अर्थ, काम आणि मोक्ष!

मानवी जीवनात तीन पुरुषार्थ सांगितलेत; अर्थ, काम आणि मोक्ष!

धर्म हा मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग आहे तो पुरुषार्थ नाही.
__________________________
या विषयाच्या अंतरंगात जाण्यापूर्वी आध्यात्मिक प्रक्रिया काय आहे ते जाणणं उपयोगी होईल.

जगातली कोणतीही आध्यात्मिक प्रक्रिया एकच गोष्ट करते : तुमचं लक्ष (ध्यान) जे सदैव दुसऱ्याकडे लागलेलं असतं ते तुमच्याकडे वळवते!

माझ्या सांगण्याचा अनुभव तुम्हाला उद्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या दरम्यान घेता येईल.

सामना सुरू होईल तेव्हा आपण असू, समोर टीव्ही (किंवा प्रत्यक्ष सामना) असेल आणि आपलं सगळं लक्ष सामन्यावर लागलेलं असेल. जोपर्यंत सामना संपत नाही तो पर्यंत आपल्याला आपलं संपूर्ण विस्मरण झालेलं असेल.

सामन्याच्या दरम्यान तुम्ही जर सतत तुमच्या जाणीवेचा रोख 'दुहेरी' करण्याचा प्रयत्न करत राहिलात, म्हणजे एकाच वेळी 'आपण आहोत ही जाणीव आणि सामन्याची दखल' असा करू शकलात तर एक मजेशीर अनुभव तुम्हाला येईल.

सामना बघत असलेलं शरीर आणि चालू असलेला सामना या दोन्ही पासून तुमचं लक्षं एकदम वेगळं होईल आणि तुम्हाला एकाच वेळी 'सामना आणि तो बघणारं शरीर' जाणवायला लागेल, आपल्या निराकारत्वाचा तुम्हाला बोध होईल!

हा निराकारत्वाचा बोध झाला तर मग (जो पर्यंत तुम्ही पुन्हा विचारांच्या फेऱ्यात सापडत नाही) सामन्याच्या निकालाचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही! कारण पाकिस्तान, भारत, हार, जीत या सगळ्या आपल्या कल्पना आहेत.

सामना खरा आहे पण त्या भोवती तयार झालेली सायकॉलॉजी व्यक्तीगत आहे. तुम्हाला सामन्याची मजा निश्चित येईल पण तुम्ही (इतरां सारखे) एक्साइट होणार नाही.

या स्वास्थपूर्ण चित्तदशेचं कारण म्हणजे तुमचं लक्ष (किंवा जाणीवेचा रोख) प्रसंगा कडून स्वतःकडे परत आलेला असेल!

जगातली प्रत्येक आध्यात्मिक प्रक्रिया ही जाणीवेचा रोख स्वतःकडे वळवण्याची प्रक्रिया आहे.

___________________________________________

अर्थ आणि काम या दोन जीवनातल्या मुख्य विवंचना आहेत. प्रत्येक विवंचना फक्त एकच काम करते, तुमच्या इच्छे विरुद्ध, तुमचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते.

काम ही निसर्गाच्या निर्मितीची प्रक्रिया आहे त्यामुळे कुणाचीही व्यक्तीगत ध्येय जरी कितीही उदात्त असली तरी निसर्ग मानवी जीवनातली ऊर्जा फक्त स्वतःच्या पुननिर्माणा साठीच तयार करतो.

प्रत्येक ऊर्जा (एनर्जी), मग ती न्यूक्लिअर असो, थर्मल असो, सोलर असो की बायो, 'न्यूट्रल' असते आणि तिचा उपयोग वापरण्याच्या बुद्धीमते अवलंबून असतो.

अध्यात्म न समजलेल्या लोकांनी कामाला प्रथम रिपू करून ऊर्जा निर्मितीचा स्रोतच सैरभैर केलाय. जीवनात प्रणय निषिद्ध केला की बायो एनर्जी निर्माण होण्याची प्रक्रियाच मंदावते.

