आयुर्विद्या - १

मंगलाचरण



"ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥"

"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥"

कोणत्याही विषयाचा उहापोह करण्याची सुरुवात करत असताना आपल्याला काही शिष्टाचार पाळावे लागतात. हे शिष्टाचार काही वेळेला परंपरेने आलेले असतात किंवा त्यांचं पालन एका विशिष्ट श्रद्धेखातर होत असतं.

सुरुवातीचे
श्लोक गुरुमहती सांगणारे आहेत. आपल्या गुरूप्रति आदर व्यक्त करणं हा त्या
मागचा भाव, आणि हा झाला श्रद्धेचा भाग! कारण, असं आहे बघा, आपण काही
अभिमन्युप्रमाणे मातेच्या पोटातूनच कुठल्याही प्रकारचं ज्ञान घेऊन येत
नाही, आलेलो नाही. जे ज्ञान आपण मिळवतो त्याचा कुणी एक स्रोत असतो. मग हा
स्रोत कधी आई असते, कधी वडील असतात तर कधी अशाच कुणी एक व्यक्ती असतात.
यांनाच आपण आपले गुरू असं संबोधतो. आजच्या काळात गुरू ही संकल्पना फार
व्यापक स्वरूपात आपल्या समोर येते कारण आपल्याला मिळणार्‍या ज्ञानाचा
स्रोत हा कोणत्याही व्यक्तीशीच निगडित असा राहिलेला नाही आहे. म्हणूनच आज
ज्ञानाचे स्रोत निरनिराळी पुस्तकं झालेली आहेत, टेलिव्हिजन सारखं माध्यम
गुरुची भूमिका वठवू लागलेलं आहे आणि सध्या तर 'जागतिक महाजाल' अर्थात
'इंटरनेट' माहितीचा आणि ज्ञानाचा प्रचंड असा स्रोत बनून आपल्यासमोर उभा
आहे. या सगळ्या माध्यमांना आपण आज गुरू स्थानी बसवू शकतो. माध्यमांतील
ज्ञानस्रोताला एखादा व्यक्तिनिष्ठ चेहरा नसला तरीही आपल्याला एक गोष्ट
ध्यानात ठेवावीच लागेल, माध्यमज्ञानस्रोतातून आपल्यापर्यंत आलेलं ज्ञान हे
अनेक ज्ञा
-अज्ञात
व्यक्तींचे संघटित कार्य असते. माध्यम, मग ते पुस्तक असो वा दूरचित्रवाणी
वा माहिती महाजाल, त्यांना गुरुपद देताना हे पडद्यामागचे ज्ञानस्रोत आणि
त्यांच्या ज्ञानाला आपल्यापर्यंत पोहोचवणारे असंख्य तंत्रज्ञ नामक उपस्रोत
यांच्याप्रतिसुद्धा तितकाच आदरभाव व्यक्त होणं आवश्यक ठरतं.

आपली भारतीय संस्कृतीसुद्धा ना, एक
अजब रसायन आहे. जरा विचार करता आपल्या लक्षात येतं की ती भयंकर व्यवहारी
आहे. व्यक्तीसापेक्ष परस्पर संबंधाच्या बाबत ही बाब प्रकर्षाने दिसते. आता
असं बघा, आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, आपलं पालन-पोषण
केलं, आपल्याला जगवलं, मोठं केलं असं जरी म्हटलं तरी ते त्यांचे
आपल्यावरचे उपकार मानण्यात येतात. त्यालाच आपली संस्कृती मातृ-पितृ ऋण असं
संबोधते. आता हे ऋण फेडायचं कसं? तर जेव्हा माता-पिता वयोमानानुसार
गलितगात्र होतात तेव्हा त्यांची काळजी, त्यांचं संगोपन त्यांच्या मुलांनी
योग्य प्रकारे करून, त्यांच्या योगक्षेमाची व्यवस्था त्यांच्या
आयुष्याच्या अंतापर्यंत स्वतः करून या मातृ-पितृ ऋणातून त्यांना मुक्त
होता येतं असं आपली ही भारतीय संस्कृती सांगते. 

