मनोज शिंदे

ज्या गुरुवारातल्या बावन बोळात गोपी भेटला त्याच बावन बोळातल्या चिखलात मनोज शिंदे नावाचे एक कमळ उगवताना मी बघितले. इंदिराजींच्या हत्येच्या काळात जेव्हा मी तिथे शाखेच्या कामासाठी गेलो तेव्हा हा महाविद्यालयात शिकत होता. हा क्वचित कार्यक्रमाला वगैरे येत असे. तो काही फार रोज शाखेत येत नसे. पण तिथे एकूण तरुण वर्ग फारसा संघाजवळ येत नसल्याने मी त्याच्या कडे नेहमी येऊ जाऊ लागलो. मध्यम उंचीचा, वर्णाला काळा, काहीसा स्थूल आणि ढगळ कपड्यातला मन्या बघितल्यावर त्याचा कोणताही प्रभाव पडत नसे. बहुधा कधी केसांनाही कंगवा लागत नसावा. त्याचा फारसा काही उपयोग नाही असेच सर्वांचे मत होते. पण मी मात्र त्याला सोडायचे नाही असे ठरवले.  

आणखी एक विशेष बाब आठवते ती म्हणजे त्याला एक अतिशय सुंदर बहीण होती; की जिला माझ्याबद्दल थोडे आकर्षण देखील असावे. मला प्रचारक म्हणून जायचे असल्याने मी तो विषय पुढे वाढू दिला नाही. "इथे सुरू होण्या आधी संपली कहाणी".  

मन्याची थोडी फार मदत झाली असेल नसेल तोच माझी बदली झाल्याने त्याचा शाखेत येण्याचा विषय संपला. पण कारणपरत्वे संबंध ठेवल्याने ओळख टिकून राहिली. तो graduate झाला. मी देखील ९१ साली स्वतःचा दवाखाना सुरू केला. तेव्हा पासून आज तागायत जे मित्र माझ्याकडे येत आहेत त्यापैकी मन्या एक होऊन गेला.

पुढे मन्या देखील ST त नोकरीला लागला. वरकमाई असलेल्या post वर असला तरी ५ पैसेदेखील खाण्याचा त्याचा पिंड नसल्याने नोकरीत तशी त्याची कुचंबणा होत असे. पण कामगारांशी मात्र त्याचा संबंध येत असे. आणि त्यांना मात्र याची पूर्णं मदत असल्याने त्यांच्यात तो लवकरच लोकप्रिय झाला. अतिसामान्य कामगाराचे हाल त्याला पाहवेनात. शिकलेल्या माणसाची जी जी म्हणून गरज त्यांना असे ते ते काम हा union member नसून देखिल करून द्यायचा. "डाक्टर, वेळेला जिवाला जीव देनारी मानस आहेत ही! ’ आपली खाली घसरणारी pant वर ओढत तो म्हणाला होता. त्यावेळी त्याचा चेहरा आनंदाने भरून गेलेला मी पाहिला. Pant वर ओढून झाल्यावर त्याने आपले बोट माझ्याकडे रोखलेले असायचे. "तुमचा काय बी problem असूद्या येणारच धावून" शिकला असला तरी मन्याने आपल्या भाषेला फारसा बामणी वास लागू दिला नव्हता.  

st तल्या एकाचे काम फार चांगले होते, तो स्वतःच्या खर्चाने काही अनाथ अपंग मुलांना सांभाळायचा. त्याला मध्येच पैशाची गरज भासे मग मन्या आधी आपला खिसा साफ़ उलट करणार मग इतर ४ जणांपुढे हात पसरणार आणि त्याची गरज भागवणार! आणि असे अनेकदा व्हायचे, तरी विना तक्रार तो करी, "आपुन काही करू शकत नाही निदान त्याला बिचाऱ्याला तरी मदत करावी नाही का? " 