बहुतेक स्त्रिया अकाली प्रौढ होतात आणि पुरूष संसार रसहीन झाल्यानं पैसा, सत्ता, अनावश्यक कार्यमग्नता, व्यसनं, कोणत्याही विषयावर (ज्यात आपल्याला काहीही करता येणं शक्य नाही) बेफाम चर्चा, निरर्थक नामस्मरण, तथाकथित मोक्षप्राप्ती, जीवन मरणाच्या फेऱ्यातून सुटका, झालंच तर युद्ध किंवा मग विवाहेतर संबंध अशा गोष्टीत रस घ्यायला लागतात.

कोणतंही सक्षम शरीर हे नेहमी उर्जावानच असतं आणि प्रणयाची संभावना सदैव उपलब्ध असणं हे त्या ऊर्जेचं प्रार्थमिक लक्षण आहे, अर्थात, तुम्ही ती ऊर्जा प्रणयासाठीच वापरायला हवी असं नाही!

ऊर्जाहीनता जीवनातला रस नाहीसा करते या रसहीनतेला वैराग्य म्हटलं जातं. अस्तित्व सदैव उत्सवपूर्ण असतं पण चुकीच्या दृष्टिकोनामुळे ते निरस वाटायला लागतं.

ऊर्जा आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्याची, स्वतःचा बहुआयामी विकास साधण्याची ऊर्मी देते. आपल्याला जे शिकावंस वाटत होतं, जे करायला सवड नव्हती ते करण्याची संधी देते पण मुळात ऊर्जाच नसेल तर शरीराची लवचीकता, मनाचा उमदेपणा हरवायला लागतो.
______________________________

सक्षम शरीराची प्रणय क्षमता आणि कामुकता या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. कामुकता म्हणजे कामा विषयी केलेलं चिंतन हे खरं तर शारीरिक ऊर्जा नसल्याचं लक्षण आहे.

फारूख शेखनी एकदा म्हटलं होतं की ज्यांना अभिनय करता येत नाही ते समीक्षक होतात आणि ज्यांना अभिनय करता येतो ते अभिनेते होतात, हा तसा प्रकार आहे.

बुद्धिमत्ता असेल तर प्रामाणिकपणे मिळवलेला पैसा उत्तम रीतीनं उपभोगता येतो. बुद्धिमत्ता याचा अर्थ आहे तो पैसा समोर असलेल्या प्रसंगासाठी समरसून वापरणं. हे एकदा जमलं की अर्थाचा पुरुषार्थ साध्य होतो, आपण भविष्यकालीन विवंचनांनी ग्रस्त होऊन अर्थसंचय न करता आहे तो पैसा वर्तमानात वापरायला शिकतो. 'अर्थ' विवंचना न राहता सुखी आणि स्वस्थ जीवनाचं साधन होतो.

अमाप पैसा मिळवणं हा पुरुषार्थ नसून आवश्यक तेवढा पैसा प्रामाणिकपणे मिळवून तो योग्य रीतीनं वापरणं हा खरा पुरुषार्थ आहे.

रोज आणि नेहमी एकावेळी एक दिवस जगणं हे खरं धैर्य आणि बुद्धिमत्ता आहे कारण प्रत्येक आर्थिक विवंचना ही भविष्यकालीन आहे आणि कितीही पैसा असला तरी जोपर्यंत आपण वर्तमानात जगत नाही तोपर्यंत तो अपुराच आहे.

__________________________

काम ही विवंचना नाही, अध्यात्म न समजलेल्या लोकांनी केलेला तो अपप्रचार आहे.

प्रणयाला खरं तर फार मोठं आध्यात्मिक परिमाण आहे, तुम्ही तुमचं निराकारत्व प्रणयातून जाणू शकता.

ओशो त्यांच्या याच विषया वरच्या पुस्तकामुळे प्रकाशात आले असले तरी माझा दृष्टिकोन त्यांच्या पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

सार्थक प्रणयाचे तीन पैलू आहेत. एक, कमालीचं स्वास्थ्य; दोन, एकमेकांचं ट्यूनिंग आणि तीन, दुसऱ्याला आनंद देण्याची आस.

