अभ्यास हा एक खेळ

  हा विषय थोडासा वेगळाच वाटणारा आहे. कारण जगात जे काही चाललंय जग काय म्हणत आहे. त्यापेक्षा हा विचार थोडा वेगळाच आहे. ज्याला आपण म्हणाल की हटके विचार आहे. 

  मी लहान असताना मला सगळेजण सांगायचे खूप अभ्यास कर मोठा हो नाव कमाव . पण मला खूप अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं हे कधी कळलंच नाही. क्रमिक पुस्तके वाचायची प्रश्नांची उत्तरे पाठ करायची ‌‌. शाळेत दिलेला (शिक्षकांनी, बाईंनी सांगितलेले काम लेखनाचे वाचनाचे)अभ्यास पूर्णं करायचा. परीक्षा आली की परीक्षा द्यायची निकालाची वाट बघायची आणि निकाल लागल्यावर मिळालेल्या मार्कांवर सगळेजण आपल्याला हुशार ठरवतात याचा अभिमान वाटायचा. याच विचारात राहून शिक्षण पूर्णं केले. नोकरी पण मिळवली . (सहजासहजी नाही. ) नोकरीला तीन वर्ष पूर्ण झाल्यावर सगळेच ज्या गोष्टी करतात तसं मी ही विवाह बंधनात बांधला गेलो . माझ्या संसार रुपी रोपटं आता बहरायला लागलं , मला दोन मुलं झाली. अतिशय गोंडस या मुलांकडे पाहिलं की आयुष्य सार्थक झालं अस वाटावं असा माझा संसार चाललेला आहे. पत्नी सुंदर , सालस , मनमिळाऊ व घरातील लहान थोरांची काळजी घेणारी असल्याने मुलांची काळजी ती अतिशय चांगल्या प्रकारे घेते. आता मुलं शाळेत जाण्याच्या वयाची झाल्याने मी त्यांना शाळेत दाखल केलंय. मुलं शाळेत जातायत ती आनंदाने पण पहिल्याच आठवड्यात मला माझ्या मुलाने प्रश्न विचारला पप्पा अभ्यास म्हणजे काय ? आता बघा मलाच आता पर्यंत त्याचा अर्थ कळला नव्हता मग मी काय त्याला अर्थ सांगणार ! मी माझ्या सभोवतालच्या माणसांनी आई बाबांनी, नाना काकूंनी माझ्या शिक्षकांनी मला जे काही अभ्यास म्हणून सांगितलं होतं तेच मी त्याला सांगितलं. मुलाचं समाधान झालं का नाही हे नक्की सांगता येणार नाही पण माझं मन त्या उत्तराने फार अस्वस्थ झालं. अरे आपणही शाळा शिकलो मग अभ्यास म्हणजे काय हा प्रश्न मला कधीच का पडला नाही. मी जो केला ज्यातून मला भरपूर गुण मिळाले तोच का अभ्यास मग त्याचा उपयोग मला माझे काम करताना किंवा जीवन जगताना का होईना. अभ्यासाने माणूस जर ज्ञानी होतो तर मी ज्ञानी नाही का मला तर सगळे हुशार म्हणायचे , मला चांगले गुण मिळायचे. पण मला तर पाठीमागचं थोडंफारच आठवतंय . मन या विचारात व्यस्त झालं की अभ्यास म्हणजे काय नक्की काय मुलं शाळेत दाखल झाल्यापासून अभ्यास सुरू होतो हे खरं ... मी या संदर्भात असलेली पुस्तके विविध लेख वाचायला सुरुवात केली. पण हाती काय लागेचना.

        असाच एके रविवारी दुपारी जेवणानंतर दूरचित्रवाणी वर रवींद्र महाजनी व रंजनाचा जुना झुंज नावाचा मराठी चित्रपट चालू होता गाणी परिचयाची असल्याने मी चित्रपट पाहू लागलो. रंजना एक मागासवर्गीय शिक्षिकेच्या भूमिकेत होती. शाळेतला प्रसंग गरीब मुलांना नीटनेटकेपणा सांगून तिने शिकवायला सुरुवात केली ती एका गाण्यातून " इवली इवली पाखरे आली अंगणी , अभ्यासाच्या खेळामध्ये जाती रंगुनी" मला माझ्या प्रश्नाच उत्तर मिळाल की अभ्यास म्हणजे खेळ.......

