टिपू सुलतानाविषयी माहिती जमा करते व   राष्ट्रवीर टिपू असे  उदात्तीकरण केवळ त्याने ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या लढाईला महत्त्व देऊन मैसूरमधील लोकांनी स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्योत्तर काळात मार्क्सवादी,व्होटबॅन्कवाले राजकीय पक्ष, मुस्लीम कलावंत ,चित्रपटनिर्माते यांनी केले हे तिच्या निदर्शनास येते.टिपूने मलबार कोडगु येथे जबरदस्तीने हिंदूचे धर्मांतर घडवून आणले.कन्नड राजभाषा बदलून तेथे फारसी आणली.गावे व शहरांची नावे बदलली. ही माहिती मिळाल्यामुळे आमिरकडे परत न जाता मुस्लीम कालखंडावर एक कादंबरी लिहिण्याचे ती ठरवते.

त्या कादंबरीत देवगड या अरवली पर्वताच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या राज्यावर औरंगजेबाच्या सैन्याने हल्ला केला.त्यावेळी पराजय निश्चित समोर दिसत असताना रजपूत स्त्रिया जोहार व पुरुष केशरिया करतात.पण राजपुत्र मरणाला घाबरून धर्मांतर करण्यास तयार होतो व त्याला पकडून नेल्यावर त्याला हिजडा बनवण्यात येथे तो काशीविश्वेश्वर मंदिराचा विध्वंस  व त्या मंदिराचे ग्यानवापी मशिदीत रूपांतर होताना  पहातो.नंतर बादशहाच्या सरदाराच्या जनानखान्यातच आपली बायको पण असल्याचे त्याला समजते.तीही त्याच्याचप्रमाणे जोहार करताना आगीला घाबरून माघार घेते व त्या सरदाराच्या जनान्यात सामील केली जाते.या कादंबरीत मुस्लिमेतरांच्यावरील हालांचे व त्यांच्यावर लादण्यात आलेल्या जिझियासारख्या करांचे वर्णन केलेले आहे.

त्याच काळात केंद्रसरकारतर्फे बोलावण्यात आलेल्या परिषदेला प्रो.शास्त्रींना निमंत्रण देण्यात येते व रझियाची त्याना तोपर्यंत माहिती एक नेक मुस्लिम बायको म्हणून असल्याने त्या परिषदेचे निमंत्रण ते तिलाही देतात.त्या परिषदेत मुस्लिम राज्यकर्त्यांनी प्रजेला किती कनवाळूपणाने संभाळले यावर अनेक हिंदू विद्वान तारे तोडतात .अगदी काशिविश्वेश्वराचे मंदिरही औरंगजेब बादशहाने तोडले नसून त्याची वेगळीच उपपत्ती ते लावतात.तशाच स्वरुपाचे विचार रझिया प्रकट करेल अशी अपेक्षा ठेवणाऱ्या शास्त्रींना हे सगळे कसे निखालस खोटे आहे हे सांगून व त्याचे संदर्भ देऊन ती गप्प बसवते.

तिच्या कादंबरीत मुस्लिमांच्या (विशेषत: औरंगजेबच्या )मध्ययुगीन काळातील राजवटीवर ती खराखुरा प्रकाश टाकते अर्थातच ती कादंबरी प्रकाशित करण्यास कोणीच प्रकाशक तयार होत नाही त्यामुळे ती स्वत:च ती प्रकाशित करते त्याबरोबर  मुस्लीम जातीयवाद्यांकडून जातीय दंगे पेटवले जातात व त्या कादंबरीवर बंदी आणण्याची मागणी होते.अर्थातच आपले निधर्मी ( म्हणजे फक्त हिंदुधर्मीय नसणारे) सरकार त्यावर लगोलग बंदी घालते.रझियाच्या घरी येऊन कादंबरीच्या सर्व प्रती जप्त करण्यात येतात इतकेच नव्हे तर त्याबरोबर तिच्या वडिलांनी जतन केलेला व ज्या संदर्भांचा वापर तिने कादंबरीत केलेला असतो तो ग्रंथसंग्रहही जप्त करण्यात येतो.

या काळात तिचा नवरा तिला पुन्हा आपलीशी करण्याच्या प्रयत्नात असतो.त्याच्या मते अजूनही ती त्याचीच बायको असते.दुसऱ्या लग्नाची बायको अगदी अल्पशिक्षित असल्यामुळे त्याची बौद्धिक भूक ती भागवू शकत नाही.त्यामुळे तो रझियाकडे येऊन आपली चूक मान्य करतो व पुन्हा आपण संसार सुरू करूया असा आग्रह करतो.त्यासाठी दुसऱ्या बायकोला तलाक द्यायचीही त्याची तयारी असते.पण रझिया त्याला चांगलीच धारेवर धरते.तो दारू पिऊन बळजबरीने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करतो पण ती त्याला झिडकारते व हॉटेलमधील त्याच्या खोलीत त्याची रवानगी करते. तो शुद्धीवर आल्यावर त्याला आपली चूक कळते.मधल्या काळात त्याने तिने लिहिलेली कादंबरी वाचलेली असते त्याचप्रमाणे शास्त्रींशी केलेला युक्तिवादही ऐकलेला असतो व त्यातील सत्यतेची त्याला खात्री पटलेली असते.

आणखी पुढची पायरी म्हणजे रझियालाही पकडून तुरुंगात टाकण्याची तयारी शासन करते.ही गोष्ट आमीरला तो शासकीय वर्तुळात मित्र बाळगून असल्याने कळते. त्याची सदसद्विवेक बुद्धी जागृत होऊन व आता खरोखरच तिच्याविषयी  प्रेम आपल्या मनात आहे याची जाणीव त्याला झाल्यामुळे तो तिला भूमिगत होण्याची  सूचना करून त्यासाठी तिला मदतही करतो.शिवाय सरकारने तिला पकडण्याचा घाट घातला तर त्यावर अटकपूर्व जामीन वगैरे मिळवण्याची तयारी करतो. पुस्तकाच्या सत्यतेविषयी त्याला खात्री असल्याने  बंदीविरुद्ध न्यायालयात लढण्याचे ठरवून सर्व संदर्भांची यादी तो तिला बनवण्यास सांगतो त्या संदर्भांची यादी देऊनच पुस्तकाचा शेवट केला आहे.म्हणजे लेखकाची संदर्भसूची तीच आहे. त्यात अनेक मुस्लिम विद्वानांच्या तसेच विवेकानंदांसह हिंदू विद्वानांच्या पुस्तकांचा व लेखांचा उल्लेख आहे.  

विकीलीक्सनेही अनेक प्रकरणांचा पर्दाफाश केला म्हणजेच त्यांच्यावर राज्यकर्ते किंवा आणखी कोणी घातलेली  आवरणें काढून खरी माहिती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न चालवला आहे.विकिलीक्सने खुल्या केलेल्या कागदपत्रातून निव्वळ विशिष्ट गैरव्यवहारांची माहिती मिळत नाही तर सरकारे,लष्कर,बॅंका अशासारख्या सत्तासंस्था नक्की कशाप्रकारे कारभार चालवतात याविषयी तपशीलवार माहिती मिळते. आपल्याकडे माहितीचा अधिकार प्रदान करण्याचे औदार्य शासनाने दाखवले तरीही प्रत्यक्ष माहिती मिळण्यात किती अडचणी उभ्या करण्यात येतात आणि ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कोणत्या प्रसंगांचा सामना करावा लागतो ही गोष्ट सर्वज्ञात आहेच.

"आवरण"च्या लेखकाला हेच दाखवायचे आहे की राजकारणी केवळ आपल्या सत्तेला असणारा धोका कसा टाळता येईल असा विचार करतात.त्यामुळे मुस्लिम जनतेला बरे वाटावे म्हणून मुस्लीम आक्रमणाचा  इतिहास आवरण घालून झाकण्याचा प्रकार कसा चालू आहे हे लेखकाने पूर्णपणे ऐतिहासिक संदर्भ देऊनच दाखवले आहे. विशेष म्हणजे या संदर्भात मुस्लिम ग्रंथकारांचेही संदर्भ आहेत.लेखकाने प्रस्तावनेत मुस्लिम कुटुंबात राहून काही गोष्टी समजावून घेतल्या शिवाय डॉ.सिद्दिकी,एच्.इब्राहिम या विद्वानांच्या ज्ञानाचाही उपयोग झाला असा उल्लेख केला आहे आणि कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वी पंजाब हरयाणाच्या उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश ,कायद्यातील काही विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे लेखक,आणि झारखंड आणि बिहार प्रांताचे माजी राज्यपाल एम्.रामाजोईस आणि काही प्रख्यात वकील यांना दाखवून मगच ती प्रकाशित करण्यास दिली .

लेखकाच्या मते सत्यावर घातलेले आवरण काढून सत्यदिग्दर्शन करण्याचा हा प्रयत्न आहे.त्यांच्या मते साहित्यिकाची अंतिम निष्ठा सत्याकडेच असली पाहिजे.त्याचमुळे इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. त्यातील चुका पुढील पिढीला कळल्याच पाहिजेत तरच त्यातून धडा घेऊन पुढील पिढी त्या चुका टाळू शकेल.