तुझा हात सोडून जावे कुठे?

नका आठवांनो छळू एवढे मज, तुम्हापासुनी मी लपावे कुठे?
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

अता वृद्ध माता पित्यांचा मुलांना नको भार, त्यांनी जगावे कसे?
मुळांनीच आधार वृक्षास दिधला, अता उन्मळूनी पडावे कुठे?

करायास, पंचायती, न्याय बसल्या, सुळी प्रेम गेले सजा ही कशी?
कसे मख्ख बसले बघा रामशास्त्री, अता प्रेमिकांनी दडावे क्य्ठे?

तिचा जन्म आम्हा नकोसाच असतो, गळे घोटतो रोज गर्भाषयी
अशा स्त्रीभ्रुणांनी मुक्या वेदनांना, कधी व्यक्त करण्या रडावे कुठे?

नको दु:ख आम्हा, नको त्यागही पण, सुखांची गुलामी बरी जीवनी
अशा संस्कृतीतून अन्ना हजरे, पुन्हा या जगी सापडावे कसे?

नसे चक्रधारी कुठे कृष्ण आता, करी बासरी फक्त असते सदा
नव्या कौरवांना जरा धाक नाही, अता द्रौपदीने बघावे कुठे?

गळा माळ कवड्यामध्ये ओवलेली, भिकारीच ते मागती जोगवा
पुढे प्रश्न "निशिकांत" अंबेस पुजण्या, खरे भक्त आता मिळावे कुठे?

निशिकांत देशपांडे   मों. न.    ९८९०७ ९९०२३

E Mail---- nishides1944@yahoo.com