आयरीन आणि आम्ही !

मराठीत जे आपण सरळ सरळ "आगीतून फुफाट्यात" म्हणून मोकळे होतो त्यासाठी एक मजेशीर सस्कृत श्लोक आहे .

खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणैः संतापितो मस्तके
वाञ्छंदेशमनातपं विधिवशाद् तालस्य मूलं गतः।
तत्राप्येकफलेन मूर्ध्नि पतता भग्नं सशब्दं शिरः
प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रापि यांत्यापदः॥

एका टकल्याचे उन्हातून चालताना डोके गरम झाले आणि त्यामुळे वैतागून बिचारा जरा थंडावा मिळावा म्हणून समोर दिसलेल्या झाडाखाली  सावलीत जावे म्हणून जे झाड निवडतो ते बरोबर नारळाचे झाड निघते आणि तो त्या झाडाखाली जायला आणि वरून एक नारळ सुटून त्याच्याच डोक्यावर पडायला एकच गाठ पडते आणि मग काय झाले असावे याची कल्पना येतेच.  थोडक्यात दुर्दैवी माणूस कोठेही गेला तरी आपत्ती त्याची पाठ सोडत नाही हेच खरे. याचाच अनुभव आम्हाला यायचा होता म्हणायचा. कारण पुण्यात पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे अमेरिकेत मुलाकडे एडिसनला आल्यावर छान हवा असल्यामुळे बरे वाटले पण दोनच दिवसात आयरीन नावाचे चक्री वादळ (हरिकेन आयरीन) येणार आणि ते काय भयानक प्रलय घडवून आणणार याच्या बातम्या यायला लागल्या आणि पुण्यातच बरे होते अस वाटायला लागल.बर अमेरिकेतील माहितीचे स्रोत म्ह. दूरदर्शनवाहिन्या इतक्या तत्पर की  निरनिराळे नकाशे वगैरे दाखवून आयरीन काय धुमाकूळ घालणार याच्या सांगोपांग चर्चा दाखवायला केव्हांच सुरवात झाली होती.. पूर्वी केव्हां व काय झाले होते आता नागरिकानी काय काळजी घ्यायला पाहिजे व शासन काय काळजी घेत आहे याचे पुन्हा पुन्हा दळण दळले जात होते. हो नाहीतर एकादा वादळानंतर कोर्टात दावा ठोकून शासनाने मला या वादळाची पूर्वकल्पना दिली नाही म्हणून कोट्यावधी डॉलर्सची नुकसान भरपाई मागायचा.

अर्थात केवळ तेवढ्याच कारणाने नव्हे तर खरोखरच शासनास लोकांची काळजी आहे म्हणून हे सगळे चालले आहे असे जाणवत होते कारण ज्या भागातील लोकांना स्थलांतर करावे लागणार होते त्याना अगोदरपासूनच त्यानी कोणत्या ठिकाणी संपर्क साधायचा याची माहिती देण्यात येत होतीं. नाहीतर आपल्याकडे पावसाने रस्ते वाहून पाणी घरात (की घरे पाण्यात? ) शिरू लागल्यावर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा (आणि तोसुद्धा पुणे हवामानखात्याकडून मुंबई अथवा पुणेवासी जनतेच्या जनहितार्थ जारी)दिला की काम भागले (खरे तर नागरिक बाहेर पडूच शकत नाहीत त्यामुळे या इशाऱ्याची आवश्यकता तरी काय? ) असा प्रकार नव्हता.

