गाठ माझ्याशी तुझी रे

गाठ माझ्याशी तुझी रे, जीवना विसरू नको
गांजलेला मज बघूनी, व्यर्थ तू बहरू नको

वेदना लाखो उसासे, तू दिले मज प्राक्तना
मार्ग काटेरी असू दे, पाकळ्या पसरू नको

धडकण्या काळीज आहे, धडधडाया ते नसे
पाहुनी इरसाल लहजा, जीवना बिथरू नको

घातले आयुष्य सारे बैसुनी तीरावरी
साहसांच्या सागरी तू भेकडा उतरू नको

ये जरा शोधू नव्याने, ध्येय शिखरे दूरची
अपयशाच्या जीर्ण कबरी, आज तू उकरू नको

तू विनाशक या जगाचा, जाणतो शिवशंकरा
कर हवे ते, भय पसरण्या वाजवू डमरू नको

घे भरारी, जाण इतके, स्वप्न बघताना तरी
अंथरुण पाहून मर्दा, पाय तू पसरू नको

पोत गजलांचा बदलण्या, भ्रष्ट नक्कल का अशी?
सोडुनी परिघास अपुल्या, शायरा विहरू नको

भोगणे "निशिकांत" अब्दा, पाचवीला पूजले
घोर नैराश्यात वेड्या, तू असा बिखरू नको

निशिकांत देशपांडे.   मो.न.  ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com