खिंड

परवा अनेक दिवसानंतर 'त्या' खिंडीची आठवण झाली. त्या खिंडीचे खरे नाव मला माहिती नाही. काही जण कादवे खिंड, धानेप खिंड, कादवे नॉच अशा नावाने संबोधतात. पण मी मात्र 'त्या' खिंडीला मी महाराजांची खिंड म्हणतो.   पानशेत धरणाच्या अलीकडे १ किमी अंतरावर एक रस्ता डावीकडे वर जातो. ह्याच रस्त्यावर साधारणतः १० किमीवर ही खिंड आहे. मोसे खोऱ्यातून वेल्हे खोऱ्यात जाणारा हा शिवकालीन मार्ग. सोप्या भौगोलिक भाषेत सांगायचे झालेच तर पानशेत मार्गे तोरण्याकडे जायचा हा रस्ता. महाराज बाजी पासलकरांना भेटायला ह्याच मार्गाने येत असत. काही वर्षांपूर्वी ह्या अनुषंगाची पाटी रस्त्याच्या सुरुवातीला उभी होती. म्हणजे अजूनही आहे, पण ती आता इतकी गंजली आहे की त्यावरचे एकही अक्षर नीट वाचता येत नाही; आणि महाराजांचे चित्रही धड दिसत नाही.

आता तुम्ही म्हणाल की ह्यात विशेष काय आहे मग? त्या खिंडीत कुठली लढाई झाली होती की कुठला असा ऐतिहासिक प्रसंग घडला होता जेणे करून त्या खिंडीला 'विशेष' हा दर्जा देता येईल? नाही. असे काहीही नाही. खरेतर तुमच्यासाठी काहीच विशेष नाही, कदाचित इतिहासासाठी पण नसेल. पण माझ्यासाठी नक्कीच आहे. ह्या खिंडीबद्दल माझ्या मनात एक विशेष आदराचे स्थान आहे.  
मला आठवते आहे की समीर आणि मी ६ वर्षांपूर्वी कॉलेजात असताना त्या खिंडीत प्रथम गेलो होतो. समीर त्या आधी काही वर्षे मुकुल सोबत जाऊन आला होता. मला समीरने इतकेच सांगितले होते की त्या खिंडीत गेल्यावर तोरण्याला प्रचंडगड का म्हणतात ते तुला कळेल.  सुरुवातीला पानशेत जलाशयाला (तानाजी जलाशय) लागून सुंदर रस्ता आणि नंतर मोडका घाटमार्ग असा हा केवळ १० किमी चा प्रवास. वाटेत दूरूनच ती खिंड लक्षात येते. दोन डोंगरांच्या मधील अगदी बारीक खाच. दूरून असे वाटतच नाही की त्या खाचेत रस्ता आहे म्हणून. घाटमार्गावर जंगलही फार सुरेख आहे. वळणा वळणाचा घाट चढून आपण जसे वर जात राहतो, तस तसा पानशेत, वरसगाव धरणाचा भव्य प्रदेश नजरेत येत जातो. एक शेवटचे १८० अंशातले वळण घेऊन आपण खिंडीसमोर काही मीटर अंतरावर येऊन उभे ठाकतो. खड्या चढावामुळे खिंडीपलीकडे काय असेल ह्याचा थांगपत्ताही लागत नाही. आणि खिंडीच्या मुखाशी पोहोचताच मागून अजस्र तोरणा डोके वर काढतो. आणि खुद्द खिंडीत पोहोचल्यावर आपोआपच उद्गार बाहेर पडतात - प्र... चं.... ड... ग... ड (ऍन्ड आय मीन इट). एका नजरेत न मावणारा असा प्रचंडगड.
'सर्वप्रथम मी जेव्हा खिंडीत गेलो होतो तेव्हा तोरणा पाहून झालेली माझी अवस्था शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. मी बाइक वरून उतरून नतमस्तकच झालो होतो. ह्याच रस्त्याने महाराज अनेक वेळा आले गेले असतील. ह्याच खिंडीत उभे राहून त्यांनीही तोरण्याचे हे रूप मन भरून पाहिले असेल, अथवा हे रूप पाहून असेच भरून आले असेल. कदाचित त्यांनी ह्याच खिंडीतून तोरणा सर्वप्रथम पाहिला असेल आणि पाहताच क्षणी मनी विचार पक्का केला असेल. हाच, हाच गड जिंकून स्वराज्याचे तोरण उभारायचे. कदाचित ह्याच खिंडीत बाजी महाराजांना निरोप द्यायला येत असतील. महाराजही बाजींना कडकडून मिठी मारून 'बाजी आम्ही तुम्हावर अवलंबोनी आहोत. रयतेची काळजी घेणे, शत्रूंवर अंमल कायम ठेवणे' अश्या मोजक्या शब्दात बाजींना निरोप देऊन राजगडावर आऊसाहेबांना भेटावयास अथवा कुठल्याश्या मोहिमे वर प्रस्थान करत असतील. न जाणे ह्या खिंडीने काय काय अनुभवले असेल. शेवटी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड ही. आणि त्याच खिंडीत मी आज उभा. बाइक साइडला लावून. लायकीहीन, क्षूद्र. पण माझ्यापेक्षा लायकीहीन अशी जनता ह्याच खिंडीत येत असते हे लगेच मला समजले. कारण वेफर्स, बिस्किटस आणि गुटख्याची काही पाकिटे लगेच आसपास दिसली. खरेतर ही तशी रिमोट जागा. आडवाटच. वाहता रस्ताही नव्हे. पण लोकांना काय? घर सोडून सर्व कचराकुंडीच वाटते.   
