आयुर्विद्या - २

आयुर्वेद - भारतीय वैद्यकप्रणाली - ऐतिहासिक दृष्टिकोन-१

कोणत्याही प्रदेशातल्या मानवसमूहाची स्वतःची एक वैयक्तिक प्रणाली असते. ही प्रणाली संरक्षणविषयक असते, कारभारविषयक असते, व्यापारविषयक असते तशीच ती आरोग्यविषयकही असते. या आणि अशा अनेक विभागांतील कार्यांची एक विशिष्ट नीती असते, पद्धती असते. ही नीती किंवा पद्धती जितकी समूहाभिमुख असेल तितका तिच्याकडून अधिक परिणाम साध्य करून घेतला जातो असं मानण्यास प्रत्यवाय नाही. या मुद्द्याचा उहापोह करण्याचं कारण असं की अतिशय प्राचीन मानल्या गेलेल्या भारतीय मानव समूहाने या संदर्भात निदान आरोग्यविषयक प्रांतामध्ये चांगल्यापैकी मूलगामी विचार केलेला आढळतो.

जेव्हा मानव-समूहातील मूलभूत वैद्यकविषयक उत्क्रांतीचा प्रश्न निघतो तेव्हा अपरिहार्यपणे याचा उगम मंत्र-तंत्राशी आणि मांत्रिकांशी लावला जातो. याचे कार्यकर्तृत्व त्या समूहातील एखाद्या वयस्कर स्त्रीकडे असते आणि याचा प्रसार तिच्याकडून वंशपरंपरेने केला जातो. या विषयी कुठेही लिखित स्वरूपात नोंदणी केलेली मिळत नाही आणि तशी झाली असल्यास ती शक्यतो गुप्त राखण्याकडे कल दिसून येतो. हिचे स्वरूप काहीसे घरगुती औषधोपचाराकडे झुकणारे असते. याबरोबरच ही पद्धती फारच वैयक्तिक असते. संपूर्ण समाजाच्या दृष्टीने यामध्ये विचार करण्यापेक्षा व्यक्तिविशिष्ट शारीरिक - मानसिक तक्रारी आणि त्यावरच्या उपायांचा यात अंतर्भाव झालेला दिसतो. त्यातही देवतांचे कोप आणि त्यांना प्रसन्न करण्याचे उपाय यांचे बऱ्या.पैकी प्राधान्य दिसून येते. मात्र भारतीय चिकित्सा प्रणालीचा अभ्यास करताना आणि त्यावर विचार करताना आपल्याला जरा वेगळा मार्ग अनुसरायला लागतो. असं नाही आहे की वर उल्लेखलेल्या सर्व साधारण वैद्यक विषयक जारण-मारण आणि देवतांच्या कोपविषयक भाग भारतीय संदर्भात अनुपस्थित आहे पण तौलनिक दृष्ट्या भारतीय वैद्यक या प्रकारात फार गुरफटून न बसता लवकरच बाहेर पडल्याचं दिसून येतं. रोगनिर्मिती आणि त्यावरचे उपचार हे घरगुती स्वरूपाचे न राहता त्यांच्यातील सामान्य तत्त्वांचा विचार केला गेल्याचं जाणवतं आणि त्यासंदर्भातील दृष्टीही व्यापक झालेली दिसते. त्याबरोबरच वैद्यक अधिकाधिक समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न जागोजागी दिसून येतो. बऱ्याचश्या व्याधींच्या संदर्भात त्यांचं कर्तृत्व कोणत्या ना कोणत्या देवतेला दिलेलं आपल्याला आढळतंच पण त्याबरोबरच सर्वप्रथम या व्याधीचा प्रादुर्भाव कुणाला आणि कशामुळे झाला यासारख्या मूलगामी गोष्टींवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं.

कोणत्याही मूलभूत सामाजिक संरचनेच्या आणि कार्यपद्धतीच्या भारतीय संदर्भातील संकल्पनांचा अभ्यास करणं झाल्यास बहुतांशी आपल्याला वेदांपासूनच सुरुवात करावी लागते आणि आरोग्यविषयक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. भारतीय वैद्यक विषयक नीतीचे वैशिष्ट्य इथूनच दिसायला सुरुवात होते. वेद हा शब्द विद् ज्ञाने बोधे। म्हणजे जाणणे किंवा ज्ञान अर्थाच्या धातूपासून बनलेला आहे. भारतीय मानसिकता अशी आहे की कोणत्याही ज्ञानाचा स्रोत वेदवाङ्मयामध्ये कुठे ना कुठे नक्की सापडतो. वैद्यकशास्त्राच्या संदर्भातही तशीच धारणा आहे. वैद्यक विषयक ज्ञानाचा वेदवाङ्मयातील स्रोत आयुर्वेद या नावाने ओळखला जातो.