अस म्हटलं तरी तो काहीच करत नाही हे काही खरे नव्हे. तो अण्णांचा परम भक्त, सत्सन्गाला जाणे, वहीत गणपतीचे नाम त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिहून काढणे याच बरोबर अण्णांच्या मुश्टिधान्य योजनेसारख्या अनेक योजनांमध्ये याचा निष्ठेने सहभाग असे. "अण्णांनी सांगितलंय डाक्टर, तुम्ही काही काळजी करू नका. अण्णा म्हनलेत मी सगळं बदलून टाकणार आहे! " देशाच्या स्थितीवर होणाऱ्या चर्चेला त्याच्या कडे चोख उत्तर होते! खरंच असा अढळ विश्वास असणारी माणसं आज किती सापडतील? त्याने दिलेली तारीख आता उलटून गेली आहे पण तो नवी तारीख नक्की देणार आणी परिवर्तन तर होणारच 

मन्या स्वामीसमर्थाना गेल्याशिवाय घरी कधीच येत नसे. त्यांच्यावर पण त्याची अपार श्रद्धा! आधी दर्शन मगच प्रापंचिक कामे.

हाच मन्या कामगारांच्या हितासाठी चक्क एक कुख्यात गुंडाकडे गेला त्याची union st त आणली. मग कित्येक दिवस तो भाईच गुणगान करीत असायचा, "भाईचा दरबार असतो तिथून कोणी विन्मुख जानार नाही. कुनाची बायको नांदत नाही कुनाला नवरा मारतो, १० मिनिटात त्याला हजर करनार की लगेच तित्थच फ़ैसला! " हे सांगताना त्याचा चेहरा असा काही चमकत असे! मन्याशी वाद घालण्यात काही अर्थ नसे. "भाई पुण्याला येणार म्हटलं की ५ लाख रु. खर्च असतो" मन्या सांगत होता "५ लाख?! " मी वेडाच व्हायचा बाकी. ''security केवढी लागते काही idea? पुन्हा मध्येच भाई गाडी बदलतात. आणि भाईचा एक dummy त्याच्या गाडीत जातो! " तो सांगत राहायचा. मी म्हणे ’अरे ही security system आपल्या police ना कळवली पाहिजे निदान PM तरी सुरक्षित राहतील! " "अहो आता भाईच मंत्री होतील मग बघा" खरंच पुढे भाईंनी मंत्रिपदावर उडी मारलीच. "आता ५लाख वाचत असतील ना? " माझा बाळबोध प्रश्न! " छे ते काही police सुरक्षेवर अवलंबून राहत नाहीत!! " मी clean bold!

दरम्यानच्या काळात मन्याचा संसार वृक्ष छान बहरून आला smart बायको एक गोंडस मुलगा. त्या मुलाभोवती त्याचा उरला सुरला सगळा वेळ जाऊ लागला. काही झालं की तोच मुलाला दवाखान्यात घेऊन यायचा. सायकलवर त्यासाठी पुढे खास sit करून घेतलेले. सांगावे ते सगळे तो तंतोतंत पाळणारच खर्चाची कुरकूर कधी नाही. बायको म्हणाली म्हणून english medium ला घातला. ओढाताण झाली तरी खर्चाची आणि बायको कमी शिकलेली असल्याने घरी अभ्यास घेण्याची कधी अडचण मानली नाही. रात्री उशीर झाला तरी स्वतः घेणार!  

सगळं छान असले तरी कथा कादंबऱ्या काही खोट्या नसतात! परीक्षेची घडी आली होती…….

एक दिवस अचानक मन्याचा छोकरा - पिटूच वर्तन बिघडायला लागल्याच जाणवू लागलं. बाप काळजीत पडू लागला. पिटू वेळीअवेळी झोपेतून उठू लागला. काही बाही चित्रविचित्र बोलू लागला सुरुवातीला वाटलं की काहीतरी मुलाचे हट्ट न पुरवले गेल्याने नाराजी असेल. आवडीचे काहीबाही आणूनही दिले पण मुलगा सुधारेना उलट बिघडतच चालला. काय करावे कळेना. जवळच्या doctor ला दाखवून झाले. गुण येईना. एकदा तर मी भेटायला गेलो तर तो समोर आहे असे कळले म्हणून बघतो तर एका छोट्याशा हौदात पिटू पोहत होता आणि विमनस्क पणे कपडे घेऊन काठावर मन्या उभा होता "असा तो तास अन तास पोहोत राहतो. एवढा stamina कुठून आला काय माहिती? " मन्याचा चेहरा बघवत नव्हता.  