याबरोबरच आणखी एक ऋण आपल्यावर असल्याची ती
आपल्याला जाणीव करून देते आणि ते म्हणजे गुरू ऋण! प्राचीन भारतीय शिक्षण
पद्धतीनुसार गुरू मासिक शुल्कावर किंवा वेतनावर विद्यादान करत नसत. शिष्य
गुरुकुलात गुरूगृही राहून विद्यार्जन करत असे. या प्रकारे विद्या
मिळवलेल्या शिष्याला विद्यार्जन संपल्यावर हे गुरूऋण फेडावं लागे. या
गुरूऋण फेडण्याच्या मुद्द्याचा दोन स्तरांवर विचार करावा लागतो. गुरुकुलाचा
त्याग करताना शिष्याला गुरुदक्षिणा द्यावी लागे. गुरुदक्षिणा दिल्यावर
शिष्याला गुरुकुल सोडण्याचा जणू परवाना मिळत असे पण याद्वारे गुरूऋणातून
मुक्ती मात्र मिळत नसे. मागे म्हण्टल्याप्रमाणे व्यक्ती ही ज्ञानाचा स्रोत
असते. त्या व्यक्तीनेही कुणाकडून तरी हे ज्ञान प्राप्त केलेलं असतं आणि
स्वतः गुरुपद स्वीकारून हे ज्ञान पुढे कुणा शिष्याला दिलेलं असतं. याचाच
अर्थ एकप्रकारे ज्ञानाचा स्रोत अखंड ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य त्याने
केलेलं असतं. जसा कोणताही स्रोत, मग तो जलाचा असो, प्रकाशाचा असो वा
ऊर्जेचा, त्याच्या अखंडित राहण्यात आपल्या संस्कृतीचं आणि पर्यायाने मानव
जातीचं कल्याण असतं असं आपण म्हणू शकतो. 'गुरुपद' हे ज्ञानस्रोत अखंड
ठेवण्याचं माध्यम आहे. जोपर्यंत व्यक्ती हे गुरुपद स्वीकारून आपल्याजवळील
ज्ञान शिष्यामध्ये प्रसारित करत नाही तोपर्यंत आपल्या गुरूऋणातून त्याची
मुक्ती होत नाही. आपल्या संस्कृतीने यासाठीच गुरू हे स्थान आणि गुरूऋण ही
व्यवस्था निर्माण केली आहे. गुरूऋण फेडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून
इथे सुरुवात गुरूस्तवनाने होणं हा एक चांगला मंगलमय योगच म्हण्टला
पाहिजे!

आता
मंगलाचा विषय निघालेलाच आहे तर आणखी एका मुद्द्याचा उहापोह होणं आवश्यक
ठरेल. कार्याच्या सुरुवातीला 'मंगलाचरण' करण्याचा एक शिष्टाचार परंपरेने
आपल्या संस्कृतीमध्ये पाळला जातो. या शिष्टाचारामागे कार्यपूर्ती
होण्याबाबतची श्रद्धा असते. "विघ्नविनाशानुकुलव्यापारविशिष्टम् मङ्गलम्।" आणि "समाप्तिप्रतिबन्धकीभूतदुरितविशेषविघातकत्वम्।"
अशा दोन व्याख्या कोशांमध्ये मंगलासंदर्भात सांगितलेल्या आढळतात. म्हणजेच
सामान्यतः कार्यपूर्तिच्या मार्गामध्ये उत्पन्न होऊ शकणार्‍या
विघ्नांच्या नाशाच्या दृष्टीने अनुकूल असा विशिष्ट व्यापार आणि कार्य
समाप्तीला प्रतिबंधक होणार्‍या पापाचे विघातक असे ते मंगलाचरण मानले जाते.
 
