चेहऱ्याला कालच्या मी

भूतकाळाला दिली मी मूठमाती गाडले
चेहऱ्याला कालच्या मी आज आहे झाकले

सुरकुत्यांचे राज्य आले आरसा सांगे मला
काळ सरला वेळ आली मी मनी हे जाणले

काल सजला ज्या फुलांनी आज ती कोमेजली
प्रिय देवा फूल ताजे कालच्यांना टाकले

का अशी इतकी उपेक्षा? टाळतो मृत्यू मला
मीच अस्तित्वास माझ्या डांबराने फासले

सोडले सागरतिरी जे पावलांचे मी ठसे
क्रूर काळाने मिटवले काय देऊ दाखले?

पाळले चुचकारले मी खूप माया लावली
तेच गोंडा घोळणारे आज मजला चावले

तेच घरटे, वृक्षही तो, तेच अंगण आजही
पण पिलावळ आज नाही एकलेपण काचले

पाय लडखडणे पिऊनी रोजचे ते आठवे
वाट धरती पंढरीची तीच आता पावले

पूस तू "निशिकांत" डोळे वेदना आता सख्या
कैकदा काट्यात वेड्या फूल फुलते चांगले

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा