तिलाच स्मरुनी रोज निजावे असे वाटते
तिचे लाघवी स्वप्न पडावे असे वाटते
दुनिये मधले विष घेवुनी दुनिया बनलो,
लहानपण मी पुन्हा जगावे असे वाटते
सुख दुःखांचा खेळ नेहमी सुरुच असतो
एकदातरी दुःख हरावे असे वाटते
विरंगुळा मी माझा असतो केंव्हा केंव्हा....
सोबत आता तिने बसावे असे वाटते
तिच्या कोवळ्या गालांवरती अश्रू दिसता,
दाही दिशांने उदास व्हावे असे वाटते