हात तू हाती दिला जो

मी तुला जे स्वप्न दिधले ते कधी विरणार नाही
हात तू हाती दिला जो तो कधी सुटणार नाही

काळजी कसली उद्याची? वर्तमानी धुंद असतो
आजचा जो आज आहे, तो उद्या असणार नाही

का उगा आभूषणे अन हौस सजण्याची असावी?
फूल नकली कागदी, फुलपाखारू बसणार नाही

औट घटकेचे ग्रहणही सूर्य चंद्रा पीडिते पण
मी सदा खग्रास ग्रहणी नांदतो, कण्हणार नाही

काच पुसतो स्वच्छ करतो रोज तो कंदील मी पण
मंद ज्योतीने तयाच्या तम कधी सरणार नाही

पाहिले मृत्त्यूपथावर टोल नाके डॉक्टरांचे
काय लुटण्याची तऱ्हा ही ! मी पुन्हा मरणार नाही

का हिऱ्याची कीड आहे लागलेली कोळशांना?
दंश हा मोठेपणाचा या क्षणी दुखणार नाही

झिंगणे, पीणे, बहकणे नवपिढीला दोष कैसा?
लाड इतके लेकरांचे, कानही पिळणार नाही

ना कळे "निशिकांत" गाणे, फक्त श्रवणाने कधी
आवडे ठेका परंतू सम कधी कळणार नाही


निशिकांत देशपांडे  मों. नं.  ९८९०७ ९९०२३

E Mail :--  nishides1944@yahoo.com