आता पिटू ऒरडा आरडा करू लागला होता. तो घरातून बाहेर पडायचा वेड्यासारखा भटकत फ़िरत राहायचा. पिन्टुच्या डोक्यावर परिणाम झाला होता. आपण एखाद्याला डोक्यावर पडलास का म्हणून किती सहजपणे म्हणतो? ज्याच्यावर वेळ येते त्याला स्वतःला वेड लागायची स्थिती येते. मन्या मुळापासून हादरला होता. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता तो मागेपुढे न बघता देत होता. तो आणि त्याची बायको मुलाच्या मागे मागे फ़िरत असत. किती रजा झाल्या त्याला काही गणतीच नव्हती. रात्री घरी येई पर्यंत दोघे अगदी थकून जात तरी मुलगा झोपू देत नसे. जागरण आणि हिंडणे चालूच राहिले. डाक्टरी उपाय चालत नसल्याने एकीकडे बाहेरचे बघण्याचा सल्ला मिळाला. त्या नावाखाली फ़सवणुक देखील खूप झाली पैशापरी पैसा गेला गुण मात्र काहीच नाही. एकीकडे घरासाठी कर्ज काढलेले आणि घरही ताब्यात नाही.builder ची दिरंगाई दुसरीकडे हि समस्या.

''डाक्टर रोज स्वामींशी भांडतोय माझ्या वाट्याला का हे दिलंत? काय चुकले माझे? " तो रडवेला झाला होता "अरे स्वामी परीक्षा बघतात, निघेल काही तरी मार्ग निघेल" मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण खरे उत्तर माझ्यापाशी नव्हते.

पिन्टुचा आजार काही वेगळाच होता. हा जपाला बसला की तो अंगावर धावून येई म्हणे" तू काय माझ्या मुळावर येतो काय? "अण्णाकडे नेला तर त्याच्या अत्यंत तेजस्वी नजरेला खुन्नस नजर देऊन बघत होता. मी उपचार करू शकलो नसलो तरी आयुर्वेदात राक्षसजुष्ट नावाचा एक उन्माद सांगितला आहे तसे काहीसे वाटत होते.shock tretment ला मन्याने स्पष्ट नकार दिला होता ते त्याला सहन होणार नव्हते. आजी आजोबांना पिटू फार त्रास देऊ लागल्याने मन्या family घेऊन लांब कुठेतरी गेला असे कळले. बऱ्याच दिवसात संपर्क तुटला रुख रुख वाटत होती. फोन देखिल लागत नव्हता आणि एक दिवस मन्या येऊन हजर झाला.  

त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता अ‍ेका नाथ पंथी साधूने ५ पैसे न घेता पिन्टुला बरे केल्याचे सांगितल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आता ते दोघे रस्त्याने भटकताना किंवा मन्या कपडे सांभाळताना दिसणार नव्हता!  

आजारातल्या अफाट खर्चाच्या काळात एकदा मन्या म्हणाला होता "डाक्टर या पोराला या आजारातून बाहेर काढणार, आम्हाला pension नाही, म्हातारपणी औषधपान्या वाचुन मेलो तरी बेहेत्तर पण हे पोरगं अस नाही ठेवनार! " 

माझ्या डोळ्यात दाटून आलेली हि आसव बहुधा आनंदाची असतील असा अंदाज आहे! मग लेका तुझे अध्यात्म कुठे गेले? " मित्रांनो, स्वतःला झोकून देऊन प्रेम करणारे असे लोक भेटत राहिले तर मी हजार मोक्ष कुर्बान करायला तयार आहे. आणि तसाही मुलाला काढून ठेवलेल्या खिरीतला १ चमचा काढून घेण्याचा मोह होणाऱ्या आपल्यासारख्या पामरांना लै जनम घ्यावे लागणार आहेत.