ग्रंथांतरामध्ये मंगलाच्या थोड्या वेगळ्या व्याख्या दिसतात. "मलं गालयति इति मङ्गलम्।" अर्थात मलाला दूर करणारे ते मंगल आणि "मं पापं गालयति इति मङ्गलम्।"
अशीही एक व्याख्या दिसते. या व्याख्येनुसार मं म्हणजे पाप आणि ते नष्ट
करणारे ते मंगल होय. श्रेयमार्गसिद्धीच्या पथातील विघ्नोत्पादक पातक म्हणजे
मल, हा मल ईश्वर किंवा गुरूच्या गुणस्तवनाने गळून जातो म्हणून अशा
स्तवनाला 'मंगल' म्हणतात. साहित्यिक नियमानुसार या मंगलांमध्ये आशीर्वाद,
नमस्कार किंवा वस्तुनिर्देश असावा.
 
या
मंगलाचरणामुळे कार्यसमाप्ती होतेच अन्यथा नाही किंवा मंगलाचरण नाही केलं
तरी कार्यसमाप्ती होतंच नाही असंही कुठे दिलेलं नाही. कारण मंगलाचरण
केलेलं असूनही अपूर्ण राहिलेले ग्रंथ आहेत तसंच मंगलाचरण न करताही पूर्ण
झालेले ग्रंथ आपण पाहू शकतो. जसं बाणभट्टाने मंगलाचरण करूनही त्याच्या
स्वतःच्या हाताने त्याची कादंबरीची रचना पूर्ण होऊ शकली नाही आणि न्यायादि
विषयक ग्रंथ मंगलाचरणाशिवायही पूर्णत्वास गेलेले दिसतात. म्हणजेच
मंगलाचरण हा काही नियम नाहीपण पारंपरिक श्रद्धेचा भाग म्हणून
आयुर्वेदाच्या संहिताग्रंथांमध्येही मंगलाचरणाला स्थान मिळाल्याचे दिसून
येते.
 
ज्या
ग्रंथाच्या सुरुवातीला मंगल असते ते ग्रंथ प्रसिद्ध होतात, त्यांचे
अध्ययन करणारे विद्यार्थी आयुष्यमान होतात आणि सफल मनोरथ होतात अशी
प्राचीनांची धारणा होती. असं असल्यामुळेच आयुर्विद्या प्रदान करणार्‍या
आयुर्वेदीय संहिता ग्रंथांमध्येही मंगल आढळणे क्रमप्राप्तच ठरते.
उदाहरणादाखल 'अष्टाङ्गहृदयम्' या संहितेमधलं वाग्भटोक्त मंगलाचरण अभ्यासणे
उपयुक्त ठरेल.
 
"रागादिरोगान् सततानुषक्तानशेषकायप्रसृतानशेषान्।
औत्सुक्यमोहारतिदाञ्जघान योSपूर्ववैद्याय नमोSस्तु तस्मै॥"
 
या मंगलाचरणाचा विचार आपण पदच्छेदाने अर्थात प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून करण्याचा प्रयत्न करू.
पहिला
शब्द आहे 'रागादिरोगान्'. यामध्ये दोन शब्द दिसतात, रागादि आणि रोग. आता
रागादि रोग कोणते आहेत? तर ते समजून घेण्यासाठी 'राग' शब्द समजून घेऊ.
'शुद्धस्य चेतसो रजस्तमोभ्यां रञ्जनम् रागः।' अर्थात शुद्ध सात्त्विक मनाला
रज आणि तम या मानसिक दोषांमुळे जो रंग चढतो त्याला राग असे म्हणतात. मग
पुढे हे रागादि कोण आहेत तर हा राग ज्यांच्यामुळे प्राप्त होतो ते काम,
क्रोध इ. षड्रिपु आहेत ते आहेत रागादि! हे सारे मनाचे विकार आहेत.
त्यामुळे या मंगलाचरणात रागादि रोगांचा उल्लेख मानसिक व्याधींच्या
संदर्भात मानणे संयुक्तिक ठरेल. त्याबरोबरच रोग शब्दाने ज्वरादि शारीरिक
व्याधीचा बोध होतो. म्हणून रागादि रोगान् शब्दामध्ये शारीर आणि मानसिक
रोगांचा अंतर्भाव होतो असं मानणं संयुक्तिक ठरतं.
 