               पण खेळ कसा या विचारात पडलो खेळाचा आणि अभ्यासाचा संबंध काय ? भरपूर खेळांची नावे लिहून काढली आणि शोधू लागलो की काय संबंध असावा याचा एक गोष्ट कळली की अवयवांचा योग्य वापर , मनाची एकाग्रता,डोळ्यांनी योग्य निशाणा, कानांनी अचूक ध्वनीचा वेध घ्यावा लागतो . मग याच तर सर्व गोष्टी अभ्यासासाठी आवश्यक असतात. मग अभ्यास हा सुद्धा एक खेळ आहे . ही संकल्पना मला सुचली ती माझ्या नजरेतून मी मांडत आहे.

        जरा विचार करा माझ्या उदाहरणातून मी दाखवून देतोय की एखाद्या प्रश्नाच्या उत्तरा पर्यंत म्हणजेच मुळाशी जाणे व त्याची पूर्णं माहिती घेणे याला अभ्यास म्हणायचं किंवा यातून नवीनच काही तरी शोधायचं  म्हणजे अभ्यास होय. प्रश्न असा निर्माण होतो की पहिलीत शिकणाऱ्या मुलाला कुठं एखाद्या उत्तरासाठी असं खोलात शिरावं लागतं किंबहुना १० वी च्या विद्यार्थ्याला सुद्धा असं काही करावं लागत नाही. आणि जर एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जाणे म्हणजे अभ्यास आहे असं मानलं तर शाळकरी मुलं करतात तरी काय व त्यांचे पालक त्यांच्या कडून अभ्यास म्हणून नेमकं काय करून घेतात कोणास ठाऊक.

      क्रमिक पाठ्यपुस्तकाच वाचन म्हणजे अभ्यास असा अर्थ लावून समाज वावरतो आहे. पाठ्यक्रम जर बघितला तर त्यात त्या मुलाने मुळापर्यंत जावं अस त्यात काहीच नाही . मुलांच्या क्षमतांचा विचार करता योग्य वाटतो . यातून आणखी नवीन कल्पनेचा उदय आपण जे घेत आहोत ते शिक्षण म्हणायचे की प्रशिक्षण ? शिक्षणाने माणूस सुशिक्षित व सुसंस्कारित होतो. तर प्रशिक्षणाने तो कौशल्य प्राप्त करून घेतो. मला अस वाटतं मी अगोदरच सांगितलंय की माझा विचार थोडा हटके आहे . की, आपण पहिली पासून जे घेतोय ते शिक्षण नाही तर ते प्रशिक्षण आहे . या प्रशिक्षणात आपल्याला आपले डोळे, कान , जीभ , त्वचा , नाक या ज्ञानेंद्रियाचा योग्य वापर करायचे कौशल्य प्राप्त करायचे आहे असते. कौशल्य प्राप्ती साठी सराव महत्त्वाचं असतो . सरावानेच माणूस परीपूर्ण होतो. हा सराव आपणाला परिपूर्ण होण्यास मदत करतो. क्रमिक पुस्तके हि सुद्धा सरावा साठीच आहेत. जसं खेळात यश संपादन करणे अंती म ध्येय तसेच या प्रशिक्षणात कौशल्य प्राप्ती हे अंतिम ध्येय . 

  मुलांना खेळायला खूप आवडते या नुसार जर शिक्षकांनी व पालकांनी त्यांच्या मानगुटी वर अभ्यास नावाचे भूत न बसवतां या शिक्षण रुपी प्रशिक्षणातून सरावाच्या माध्यमातून विविध खेळाच्या स्वरूपात जर ही कौशल्य विकसित केली तर खऱ्या अर्थाने १० वी नंतर खरा मुळापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे असा अभ्यास करण्यासाठी मुलं पात्र होतील.

      एकच उदा. पहिलीत अक्षरांची ओळख , त्यांचं वाचन, व डोळ्यांचा योग्य वापर करून प्रमाण बद्ध लेखन ‍ जर प्रमाणबद्ध लेखन करता आलं तर अक्षर सुवाच्य वळणदार येईल. अभियंता होण्यासाठी नजरेतूनच प्रमाण बद्धता ठरवता येणं हे कौशल्य इथंच मिळतंय. आणी हे खेळ म्हणून सहज करून घेता येण्यासारखं आहे . मनाची एकाग्रता , नजरेचा वेध, हि कौशल्य आहेत . ही सरावानेच मिळतात किंवा आत्मसात होतात.

म्हणून मला असं वाटतं की अभ्यास हा सुद्धा एक खेळ आहे त्याच भूत बनविण्यात काही अर्थ नाही मुलांना खेळ आवडतात अभ्यास नाही हेच जर खेळ व सराव म्हणून केले तर आनंदाने स्वीकारतात अनुभव आहे एक पालक म्हणून व एक शिक्षक म्हणून देखील. कदाचित स्वर्गीय गीतकार व कवी लेखक जगदीश खेबूडकरांना आपल्या या गीतातून त्या वेळी जगाला हाच संदेश द्यायचा असेल.