एडिसनमध्ये आम्ही जातो तेव्हां आमच्यासारखेच आपल्या मुलांकडे अथवा मुलींकडे आलेले ज्येष्ठ नागरिक दिसतात व आपोआपच त्यांची मैत्री जमते. अमेरिकेत न्यू जर्सी त्यातल्या त्यात एडिसन म्हणजे मिनि इंडियाच आहे म्हटले तरी चालेल. म्हणजे रस्त्यावर अमेरिकन दिसला तर हा कोण परका आलाय बुवा इथे असे सगळे टवकारून पहायला लागतात. आता तर या भागातली घरे विकून अमेरिकन जायला लागलेत आणि त्यांची घरे घेणारे सगळे भारतीयच आहेत.अमेरिकेत जेवढे भारतीय आहेत त्यात निम्म्याहून अधिक गुजराती आहेत आणि त्यात निम्म्याहून अधिक पटेल आहेत.युगांडामधून इदी अमिनने  परदेशी लोकांना पळवून लावले त्यात अंगावरच्या वस्त्रानिशी अमेरिका गाठलेले असे एक पटेल आमच्या गटाला म्होरके म्हणून लाभले होते.अर्थातच अमेरिकनापेक्षाही ते इथल्या परिस्थितीचे अधिक जाणकार होते. त्यामुळे आधल्या दिवशी संध्याकाळी आम्ही एकत्र जमलो असताना या चक्री वादळास तोंड देण्यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी त्यानी बरेच काही आम्हाला सांगितले

हरिकेन हा प्रकार अमेरिकेतल्या लोकांना फारसा नवीन नाही. फ्लोरिडात तर अगदी नियमितपणे अशी चक्री वादळे येतात. फ्लोरिडासारख्या समुद्रकिनाऱ्याच्या भागात त्याची  तीव्रता जास्त असते. तेथे तर चक्री वादळ येऊन गेल्यानंतर तेथे वस्ती होती का नव्हती असेच वाटते अशी सगळी माहिती पटेल  सांगत होते. ते चाळीसपेक्षाही अधिक वर्षापूर्वी  अमेरिकेत आलेल्या भारतीयांपैकी एक होते त्यामुळे आमच्यासारख्या आपल्या सुनांना चार दिवस सासूचे(हे मालिकेसारखे न संपणारे नसतात) काय असतात हे दाखवण्यासाठी येणाऱ्या लोकांना अनुभवामृताचे घुटके पाजणे हे आपले कर्तव्य आहे अशी त्यांची समजूत होती

यावेळी जे हरिकेन येऊ घातले होते त्याचे नाव आयरीन असे होते.'मागे केव्हां तरी आलेल्या हरिकेनला कत्रिना असे नाव होते त्यावरून नटनट्यांची नावे त्यांच्या वादळी व्यक्तिमत्वामुळे हरिकेनला नावे देत असावेत असा मी अंदाज केला. पण मग. एका हरिकेनचे नाव हिलरी असे  (आणि एकाचे बिल सुद्धा)  असल्याचे लक्षात आले व आपला तर्क चुकीचा आहे हे ध्यानात आले.

त्यासाठी आंतरजालावर शोध घेता दिसून आले की अगदी सुरवातीच्या काळात अमेरिकेतील हवामानखाते या वादळांना त्यांच्या उत्पत्तिस्थानाच्या अक्षांश रेखांशावरून नावे देत.पण ती किचकट व त्यामुळे समजण्यास अवघड व कधीकधी स्थानबदलामुळे चुकीचीही वाटत त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी हवामानतज्ञानी स्त्रियांची नावे वापरण्यास सुरवात केली. आणी ती मात्र समजण्यास व लक्षात राहण्यास (तर फारच) सोपी वाटू लागली त्यामुळे १९५३ पासून अटलांटिक महासागरावर निर्माण होणाऱ्या चक्री वादळांना नावे देण्यास तीच पद्धत वापरण्यात आली आणि या नावांमुळे (सहाजिकच आहे)जनतेचीही या वादळाविषयीची जागृती वाढली.१९७८ पासून पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरावरील वादळांना नावे देताना मात्र पुरुषांच्यावर अन्याय होत आहे याची जाणीव होऊन पुरुषांचीही नावे देण्यास सुरवात झाली.सम वर्षात म्हणजे (उदाः१९७८) विषम क्रमांकाच्या वादळास पुरुषाचे तर सम क्रमांकाच्या वादळास स्त्रीचे नाव (तर विषम वर्षात याच्या उलटे) देण्याचा प्रघात सुरू झाला.

