नाळ मी तोडून आले

आपुल्यांशी नाळ मी तोडून आले
मी मला, माझ्या प्रिया, विसरून आले

लपवले तुजला धुक्याने, शोध घेंण्या
सूर्य किरणे संगती घेऊन आले

सावली लाभो तुझी चिरकाळ म्हणुनी
सावलीसम मी तुझ्या मागून आले

गारवा, ताजेपणा देण्यास,स्वप्नी
दव पहाटे थंड मी प्राशून आले

चल करू आता नव्याने श्रीगणेशा
आठवांची जळमटॅ झाडून आले

बालपण सुखवी मनाला, काल स्वप्नी
कागदाची नाव मी सोडून आले

रंगले रंगी तुझ्या, ना वेगळी मी
कृष्णमय राधा तुझी होवून आले

पांडवांनी मातृआज्ञा पाळली अन
पाच नवरे प्राक्तनी वाढून आले

काय हा ढोंगीपणा "निशिकांत" जगती
सांत्वनाला गारदी हटकून आले

निशिकांत देशपांडे मों. क्र.--  ९८९०७ ९९०२३

E Mail:--  nishides1944@yahoo.com