असाही एक अनुभव !

मी एका शाळेत शिक्षक आहे.आमची शाळा तशी ख्यातनाम आहे.मी या ख्यातनाम शाळेत अध्यापनाचे काम करतो अगदी मनोभावे ,मी इंग्लिश हा विषय शिकवितो.माझी १०० % निकालाची परंपरा आहे. मुलांनी फक्त गुणांना महत्त्व न देता कौशल्य आत्मसात करावी व गुण व गुणवत्ता वाढवावी या कडे माझा कल जरा जास्तच आहे. संगणका बाबत साक्षरता या माझ्यातील गुणांमुळे शाळेने मला संगणकाबाबतचे प्रशिक्षण इतर शिक्षकांना देण्याचे काम सोपवले मात्र माझ्यावर हा कामाचा अतिरिक्त बोजा होता .ज्ञान दानाचे काम करायचे असल्याने मी सुद्धा हसत मुखाने ते काम स्वीकारले .संगणकाच्या जोडणी पासून त्यातील प्रणाली वापरण्याबाबत सर्व अध्यापकांना शिकवले.

मात्र त्यातील एकजण माझा सह अध्यापक का कुणास ठावूक लोकांना चुकीचे मार्गदर्शन करू लागला.खरं पाहता तो एक ज्येष्ठ शिक्षक होता.संगणका बाबत थोडेफार ज्ञान त्यांनाही होते.मी या शाळेत येण्यापूर्वी त्यांच्याकडेच हा विभाग होता असेही मी ऐकून होतो.अशा माणसाने शाळेतील एका जोडीदारास की ज्याला वरदहस्त आहे .अशाच्या मदतीने म्हणजे त्याला चुकीचे मार्गदर्शन करून मला त्रास देणे सुरू केले.ऐकणाऱ्याला संगणकाचे बाबतीत पुरेसे काहीच कळत नव्हते त्यानेच माझ्यावर प्रत्यक्ष कुरघोड्या करायला सुरुवात केली. माझ्यावर पासवर्ड बदललेला आहे.आम्हाला संगणक चालवता येईना .कामासाठी याच्या मागे पळावे लागते .असे आरोप करण्यात आले.महिला अध्यापिकांसाठी सेपरेट संगणक जोडून द्यावा म्हणून मागणी केली .मात्र संगणक मीच जोडून द्यावा असा आग्रह धरला खरं पाहता मी संगणकाची जोडणी सर्वांनाच शिकवलेली होती. मी मात्र याला इन्कार केला.त्यावर त्यातील एका अध्यापिकेने मला तीव्र विरोध केला.कारण तिलाही राजकीय वरद हस्त होताच.

संध्याकाळी घरी गेलो चहा घेऊन बसलोच होतो तोवर त्या बाईच्या नवऱ्याचा मला फोन आला.मला धमकी वजा बोलणे केले व तुम्हाला पुढाऱ्यांच्यापुढे उभे करतो असे म्हणून फोन ठेवला.मी दुसऱ्या दिवशी सदर बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली व मी जे काम पाहतोय ते ज्येष्ठ शिक्षकाला द्या अशी विनंती केली मात्र त्यांनी देखिल माझी बाजू न घेता त्यांचीच बाजू सावरली .मी माझ्यावर केलेल्या आरोपाचे खंडन व्हावे असा आग्रह धरला.कारण असे केल्याने या कार्यक्रमाचा सूत्रधार पुढे येणार होता .आरोप करणाऱ्याला त्याचे खंडन करताच येणार नव्हते.पण सारे व्यर्थ,आता मात्र मला खूप राग आला होता.काय करावे हे समजेना काही शिक्षकांनी मला "जाऊद्या सर,नका वाढवत बसू वाढवल्याने खूप वाढत " असा सल्ला दिला .मी पण सोडून दिलं. दोन दिवस गेले ,तिसऱ्या दिवशी त्या इसमाने स्वतः: संगणक जोडून दिला. मला हि लक्षात आलं की आग लावणाऱ्यानेच आग विझवलेली आहे .मला हेच कळतं नाही की माणसं अशी वागतातच का ?

कदाचित आपल्याही बाबतीत तुमच्या ऑफिसात असंच काही घडत असेल.