दर वर्षी नावे देताना इंग्रजी मुळाक्षरांच्या पहिल्या अक्षरापासून सुरवात  करतात व प्रत्येक मुळाक्षरापासून सुरू होणारे एक नाव वापरले जाते तरी दर वर्षी जवळजवळ सगळी मुळाक्षरे वापरावी लागतात इतकी वादळे येतात.तरी त्यात अटलांटिक सागरावरील व पॅसिफिक सागरावरील यादी वेगळी केलेली असते. अटलांटिकवरील चक्री वादळांना नावे देण्यासाठी फक्त  Q, U,X,Y  Z ही पाच अक्षरे तर पॅसिफिकवरील चक्री वादळांसाठी फक्त  Q, U, ही फक्त दोनच अक्षरे वापरली गेली नाहीत.म्हणजे प्रत्येक वर्षी अटलांटिकवरून २१ तर पॅसिफिकवरून २४ चक्रिवादळे येतात. या सगळ्यांना वेगवेगळी नावे देण्यासाठी लागणारी आपल्या लोकांना लाभलेली  कल्पकता या अमेरिकनांना नसल्यामुळे   काही नावे पुन्हा पुन्हा वापरली जातात तरीही काही नावांना  निवृत्तही करण्यात आले आहे कारण ती चक्री वादळे अगदी लक्षणीय रीत्या धोकेबाज व हानिकारक होती.२००५ मध्ये आलेले कत्रिना हे त्यापैकी एक. त्यावेळीही आम्ही अमेरिकेत होतो.पण ते पॅसिफिकवर आलेले असल्यामुळे त्याच्याशी आमचा संबंध नव्हता मात्र त्याच वेळी आयरीन याच नावाचे चक्रिवादळही अटलांटिकवर आले होते आणि ते आमच्या भागाशी संबंधित होते. पण तेही आम्हाला फक्त चाटून गेले.होती. आपल्याकडे अशी वादळे आलीच असती तरी त्या सर्व वादळांना पुरून उरतील इतकी नावे शोधण्याची स्पर्धाही आयोजित करता आली असती व त्या नादात तेवढीच माणसेही वाहून गेली असती तरीही नवीन नाव शोधून जितं मया म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानली असती.

या वेळेस आम्हाला वादळाचे महत्त्व एवढ्याचसाठी की कधी नव्हे ते आमच्याही भागात कोसळणार होते.न्यू जर्सीच्या चक्री वादळांच्या इतिहासात १८६६ पासून आजवर आलेल्या चक्री वादळात जीवितहानी फक्त १६ वेळा झाली आहे न्यू जर्सी च्या स्थान वैशिष्ट्यामुळे हवामानतज्ञांच्या मते वादळाचा हल्ला होण्याची शक्यता फक्त ०.५% इतकी कमी असल्यामुळे फारच थोडी चक्री वादळे या राज्यावर प्रत्यक्ष चाल करून आलीत.  या वेळी मात्र न्यू जर्सीला बराच मोठा चक्री वादळाचा झटका बसणार असल्याच्या हवामानखात्याच्या अंदाजामुळे आम्हा एडिसनकरांची पण झोप उडवली होती.खरे तर तसे व्हायला नको होते कारण अलीकडे अमेरिकेतील हवामानखातेही भारतीय हवामानखात्याकडून धडे गिरवीत असल्याची शंका आम्हाला येऊ लागली होती कारण हमखास पाऊस हा अंदाज त्यानी आम्ही आल्यापासून दोन वेळा चुकवला होता. तरीही चक्री वादळाबाबत कोणताही धोका घेणे योग्य नव्हते.

१९०३ पासून मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे हे पहिलेच चक्री वादळ होते. आणी त्यामुळे अटलांटिक सिटीमधील कॅसिनो सुरू झाल्यापासून बंद करण्यास भाग पाडण्याची ही तिसरीच खेप होती. बऱ्याच किनारी भागातील लोकांना हलवण्यात आले होते. आपल्याकडे नेमेची येतो पावसाळा या उक्तीस अनुसरून रस्त्यावर व घरातही पाणी शिरण्याचे प्रकार दर पावसाळ्यात घडत असल्याने अगदी गळ्याशी आल्यावरच माणसांना हलवण्याचा प्रकार घडतो. आम्ही पुण्यात रहात असलेल्या सिंहगड रस्त्यावरही काही भागात लोकांना हलवावे लागल्याच्या बातम्या आम्ही वाचत होतो पण आता तिकडे नसूनही आपल्यावर ती पाळी येणार की काय अशी भीती आता वाटू लागली. वादळ २८ ऑगस्टला रौद्र स्वरूप धारण करेल असे भाकित करण्यात आले होते आणि तो रविवार होता‌ त्यामुळे शनिवार रविवार  आणीबाणीच जाहीर करण्यात आली होती.त्यामुळे सावधगिरी म्हणून न्यू जर्सी ट्रॅंझिटच्या  ट्रेन्स, बसेस शनिवार रविवार दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या.सुदैवाने शनिवार रविवारच असल्याने कुणाला बाहेर पडण्याचे कारण नव्हते. येऊन जाऊन सुट्टीसाठी बाहेर पडणारांची पंचाईत होणार होती.

हरिकेन २८ तारखेस रौद्र रूप धारण करणार होते म्हणजे तेव्हां काहीही घडू शकणार होते, म्हणजे माझ्यासारख्या कल्पना करण्यात पटाईत असणाऱ्याला आमचे घर उडून जाण्यापर्यंत कल्पना ताणणे सहज शक्य होते.आणि आदल्या दिवशी पटेल यांनी जे सविस्तर वर्णन केले होते त्यावरून तसे घडणे अगदी अशक्य नव्हते. त्यांनी वीज व पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता असल्याने अन्न पाणी इतकेच काय पण मेणबत्त्यांचाही भरपूर साठा करून ठवण्याचा उपदेश केला होता.त्यावेळी अण्णांचे आंदोलन भारतात जोरात होते त्यामुळे तिकडल्यासारखाच मेणबत्त्यांचा तुटवडा येथे पण भासणार असे दिसू लागले. अगदी घर उडून नाही गेले तरी घराबाहेरील वस्तू उडण्याची शक्यता होती. त्यात कार उडतील असे काही गृहित धरले नव्हते तरी घराबाहेरील कुंड्या ज्या नुकत्याच गौरी गणपतीच्या सणासाठी सौं.ने मोठ्या हौसेने येथील होम डॅपो तून आणल्या होत्या त्या फुलझाडांसकट उडणे शक्य होते.

शुक्रवारी सर्व कचेऱ्या, शाळा कॉलेजेस सगळे काही लवकर सोडण्यात आले होते
त्यामुळे चिरंजीवही घरी आले होते त्यामुळे त्याला कुंड्या घरात आणण्याचा आग्रह सुरू झाला.खरे तर आमच्या कुंड्या उडून शेजाऱ्याच्या डेकवर गेल्या असत्या तर दुसऱ्या शेजाऱ्याच्या  इतकेच काय पण होम डेपोतल्याही कुंड्या उडून आमच्या डेकवर येण्याची शक्यता आहे असा दिलासा देण्याचा प्रयत्न मी केला असता. पण माझ्या सूचनेमुळे कुंड्यांच्या ऐवजी माझीच गच्छंती गराजमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली असती म्हणून मी स्वतःला आवरले..  त्या कुंड्या घराच्या मागील डेकवर होत्या त्या उचलून गॅरेजमध्ये न्यायचा विचार होता. पण त्याने घरी येताच दुसराच प्रस्ताव मांडला त्याच्या मते वादळामुळे वीज पाणी बंद पडण्याची शक्यता असते शिवाय त्या काळात आणि कदाचित पुढेही काही काळ सगळी दुकाने बंद असणार त्यामुळे प्रथम पोटापाण्याची व्यवस्था करून ठेवायला हवी त्यामुळे अगोदर अपना बाजार , सब्जीमंडी सारख्या भारतीय दुकानांवर हल्ला करणे आवश्यक. आमच्या अनुभवी पटेलांनी हाच उपदेश केल्याचे मलाही आठवले.

