तुझ्या सावलीला किती शोधतो मी
?
जगा वेगळे मागणे मागतो मी
कशाला भरावे नवे रंग आता?
तुझी भावमुद्रा मनी कोरतो मी
निखारे तुझ्या वेदनांचे उशाला
तरी स्वप्न बघण्या जरा झोपतो मी
वृथा आठवांची नको जळमटे ही
स्वतःलाच हळुवार कुरवाळतो मी
नको चांदणे अन नको तारकाही
पसा एक अंधार कवटाळतो मी
नको येत जाऊस वस्तीत माझ्या
तुझ्या भेटण्याने घायाळतो मी
फुलावे सदा हास्य ओठी म्हणूनी
उसासे, तुझ्या वेदना चोरतो मी
पुरे जीवना भास आनंदण्याचे
अपेक्षा मनातील चुरगाळतो मी
तुझे ध्यान "निशिकांत" कोठे हरवले?
लिहाया ग़ज़ल अक्षरे शोधतो मी
निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com