जगात सर्वात प्राचीन मानल्या गेलेल्या वेदवाङ्मयाची बऱ्या.चदा भारतीयांनाही परीपूर्णपणे कल्पना नसते. त्यातही अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या माहितीचे विवेचन केल्याने हा भाग अधिकच गोंधळात टाकणारा बनतो म्हणून या वेदवाङ्मयाची आणि त्याच्या अनुषंगाने आयुर्वेदाची माहिती समजून घेणे योग्य ठरेल. वेदवाङ्मयाला कुणीही कर्ता नाही. असं मानलं जातं की या वाङ्मयाची निर्मिती होत नाही तर त्याची स्मृती होते म्हणजेच ते आहेत त्या स्वरूपात आठवले जातात आणि हा आठवणारा असतो ब्रह्मदेव. त्यातही ब्रह्मदेवाकडून जाणला जातो तो एकच अखंड वेद ग्रंथ. तो ही सत्ययुगाच्या पूर्वी. आपल्याकडे काळाच्या संदर्भात चार युगं मानली गेली आहेत. सत्य किंवा कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कलियुगापर्यंत येईपर्यंत मानवाची क्षमता कमी झाल्यामुळे एकसंघ वेद त्याला ग्रहण करणे अशक्य झाल्याने वेदव्यासांनी द्वापारयुगाच्या शेवटी त्याचे विभाग करून त्यांच्या एक-एक शिष्याद्वारे तो जतन केला आणि म्हणून सध्या दिसणारे चार वेद तयार झाले - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. याबरोबरच त्यांचे उपवेदही तयार झाले. हे उपवेद सर्वप्रथम ब्रह्मदेवाच्याच स्मृतीमध्ये साकार झालेले. यजुर्वेदाचा स्थापत्यवेद, सामवेदाचा गांधर्ववेद, ऋग्वेदाचा धनुर्वेद आणि अथर्ववेदाचा आयुर्वेद.

हे उपवेद प्रकरणच फार गमतीचं आहे. यातल्या सर्वांचेच उल्लेख वेदांमध्ये यत्र तत्र सापडतात पण यांच्यापैकी कुणाचीही संहिता सापडत नाही. मात्र आयुर्वेदाच्या संहितांमध्ये स्पष्ट उल्लेख मिळतात की ज्यामुळे आयुर्वेद अथर्ववेदाचा उपवेद आहे हे मान्य करावं लागतं. (इह खलु आयुर्वेदम् उपाङ्गम् अथर्ववेदस्य। सुश्रुत संहिता-सूत्रस्थान) आता इथेही आयुर्वेद या नावाची संहिता सापडतच नाही पण आयुर्वेद विषयाच्या अधिक अभ्यासाने निर्माण झालेल्या या विषयीच्या ग्रंथांना त्यांच्या त्यांच्या लेखकांच्या नावाच्या संहिता म्हणून ओळखलं जात असलं तरीही त्या मूळच्या आयुर्वेद विषयाच्या संहिताच मानल्या जातात. यामुळे साकल्याने यांनाच आयुर्वेदाच्या संहिता असं नामाभिधान मिळतं. तेव्हा या अशा आयुर्वेदाच्या संहिता ग्रंथांमध्ये त्याच्या अवतरणाविषयी वर्णनं आढळतात. सुश्रुत आणि काश्यप संहितेमध्ये असं म्हटलंय की ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पत्तीच्या आधीच प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी आयुर्वेदाची उत्पत्ती करून ठेवलेली. (अनुत्पाद्यैव प्रजा आयुर्वेदमेवागेSस्रुजत्। सुश्रुत संहिता-सूत्रस्थान आणि आयुर्वेदमेवाग्रेSसृजत्ततो विश्वानि भूतानि। काश्यप संहिता) आयुर्वेद संहितेतील सदर विधान प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटण्याचा संभव आहे पण तर्कनिष्ठ बुद्धीने विचार केला तर सृष्टिटीनिर्मितीपूर्वी वेदांची स्मृती ब्रह्मदेवाला झाली असल्यास त्याच स्मृतीचा भाग म्हणून आयुर्वेद सृष्टिनिर्मितीपूर्वीच ज्ञात झाला असं म्हणण्यास कोणताही प्रत्यवाय येऊ नये. तरी समजून घेण्याचा मुद्दा हा की वेदवाङ्मयाचा एक भाग म्हणून आयुर्वेद नावची वैद्यक प्रणाली भारतीयांना ठाऊक होती आणि त्यांनी तिचा अंगिकार केलेला होता.

 आता प्रश्न असा पडतो की ही वैद्यक प्रणाली ब्रह्मदेवाकडून आपल्यापर्यंत कशी पोहोचली? त्यासाठी कोण कारणीभूत ठरले? या ज्ञानावतरणाची परंपरा काय आहे? या आणि अशा सर्व प्रश्नांची आणि एक ऐतिहासिक आणि वाङ्मयीन भाग म्हणून भारतीयांना ही वैद्यक प्रणाली कशा स्वरूपात दिसलेली त्याचा उहापोह आपण विस्तारभयास्तव या भागाऐवजी पुढील भागात करू.