सूनबाई त्यावेळी नातवाला शाळेतून आणायला गेली होती व ती तिकडूनच येताना काही खरेदी करणार होती.मला  खरेदी या गोष्टींचा कंटाळा असल्यामुळे जाण्याची काही इच्छा नव्हती पण अशा अवघड प्रसंगी प्रर्त्येकाने आपला वाटा उचलायला हवा असे वाटून मीही चिरंजीव व सौ. यांच्या बरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली व आम्ही तिघे निघालो. अपना बाजारवर जणू एडिसनवासी भारतीय या नावाच्या चक्री वादळाने हल्लाच केल्याचा भास होत होता.यावेळी एक तारखेस गणपती येत असल्याने ती खरेदीही याच वेळी करणे आवश्यक होते.त्यामुळे नेहमीच आठवड्या अखेरीस असणारी गर्दी तिपटीने वाढली होती. सामान घेण्यासाठी ढकलगाडी देखील उपलब्ध नव्हती. तेवढ्यात एका तरुणाला आपले सामान ढकलगाडीवरून आपल्या गाडीत उतरवताना आमच्या चिरंजीवांनी हेरले व त्याने ताबडतोब ती गाडी त्याच्याकडून हस्तगत केली.

अपना बाजारमध्ये अक्षरशः हातघाईची जणू लढाईच चालू होती. प्रत्येकजणाचे दोन्ही हात प्लॅस्टिकच्या बॅगांच्या गुंडाळीतून बॅगा तोडणे व दुसऱ्या हाताने त्यात सामान भरणे याच उद्योगात मग्न होता. अशा हातघाईच्या लढाईचे रणांगण पाहिल्यावर आमच्या झाशीच्या राणीला स्फुरण न चढेल तरच नवल. ती प्लॅस्टिक बॅग केव्हां तोडत होती आणि त्यात दोडके, भोपळे केव्हां भरत होती हे हे मला तर कळतच नव्हते  तिची तुलना बाजीप्रभूच्या हातघाईच्या लढाईशीच काय ते करता येईल.मी आपला हातगाडीच्याच लढाईत धन्य मानत होतो.जरी हातगाडी ढकलण्याचे काम निरुपद्रवी होते तरी त्या गर्दीतून ती फिरवणे हे तितकेच अवघड काम होते त्यामुळे एका कोपऱ्यात ती उभी करून सौभाग्यवतीने हस्तगत केलेला माल तिच्याइतक्या  नाही तरी जमेल तेवढ्या चपळाईने त्यात नेऊन टाकण्याचे काम मी करत होतो. चिरंजीवांना इतर काही वस्तू शोधून हातगाडीत टाकण्याच्या कामी जुंपण्यात आले होते हातगाडी भरली तरी त्यांचे वस्तू गोळा करण्याचे काम चालूच होते.

तेवढ्यात आपल्याला बाहेर पडताना चेक इन कौंटर या एका महत्त्वाच्या अडथळ्यास तोंड द्यावे लागणार आहे याची कल्पना आल्यावर सामान घेऊन बाहेर पडणाऱ्यांच्या रांगेत मी उभे राहावे असे ठरले आणि पाहतो तो काय मी जेथे उभा होतो अगदी त्याच जागेपर्यंत ती रांग येऊन पोचली होती त्यामुळे फक्त हातगाडीचा रोख बदलून आपण रांगेतच उभे आहोत हे इतरांना कळेल याची काळजी घेणे एवढेच काय ते मला करायचे होते.अर्थात माझ्या रांगेत उभे राहण्यामुळे हातगाडीत सामान येऊन पडण्याची क्रिया काही प्रमाणात मंदावली असली तरी थांबली होती अशातला भाग नव्हता. मी मात्र अमेरिकेत येण्यापूर्वी बॅगा भरल्या जात असताना माझ्या बॅगेव्यतिरिक्त इतर तीन बॅगात व माझ्या कपड्याव्यतिरिक्त माझ्याही बॅगेत काय सामान टाकले जात आहे याविषयी जितका  नि: संग असतो तेवढाच हातगाडीत पडणाऱ्या सामानाविषयी  होतो. अगदी तुकारामांच्या भाषेत फोडले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही अशीच माझी भूमिका होती.

सामान भरण्याची ही प्रक्रिया अगदी मी वस्तूंचा हिशोब करणाऱ्या ललनेच्या टेबलपर्यंत पोचल्यावरही चालू होती. ती युवतीही तितक्याच चपळाईने त्या वस्तू किंमतमापक यंत्राखाली नेऊन गणकयंत्रावर बेरीज करण्याचे काम करत होती. या वेळी तिच्या मदतीस आम्ही आणलेले सामान भराभर मोठ्या प्लस्टिकच्या पिशव्यात टाकण्यासाठी एक मदतनीस देण्यात आला होता. त्यामुळे आम्ही तासाभराने अपना बाझार च्या बाहेर आमच्या हातगाडीसह पडून आमच्या कारपर्यंत कसे बसे पोचलो व गाडीच्या डिकीत सामन टाकून हातगाडी मोकळी करण्याची वाटच बघत असल्यासारखा एक तरुण पुढे येऊन आमची हातगाडी पळवत घेऊन गेला.काही वस्तू न मिळाल्याचा अहवाल भ्रमणध्वनीवरून आमच्या सूनबाईंपर्यंत पोचला होता व त्यांच्या रस्त्यावर असणाऱ्या दुसऱ्या अशाच मॉलमध्ये त्या वस्तू त्यांनी मिळवल्या होत्या.

इतकी हातगाडीभर खरेदी करूनही पाणी व दूध घ्यायचे राहिलेच होते कारण त्या वस्तू तेथे मिळतच नव्हत्या, त्यामुळे परत येताना घराजवळच असलेल्या थांबा आणि विकत घ्या (Stop and Shop) या नावाच्या मॉलमध्ये शिरलो. तेथेही तितकीच गर्दी असेल असा अंदाज होता पण त्या मानाने ते बरेच मोकळे होते व हातगाड्या थोड्याफार शिल्लक होत्या. आत शिरल्यावर दाराजवळच अगदी छोट्या म्हणजे एक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या दिसल्या. खरे तर वीस पंचवीस लिटर पाणी बसणारे कॅन विकत मिळतात त्यामुळे अशा छोट्या तीस चाळीस बाटल्या घ्यायच्या की नाही असा विचार मनात आला पण चिरंजीवानी आता घेऊ आणि आत मोठा कॅन असेल तर ह्या तेथेच ठेवू असा शहाणपणाचा विचार केला कारण आत मोठा कॅन नव्हताच उलट दोघा तिघाजणांनी आम्हालाच या बाटल्या कुठून मिळवल्या असे विचारले व त्यामुळे आम्ही आपली पाठ थोपटून घेतली. येथे दूध आणि पिठीसाखर घेतली. अशी साखर केकसाठी वापरतात त्यामुळे ती येथेच मिळते हा शोध अर्थातच सौ. चा ! असो अशा प्रकारे जवळ जवळ एक क्विंटलभर माल आम्ही घेऊन घरी आलो. अशी क्विंटलने खरेदी आम्ही औरंगाबादमध्ये सर्वजण एकत्र राहत होतो त्यावेळी तेथील मोंढ्यावर जाऊन करत असू. पण त्यावेळी मोंढ्यावरून सामान बैलगाडीतूनच किंवा हातगाडीवरून आणावे लागे.

आजचा सगळा वेळ खरेदीत गेल्यामुळे बाहेरील सामान आत आणून टाकण्याचे काम उद्यावर ढकलावे लागले.पण त्याच्यापेक्षा अधिक लांबवणे शक्य नव्हते त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी सगळेच घरी असल्यामुळे सामन गराजमध्ये आणून टाकण्याच्या कामात सौं नेच आघाडी घेतली म्हटल्यावर इतरांना आणि मलाही गप्प राहणे शक्य नव्हते.सर्वांनी आपल्या आपल्या कुवतीनुसार सामान आत आणून टाकले.शनिवारी संध्याकाळी पाऊस थोड्याफार प्रमाणात चालू होताच तरीही मला इषारा देणारे पटेल छत्री घेऊन फिरायला येणार का म्हणून विचारायला आलेच होते. त्याना त्यांच्याच इषाऱ्याची आठवण करून देऊन मी घरी पिटाळले.

त्या दिवशीची रात्र म्हणजे "राजा रात्र वैऱ्याची आहे जागा राहा "अशा इशाऱ्याची होती. रात्री काहीही होऊ शकते म्हणजे घरावर झाड पडण्यापासून ते घर उडून जाण्यापर्यंत त्यामुळे अशा परिस्थितीत रात्री आम्हालाही स्थलांतर करावे लागलेच  तर एका बॅगेत आवश्यक कपडे व पर्समध्ये पासपोर्ट वगैरे कागदपत्रे, आवश्यक औषधे असे सामान भरून ठेवून धड़धडत्या अंत:करणाने झोपलो.वादळ अतिशय जोरात येणार व झाडे पण उन्मळून पडतील असे भाकित होते त्यामुळे आम्ही संध्याकाळी आमच्या मागील व पुढील झाडाकडे पाहून   बहुतेक ती पडणार नाहीत व अगदी पडलीच तर घरावर पडणार नाहीत असा अंदाज केला होता.त्याशिवाय बार्बेक्यू सारख्या अगदी जड वस्तू घरात नेणे शक्य नसल्यामुळे दोराच्या सहाय्याने त्या डेकला बांधून ठेवल्या.इतर काही करता येणे शक्यच नव्हते.

 सगळी अशी जय्यत तयारी करून झोपायला गेलो.मला बराच काळ झोपच लागली नाही मध्येच जोरात वारा सुटल्याचा  भास् झाला पण नंतर एकदम सकाळी सात वाजताच जाग आली तेव्हां त्यावेळी घर तर जाग्यावर होतेच पण त्याचबरोबर घराबाहेर डोकावून पाहिले तर सगळी झाडे जागच्या जागी होती.त्यामुळे झाड पडले नाही हे उघड झाले .रात्री १२ ते २ जोरात हवा वहात असल्याचा  सौ.ऩे हवाला दिला तर चिरंजीवांच्या  मते रात्री २ नंतर जोरात वारे सुटले होते.त्या काळातच बरोबर मला गाढ़ झोप लागली असावी त्यामुळे त्यावर काही मत व्यक्त करणे शक्य नव्हते पण सकाळी फिरायला मात्र घरच्यांनी नको नको म्हणत असताना गेलो तर फिरण्याच्या रस्त्यावर काही झाडे पडल्याचे दिसले पण अपेक्षेच्या मानाने हा किरकोळ मामला होता.दूरदर्शनवर मात्र बातमीदार अगदी उडून जातील की काय अशा वाऱ्यात किंवा गुडघाभर पाण्यात  उभे राहून इतरत्र किती नुकसान झाले याच्या बातम्या देत होते.अनेक ठिकाणी घरे उड़णे, झाडे पड़णे असे प्रकार झाले होते.व वादळात सापडून जीवितहानी पण झाली होती.शेवटी १० लोक मरण पावल्याचा अधिकृत आकडा  कळला.. तेव्हां आता वादळ ओसरले म्हणून आम्ही स्वस्थचित्त झालो तरीही त्यानंतर दोन दिवस रेल्वेगाड्या व बसेस बंद असल्यामुळे चाकरमान्यांचे थोडेफार हाल झालेच. तरी  त्याना संगणकाच्या सहाय्याने घरून काम करता येत असल्यामुळे रजा वाया घालवावी लागली नाही.काही भागातील वीज गेली होती त्यामुळे त्या भागातील माझ्या मुलाच्या मित्रांनी अगोदर आणलेले दुधासारखे पदार्थ आमच्या घरातील फ्रीजच्या आश्रयास आणून ठेवले होते. आयरीन वादळाच्या तडाक्यातून आम्ही मात्र बालंबाल बचावलो होतो.