ऊंच मंदिराचे मी पाहिले शिखर होते
या इथे कधी काळी देखणे शहर होते
गारवा पहाटेचा, कोवळे शहारेही
माळल्या फुलांचे मी चुंबिले अधर होते
माफ खून बाराही, वाग तू कशीही, पण
मी जरा कुठे चुकता, आजची खबर होते
सोडलास जेंव्हा तू, हात त्या क्षणी कळले
का घटे, पळे आणी थांबले प्रहर होते
पाडली किती गावे? अन उजाडल्या वस्त्या
हुंदके, उसास्यांवर, बांधले नहर होते
आज नेत्र ओले का? प्रेत पाहता माझे
काचता तुझे संशय, प्राशिले जहर होते
हाक द्या भुकेल्यांना, पेटवा मशालीही
शांत, भ्रांत लोकांची, का कधी कदर होते?
भक्त का कमी देवा? वाढलेत सौदागर!
फेडण्या तुझ्या नवसा, कावळे हजर होते
मोह, त्याग टाळावा, सांगती रहा साधे
त्या गुरूस सोनेरी. बैसण्या मखर होते.