त्यानंतर महाराज मला माफ करतील ह्या आशेवर अनेकदा त्या खिंडीत येणे जाणे वाढले.  कधी मित्रमंडळींसोबत, कधी एकटेच, कधी चालत, कधी बाइकवरून, कधी चारचाकीने. वीकएंडला काहीच प्लॅन नसेल, कुठलाच ट्रेक नसेल तर त्या खिंडीत जाणे मी पसंत करतो. खिंडीतून खाली उतरून, पाबे घाटातून परत पुणे असा माझा अत्यंत आवडीच बाइकिंग शिरस्ता आहे. पहाटे लवकर खिंडीच्या पायथ्याशी पोहोचायचे,  कादवे गावात धारोष्ण दूध पिऊनच पुढे मार्गक्रमण.  मग खुद्द खिंडी मध्ये अर्धा तास बसून इतिहासाचा गाडा मागे फिरवणे,  धानेप गावात गाडी पार्क करून वेल्हाच्या धरणाच्या आसपास फेरफटका मारणे, भरपूर फोटो हापसणे (आधुनिक पुणेरी मराठी मध्ये फोटो काढणे म्हणजे फक्त १०-१२ च फोटो काढणे, हापसणे म्हणजे मनसोक्त कसलेही आणि कितीही फोटो काढणे होय. ),  किंगफिशर उर्फ खंड्याचे शिकारी सुर टिपण्याचे निष्फळ प्रयत्न करणे,  करवंदे खाणे, धरणाच्या पाण्यात डुंबणे, मग पुढे वेल्ह्यात जाऊन विविध पदार्थांवर आडवा हात मारून पाबे घाट मार्गे पुन्हा पुण्यगमन असा क्वालिटी आणि दर्जेदार प्लॅन अमलात आणून रविवार सार्थकी लावण्यासारखे दुसरे सुख नाही.  
आणि ह्या स्वर्गसुखाला जोडणारा दुवा म्हणजेच ती महाराजांची खिंड.  खिंडीच्या एका बाजूला पुण्याची बाजू, ते शहरी धकाधकीचे जीवन (आता पुण्यातल्या जीवनाला मी धकाधकीचे जीवन म्हणून मी तमाम मुंबईकरांची माफी मागतो), ट्रॅफिक जॅम, प्रदूषण आणि इतर अनंत कटकटी; तर खिंडीच्या दुसऱ्या बाजूस स्वर्ग. पुण्यापासून केवळ ५० किमी दूर. कुणी मला विचारले 'वीकएंड गेटवे म्हणजे काय?' तर मी त्या खिंडीकडे बोट दाखवेन. तो आहे गेटवे. त्याच्या पलीकडे स्वर्ग आहे. त्या खिंडीला मी वीकएंड गेटवेचा 'फिजिकल स्टेटस' प्रदान केला आहे.    खिंडीपलीकडच्या लोकांना पुण्याचे अप्रूप, तर मला खिंडी पलीकडल्या जीवनाचे. ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन दी अदर साइड ह्या म्हणीचा हा जिवंत पुरावा.  
अशा ह्या खिंडीत गेले ६ महिने जाणे झालेच नाही. परवा कॅलेंडर चाळता चाळता शिवजयंती जवळ आलेली पाहून त्या खिंडीची आठवण झाली. रविवार होताच. वेळ तर असतोच. नसला तरी खिंडीत जायला वेळ काढणे अशक्य नक्कीच नाही. मग का वाट पाहावी? 'आई जरा महाराजांच्या खिंडीत जाऊन येतो' असे म्हणत, आई स्वयंपाकघरातून बाहेर येईस्तोवर हेल्मेट घेऊन, कॅमेरा गळ्यात अडकवून मी घरातून पसार झालो होतो.