पुढल्या
तीन शब्दांचा एकत्रित विचार करणे आवश्यक ठरते. सततानुशक्तान् म्हणजे सर्व
काल संबद्ध असणारे, अशेषकायप्रसृतान् म्हणजे जसा आत्मा संपूर्ण
शरीरामध्ये अभिव्यक्त असतो तसे संपूर्ण शरीराला व्यापून असणारे आणि अशेषान्
म्हणजे सगळ्या देहामध्ये युगपत् उपस्थित होणारे होय.
 
औत्सुक्य
म्हणजे अविचार्यप्रवृत्ती. म्हणजे ज्या गोष्टीचा विचारही करणं कठीण अशी
गोष्ट करण्याची प्रवृत्ती म्हणजे औत्सुक्य. मोह म्हणजे सारासार
विचारशक्तीचा अभाव आणि अरति म्हणजे असंतोष.
 
जघान
म्हणजे मोक्षशास्त्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे नष्टोपाय सांगणारा म्हणजे
स्वहस्ते नष्ट न करता तत्संबंधी उपदेश करणारा, मार्ग दाखवणारा असा याचा
अर्थ होईल.
  
अपूर्व
वैद्य शब्दातील अपूर्व म्हणजे अद्भूत शक्तीत्व आणि वैद्य म्हणजे भिषक् -
औषधांचा जाणकारर्थात या ठिकाणी ईश्वर किंवा वैद्य अधिष्टात्री देवता -
धन्वन्तरी होय.
 
अशा प्रकारे मंगलाचरणातील शब्दांचा अर्थ समजावून घेतल्यावर सदर मंगलाचरण असं स्पष्ट होतं -
"सर्व
मनुष्यमात्रांच्या शरीराला आणि मनाला ज्यांनी सतत गांजले आहे आणि
मनुष्यांच्या मनामध्ये अविचारी प्रवृत्ती, मोह आणि असंतोष यांना उत्पन्न
केले आहे असे जे रागजन्य काम-क्रोधादि (षड्रिपु) रोग ज्याने समूळ नष्ट
करण्याचा मार्ग दाखवण्याचे कार्य केले आहे त्या अद्भूतशक्तीयुक्त आदिवैद्य
ईश्वर वा धन्वन्तरीला मी नमस्कार करतो."
 
अनेक
अर्थांनी अष्टांगहृदयातील मंगलाचरण वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. त्यामध्ये
रोगांचं शारीर - मानसिकत्व दर्शवण्यात आलेलं आहे त्याबरोबरच त्यांचा शरीर
आणि मनावर होणारा परिणामही अधोरेखित करण्यात आलेला आहे. बहुतांशी षड् रिपु
स्वरूपाचे व्याधी मनावर जास्त कार्य करतात किंबहुना ते मनाशीच संबंधित
असतात पण तरीही त्यांचा शारीरिक परिणाम इथे उल्लेखलेला आहे. याचं कारणही
स्पष्ट आहे, मनावर घडणारा परिणाम मग तो चांगला असो वा वाईट, मनाचे आधारभूत
असलेले आणि ज्याच्याशिवाय मनाचं अस्तित्वच अशक्य आहे, ते शरीर, त्यावरही
नेहमीच पडत असतो. म्हणजेच मानसिक व्याधींची शारीरिक लक्षणेही दिसू शकतात
आणि शारीर रोग मनावरही परिणाम करू शकतात. रागादि तसेच ज्वरादि रोगांच्या
शारीर आणि मानसिक परिणामांना दूर ठेवण्याच्या उपायांचा ज्या अपूर्व
वैद्याने सर्वप्रथम अंगिकार केला त्याला मी नमस्कार करतो असंच
वाग्भटाचार्य या मंगलाचरणात म्हणत आहेत हे निश्चित.
 
अशाप्रकारे
श्रद्धापूर्वक केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण शिष्टसंमत मंगलाचरणानंतर आपण
आयुर्वेद शास्त्रातील विविध संकल्पनांचा अधिक विस्तृतपणे पुढच्या
भागापासून विचार करू.