मला भारतीय विवाह संस्थेचं कौतुक यामुळे आहे की पत्नी आणि केवळ पत्नी बरोबरच ही तीनही परिमाणं साध्य होऊ शकतात.

कमालीचं स्वास्थ याचा अर्थ समय शून्यात, वेळेचा प्रश्नच नाही अशी स्थिती! अशी स्थिती निर्माण होण्यासाठी मन पूर्णपणे विचार रहित हवं. विवाह ही समाजमान्य प्रथा आहे आणि तुम्ही तुमची प्रिय व्यक्ती निवडली असेल तर मन संपूर्णपणे निर्धास्त असतं. जर रोजची कामं पूर्ण असतील तर मनावर उद्याचं ओझं नसतं आणि या स्थितीत दोघंही पूर्णपणे विचार रहित अवस्थेत सहज येऊ शकतात आणि समय शून्य होतो!

परस्परांचं ट्यूनिंग हा एका बाजूला एकमेकां विषयी वाटणाऱ्या आकर्षणाचा आणि दुसऱ्या बाजूला जिव्हाळ्याचा भाग आहे तो देखील पती-पत्नी या नात्यात सहज जमून येतो.

देण्याची आस हा परस्परां विषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेचा परिणाम आहे, इच वन वुड लव्ह टू गिव्ह प्लेजर टू द अदर.

ही तीनही परिमाणं जर प्रणयात उपलब्ध असली तर काही वेळातच दोघांना एक कमालीची शांतता जाणवायला लागते. ही शांतता हळूहळू स्वास्थ्याचं परिमाण धारण करते आणि मग ती दोन्ही मनं आणि दोन्ही देह संपूर्णपणे व्यापून टाकते.

अशा एका उत्कट क्षणी दोघांनाही हा बोध होऊ शकतो की आपण नाही आहोत, वी आर नॉट!. सगळं अस्तित्व सभोवताली आहे, रात्र आहे, देह आहेत, गंध आहे, स्पर्श आहे पण आपण नाही! ही शून्य अवस्था आहे, दोघांच्या व्यक्तिमत्त्वांचं संपूर्ण निरसन झाल्यामुळे आलेली स्थिती आहे.

बुद्धानं म्हणूनच सत्याला शून्य म्हटलंय, या शून्य स्थितीचा, आपल्या स्वरूपाचा अनुभव दोघांना येतो आणि मग साऱ्या जीवनाचा रंगच बदलून जातो!

प्रणयाकडे या दृष्टीनं बघितलं तर काम हा रिपू राहत नाही, पुन्हा पुन्हा शून्याप्रत पोहोचण्याचा, त्या अंतिम स्वास्थ्याचा तो अत्यंत रम्य आणि नैसर्गिक राजमार्ग होतो. तुम्ही अस्तित्वाप्रत आणि एकमेकांप्रत कृतज्ञ होऊ शकता.

_____________________________

अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ मी सांगितलेल्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते तुम्हाला मोक्षाप्रत नेऊ शकतात कारण मोक्ष म्हणजे अल्टिमेट रिलॅक्सेशन, आपली स्वतःची स्वतःशी एकरूपता! मग अर्थाच्या विवंचनेतून मुक्त होऊन सार्थक प्रणयाच्या एखाद्या उत्कट क्षणी तुम्हाला हा बोध होतो की आपली स्वतःची स्वत:शी असलेली एकरूपता कोणतीही विवंचना, कोणताही प्रसंग अजिबात भंग करू शकत नाही, आपण अभंग आहोत!

तुमच्या जाणीवेचा रोख पुन्हा तुमच्याकडे आलेला असतो आणि तुम्ही तुमच्या स्वरूपाला, निराकारत्वाला उपलब्ध झालेले असता, आकाश झालेले असता, याला मोक्ष म्हटलंय!

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १