कुणासवे मी किती जुडावे कळावयाला उशीर झाला
लपून काटा उरात होता रुतावयाला उशीर झाला
उधार होती खुशी मिळाली, तिचाच आधार घेतला मी
निवांत होतो, फुगा भ्रमाचा फुटावयाला उशीर झाला
सभोवती चेहरे नशीले, सजून येता सुखावलो मी
कुरूपता जी दडून होती दिसावयाला उशीर झाला
तणाव होता, अनेक घटना घडू नये त्या कशास घडल्या ?
प्रयत्न केले हजार, आठव पुसावयाला उशीर झाला
गहाळ झाले नशीब माझे, मरावयाच्या अधीच मेलो
चुकून केंव्हा हसून थोडे जगावयाला उशीर झाला
क्षणात उंचीस गाठताना, कुणास कोणी दिलाय टेकू
शिड्या कुणाच्या मला न रुचल्या चढावयाला उशीर झाला
कशास आता उगाच गेली? झुकून कबरीसमोर माझ्या
नशीब खोटे, हवेहवेसे घडावयाला उशीर झाला
वयस्क हाती कशास प्याला? नशेत "निशिकांत" झिंगण्याला
पिऊन थोडी, खुशालचेंडू बनावयाला उशीर झाला
निशिकांत देशपांडे. मों नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा